Add

Add

0
विदूरचा प्रवास...तिमिरातून तेजाकडे
        असाच एका बातमीच्या अनुषंगाने अपंग कल्याण आयुक्तालयात गेलो होतो. नेहमीप्रमाणेच अनेक अंध, अपंग मुले, प्रौढ यावेळी कार्यालयात कामानिमित्त आले होते. मात्र एका साध्या अंध युवकाने कसे कोण जाणे माझे लक्ष वेधून घेतले. अपंग कल्याण आयुक्तांनी बोलविलेल्या राज्यातील अनेक संस्थांच्या बैठकीत आपल्या संस्थेचे प्रतिनिधित्त्व करण्याठी हा युवक आला होता. अतिशय आत्मविश्वासाने आपल्या संस्थेविषयीची माहिती त्याने बैठकीत सांगितली. डोळ्याने अंध असला तरी संस्थेने शिक्षणाची कवाडे उघडल्याने या विदूर शंकर पापळकरचा तिमिराकडून तेजाकडे प्रवास होत आहे हेच या निमित्ताने दिसून आले...!

विदूरच्या भेटीतून मानवी जीवनाचे अनेक पैलू उलगडत गेले.त्याने त्याची
कहाणी काहीशी अशी सांगितली,  मी वयाच्या सुमारे तिसऱ्या-चौथ्या वर्षी पोलिसांना पंढरपूर येथे बेवारस अवस्थेत सापडलो होतो. मग बाल कल्याण समितीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील स्व. अंबादास पंत वैद्य मतीमंद, मुकबधीर बालगृहात मला दाखल करण्यात आले. तालुक्यातील धारणी रोड, वजर फाटा, पो. मल्हारा येथे हे वसतिगृह आहे. संस्थेकडून माझी सर्व शिक्षणाची सोय करण्यात आली. संस्थेचे संस्थापक आणि सध्याचे सचिव शंकर (बाबा) पापळकर यांनी इतर अनेक मुलांप्रमाणेच माझेही पालकत्व स्वीकारले आणि माझे विदूर शंकरराव पापळकर असे नामकरण करण्यात आले.
विदूरने पुढे माहिती दिली की, संस्थेने त्याच्या शिक्षणाची सोय केली. चौथी पर्यंत स्वामी विवेकानंद यशवंत अंध विद्यालय, परतवाडा, त्यापुढे सातवीपर्यंत अमरावती येथील डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आणि आठवी ते दहावीचे शिक्षण सुंदराबाई एस.जी. मुलांचे हायस्कूल, परतवाडा येथे शिक्षण झाले. अकरावी ते बारावी भगवानराव शिवाजी पाटील महाविद्यालय, परतवाडा येथे शिकून सध्या समाजकार्य महाविद्यालय, सोशल वर्क कॉलेज, बडनेरा, अमरावती येथे समाजकार्य पदवीच्या दुसऱ्या वर्षाचे (बीएसडब्ल्यू) शिक्षण घेत आहे. त्यापुढे एमएसडब्ल्यू करावायचे आहे, असे तो म्हणतो.
            त्याला आपल्या बाबांचा आणि संस्थेचा खूप अभिमान आहे. कारण संस्थेतील एक नाही दोन नाही तब्बल 123 मुलांना एकाच वडिलांचे नाव. हे पाहिल्यावर आपणही अचंबित होऊ नाहीतर काय. मात्र हे खरंय. या बालगृहातील 123मुलांच्या वडिलांचे नाव एकच आहे. कारण ही सर्व मुले अनाथ, अपंग अशा अवस्थेत या बालगृहात दाखल झाली होती. त्यांना संस्थाचालक शंकर बाबा पापळकर यांनी स्वतःचे नाव देऊन पुनर्वसनाचा एक अनोखा प्रयत्न सुरु ठेवला आहे.
        समाजात अपंगांची अवस्था, त्यातही अपंग बालकांची अत्यंत दयनीय अवस्था पाहून शंकर पापळकर यांच्या मनात या बालकांसाठी काहीतरी करण्याचे वारंवार येत असे. त्यातूनच व्रतस्थ वृत्तीने शंकर पापळकर यांनी 1992मध्ये या बालगृहाची स्थापना केली. धारणी रोड, वजर फाटा, ता. अचलपूर येथे हे बालगृह आहे. आत्तापर्यंत या संस्थेत 123अंध, मुकबधीर, अपंग मुले-मुली दाखल झाली. त्यांना वडिलांचे नाव नसल्याने स्वतःचे नाव वडिलांच्या जागी लावले. या बालगृहातील 78 बालकांचे आधार कार्ड काढून या बालकांची कायमची ओळख तयार करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.
बालगृहातील १७ अनाथ अपंग मुला-मुलींचे लग्न संस्थेने स्वखर्चाने लावले. संस्थेतील 12 मुलांना शासकीय नोकरी लागली.हे संस्थेचे मोठे सामाजिक कार्य आणि संस्थेच्या सेवाभावी वृत्तीचे यश म्हणावे लागेल. सध्या 70 मुले-मुली याठिकाणी राहून विविध स्तरावरील शिक्षण घेत आहेत. संस्था एवढ्याच कामामध्ये पुढे नाही तर, संस्थेतील मुलांनी संस्थेच्या जवळील टेकडीवर १५ हजार वृक्षांचे रोपण करून टेकड्या हिरव्यागार करण्याचे मोलाचे काम केले आहे. यामध्ये विविध औषधी वनस्पती, सीताफळ, चिकू, आवळा, चिंच, बोर, करवंद अशा अनेक फळझाडांचा समावेश आहे.
संस्थेमधील मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. संगीत, शिलाई काम, दिवाळी फराळ बनवणे, शोभेच्या वस्तू बनविणे अशा कौशल्यांबरोबरच मुलांच्या आवडी-निवडीनुसार शिक्षण व प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळावा म्हणून संस्था पुढाकार घेत असते. संस्थेची सुरवात मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रत्येकी एक हॉल याप्रमाणे झाली. आता दरवर्षी संस्थेची प्रगती होत 15 एकरामध्ये संस्थेचा पसारा वाढला आहे. मुला-मुलींना राहण्यासाठी वेगळ्या इमारती बांधण्यात आल्या. फिल्टरचे पाणी, स्वच्छ शौचालये, स्नानगृहे, अभ्यासिका, जेवणाची उत्कृष्ट सोय या बाबी करण्यात आल्या आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींचेही संस्थेला याकामी सहकार्य मिळत असते. संस्थेला अजून सहकार्याची अपेक्षा आहे असे विदूरने यावेळी सांगितले.
"शंकरबाबांमुळेच आमच्या जीवनाला आकार आला. मला अंधत्वामुळे डोळ्यापुढे अंधार असला तरी शिक्षणाच्या माध्यामातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांचीच साथ आणि प्रेरणा मिळत आहे. माझ्या जीवनातील अंधार संपून उजेडाकडे म्हणजेच तिमिरातून तेजाकडे प्रवास होत आहे. याचे श्रेय शंकर बाबांचेच आहे." - विदुर शंकर पापळकर

                                                                                                     - सचिन गाढवे,
                                                                                                         माहिती सहायक,

                                                                                                         विभागीय माहिती कार्यालय, पुणे

Post a Comment

 
Top