Add

Add

0
मुंबई (प्रतिनिधी):-कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्रअभियानांतर्गत व्होल्क्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Volkswagon India Private Limited) सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये गुणात्मक वाढ होण्यास मदत होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नुकतीच दिली.
      कौशल्य विकास विभागामार्फत मेक इन इंडिया अंतर्गत आतापर्यंत 22 सामंजस्य करार करण्यात आले असून या सामंजस्य करारांपैकी 19 सामंजस्य करार कार्यान्वित झाले आहेत. सामंजस्य करार हा 22 व्या सामंजस्य कराराचा एक भाग असून यामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, व्होल्क्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. ॲड्रस लाँरमॅन, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दयानंद मेश्राम, व्होल्क्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे पंकज गुप्ता आदी उपस्थित होते. 
            श्री. पाटील-निलंगेकर यावेळी म्हणाले कीमहाराष्ट्रात असलेल्या 417 औद्योगिक प्रशिक्षण संस्था या महाराष्ट्राची ताकद आहे. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत विविध उद्योग धंद्यांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येत असते. आगामी काळात कौशल्य विकास विभागामार्फत कौशल्य विकासावर आधारित अधिकाधिक प्लेसमेंट देण्यासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. येणाऱ्या काळात 10 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्यादृष्टीने काम करण्यात येत आहे. कौशल्य विकास विभागामार्फत व्होकेशनल ट्रेनिंग देण्यात येते ते आगामी काळात प्रोफेशनल ट्रेनिंग असावे यावर भर देण्यात येईल या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.
            ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्रअभियानांतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता आणि व्होल्क्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बरोबरील सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारानुसार सदर कंपनीमार्फत पुढील 5 वर्षांसाठी राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणात गुणात्मक वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी या कंपनीमार्फत येत्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी दोन ते अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 29 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत प्रशिक्षण सुविधांच्या दर्जावाढीसाठी औद्योगिक आस्थापनेबरोबर कौशल्य विकास संचालनालयास कराव्या लागणाऱ्या सामंजस्य कराराच्या मसुद्यास शासनाची मान्यता देण्यात आली असल्याचेही यावेळी श्री. पाटील यांनी नमूद केले.
            या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर व्होल्क्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. लाँरमॅन म्हणाले की, गेल्या 10 वर्षापासून आमची कंपनी महाराष्ट्रात काम करीत असून आगामी काळातही काम करीत राहणार आहे. महाराष्ट्रात असलेल्या वेगवेगळ्या संधी लक्षात घेता आज झालेल्या करारानुसार पिंपरी-चिंचवड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी आवश्यक असणारे सर्व काम लवकरच सुरु करण्यात येईल.
सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये
ऑटोमोबाईल आणि प्रोडक्शन सेक्टर संदर्भात यंत्रसामुग्री, उपकरणे आणि हत्यारे पुरविणे
प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेशित व्यवसाय अभ्यासक्रमासोबतच अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अल्पमुदतीचे प्रशिक्षण    
   देणे
ऑन द जॉब ट्रेनिंग, इंडस्ट्रिअल व्हिजिट, गेस्ट लेक्चर्स
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निदेशकांना प्रशिक्षणाचा दर्जा अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशिक्षण
विविध व्यवसाय अभ्यासक्रमांचे टिचवेअर आणि सिम्युलेशन उपलब्ध करुन देणे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सुशोभिकरण करणे.
उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे

            सामंजस्य करारावर राज्य शासनाच्या वतीने व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दयानंद मेश्राम आणि व्होल्क्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. ॲड्रस लाँरमॅन यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

Post a Comment

 
Top