Add

Add

0
स्वामी अग्निवेश; ‘विश्‍वशांतीसाठी भारतीय संस्कृतीचे योगदान’ विषयावर व्याख्यान
पुणे(प्रतिनिधी):- “जाती-धर्मांतील, स्त्री-पुरुषांतील, गरीब-श्रीमंतातील भेदाभेद योग्य नाहीत. अस्पृश्यता, स्त्रीभ्रुणहत्या, हुंडाबळी अशा प्रथा मोडून काढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीतील वैश्‍विक मूल्ये आत्मसात करुन समाजात मानवतेची भावना रुजवायला हवी,” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रसंत स्वामी अग्निवेश यांनी केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेच्या वतीने ‘विश्‍वशांतीसाठी भारतीय संस्कृतीचे योगदान’ या विषयावर संत ज्ञानेश्‍वर सभागृहात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ.कुमार सप्तर्षी, विश्‍वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन.पठाण,एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, प्रा. गौतम बापट आदी उपस्थित होते.
स्वामी अग्निवेश म्हणाले, “परमेश्‍वराने आपल्याला केवळ माणूस म्हणून जन्माला घातले आहे. त्याने कोणताही भेदभाव केला नाही. परंतु, आपण स्वार्थापोटी जाती, धर्म, वंश, लिंग आदींमध्ये भेद करतो. त्यातून आंतकवाद, नक्षलवाद, जातीधर्मांतील हिंसाचार असे प्रश्‍न उद्भवतात. त्यामुळे आपण सतत जागरुक असले पाहिजे. खरा धर्म समजून घेताना प्रश्‍न विचारणे, चर्चा करणे आणि मतभेद दूर करुन एकत्रित राहणे गरजेचे आहे. त्यातून खर्‍या अर्थाने समाजपरिवर्तन होईल व विश्‍वात शांतता नांदेल.”
“भावी पिढीने आपल्या हातून कोणत्याही प्रकारचा भेदाभेद होणार नाही. स्त्री-पुरुषांना समान वागणूक देण्यासाठी प्रयत्न करु. तसेच हुंडा मागणार नाही किंवा देणारही नाही, असा संकल्प करुन त्याप्रमाणे वागायला हवे. सर्व धर्मातील लोक आपलेच भावंडे आहेत, अशी भावना ठेवून जीवन जगले पाहिजे. अस्पृश्यता, भेदाभेद यामुळे असह्य वेदना मला माझ्या आयुष्यात सहन कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे धर्माच्या नावावर माथी भडकविणार्‍यांच्या मागे न जाता भारतीय संस्कृतीमधील वैश्‍विक मूल्ये समजून घेऊन पुढे जायला हवे,” असेही स्वामी अग्निवेश यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “शुद्ध विचार आणि शुद्ध मन ठेवून इतरांचा आदर केला पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीतील क्षमता ओळखून प्रत्येकाने आपले योगदान दिले, तर भारतमाता एकविसाव्या शतकात ज्ञानाचे दालन म्हणून जगासमोर उदयास येईल, असे भाकित भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत बोलताना केले होते. हे भाकित खरे करण्यासाठी आपल्या कर्तव्याला आपला धर्म समजून ते बजावले पाहिजे.”

डॉ. कुमार सप्तर्षी यांनीही आपले विचार यावेळी मांडले. डॉ. संजर उपाध्ये यांनी प्रास्ताविके केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top