Add

Add

0
मुंबई (प्रतिनिधी-):-जनसुराज्य शक्ती पक्ष बुधवारी पक्षप्रमुख विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये सहभागी झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्ष महाआघाडीमध्ये सहभागी झाल्याचे जाहीर केले. जनसुराज्य शक्ती पक्ष महाआघाडीत सहभागी झाल्याने राजकीय शक्ती वाढेल, असे मा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले.
मा. रावसाहेब पाटील दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भाजपाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये नव्याने जनसुराज्य शक्ती पक्ष दाखल झाल्यामुळे आघाडीची ताकद वाढली आहे. पक्षाचे प्रमुख विनय कोरे व त्यांचे सहकारी नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकीत भाजपासोबत लढतील.
त्यांनी सांगितले की, विनय कोरे हे तीनवेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. ते वारणा सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख आहेत. सहकार क्षेत्रात प्रभावी कामगिरी करून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा भाजपाला लाभ होईल.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या आठवड्यात भाजपामध्ये प्रवेश केला. पिंपरी – चिंचवडमधील आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार लांडगे यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपरी – चिंचवडमध्ये भाजपाची ताकद वाढेल. राष्ट्रपतींच्या कोट्यातून कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाआघाडीमध्ये विनयजींचे आपण स्वागत करत आहोत, असेही मा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले.

मा. विनय कोरे यांनी सांगितले की, भाजपाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये घटक पक्ष  म्हणून सहभागी होताना आपण कोणत्याही अपेक्षा ठेवलेल्या नाहीत किंवा वाटाघाटी केलेल्या नाहीत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आपल्या पक्षाचा प्राधान्याचा कार्यक्रम आहे. पक्षाचे काम व्यापक स्वरुपात करण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत सहभागी होत आहे.

Post a Comment

 
Top