Add

Add

0

ह्युमन माईंडचा खेळ : कौल


आपल्याच आसपासच्या व्यक्तींच्या मनात काय चाललेय याची उकल त्या व्यक्तीच्या अत्यंत जवळच्या असणार्‍यांनाही बर्‍याचदा होत नाही. मग अशी व्यक्ती आपल्याच भ्रमात जगत राहते आणि लोकांच्या नजरेत न येता आपल्या मनात चाललेल्या खेळाला खतपाणी घालत राहते. हा एक ह्युमन माईंडचा खेळ जेव्हा अती व्हायला लागतो तेव्हा अशा व्यक्ती कधी डॉक्टरांचा आधार घेतात तर कधी क्रिमीनल बॅकग्राऊंडकडे वळतात. अर्थात समाजातल्या अशा व्यक्ती चुकीच्या असतात असं म्हणता येणार नाही. परंतु अशा व्यक्तींना योग्य वेळेत उपचार मिळणेही तितकेच गरजेचे असते. अन्यथा या व्यक्तींना मार्गदर्शनाअभावी वेड लागून या घातकही ठरू शकतात. असे ह्युमन माईंड आणि क्रिमीनल फिजीओलॉजीवर भाष्य करणारे धाडसी पाऊल दिग्दर्शक आदिश केळुस्कर यांनी ‘कौल’द्वारे टाकले आहे. मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ होतेय यात आदिशसारख्या वेगळेपण मांडणार्‍या दिग्दर्शकांचे धाडस हे एक पाऊल पुढे टाकण्यास मदत करत असल्याचेच म्हणावे लागेल.   
 या चित्रपटाची सुरुवात एका विचित्र वागणार्‍या तरूणापासून होते. सुरुवातीच्या काही चलदृश्यामध्ये एका फ्लॅटमध्ये एका म्हातारीचा मृतदेहही दिसून येतो. त्यानंतर हा तरूण कोकणातल्या काष्टेवाडीसारख्या छोट्याशा गावात प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून मुंबईहून येतो. याच तरूणाला एका रात्री विलक्षण आणि विचित्र अशा अनुभवाला सामोरे जावे लागते. पहाटेच्या चार वाजता भर पावसात घरी निघालेल्या या तरूणाला एक म्हातारा भेटतो आणि त्यानंतर एका क्षणात त्याला रात्रीचा दिवसात रूपांतर करणारा काहीसा अतार्किक अनुभव येतो. असे कसे घडू शकते? किंवा हा अनुभव खरा आहे की नाही?  मग असेल तर त्याचं कारण काय असे अनेक प्रश्‍न या जोशी नावाच्या शिक्षकाला बेचैन करून टाकतात. त्यानंतर मग या तरूणाला रेडीओवरूनही वेगवेगळे आवाज येवू लागतात. मग मात्र तो या सगळ्या गोष्टींना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो या किती वाजले म्हणणार्‍या वृद्ध व्यक्तीला भेटतो आणि काही कालावधी त्याच्या बरोबर घालवतो. या व्यक्तीचा भूतकाळ आणि त्याने केलेली कृत्य या सर्वांवर त्याने मांडलेल्या मोनोलॉजिमधल्या अनेक थिअरीज या अचंबित करणार्‍या आहेत. 
       सामान्य असणारा आणि तसंच वागणारा, कुणीही नातेवाईक किंवा जवळचा एखादाही मित्र नसलेल्या या तरुणाचे लग्नही झालेले आहे आणि त्याची बायको सात महिन्यांची गरोदर आहे. जेव्हा त्याला त्याच्याच बायकोच्या पोटातले त्याचेच बाळ  खेचून काढून बकाबका खावेसे वाटायला लागते तेव्हा तो डॉक्टरकडे येतो. यावेळी  विश्‍व त्याची उत्पत्ति, ईश्‍वर, माणूस आणि इतर जीवजंतू, ब्रह्मांड, जगातला पहिला ध्वनी ओंकार आणि घंटानाद केल्यावर निर्मित होणारा नाद आणि त्यानंतर हाच घंटानाद केल्यानंतर ब्रह्मांडाचा होणारा नाश अशा एक ना अनेक गोष्टी सांगत राहतो आणि शोध थांबवला नाही तर सर्व काही सापडेल असे सांगणारा हा तरूण पडद्यावरच पाहणे योग्य. 
       चित्रपटाच्या सुरुवातीलाच किमान पहिली तीस मिनिटे एकापाठोपाठ एक असे चाललेल्या अनेक प्रसंगांची मालिकांचा  अनुभव नक्कीच डोकं भंडावून सोडतो. चित्रपटातील तार्किक गोष्टी जोपर्यंत पाहणारा जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत  कोणत्याही बोलण्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसण्याची संकल्पना समजत नाही. परंतु दिग्दर्शकाने अनेक प्रसंगाचे आणि परिस्थितीचे केलेले आकलन चित्रपटाचा हाय पॉईंट ठरत असल्याचे म्हणावे लागेल. वृध्दाची दीक्षा घेतल्यानंतर शिक्षकाला होणारा त्रास आणि त्याने डॉक्टरांकडे आपण खून केल्याची दिलेली कबु  ली त्यावेळचे संभाषण, त्यातून सुटलेलं एक विलक्षण कोडं रंजक झाले आहे.  
चित्रपटात रोहित कोकाटे आणि दीपक परब आणि सोैदामिनी टिकले अशा मोजकीच पात्रं आहेत. रोहित कोकाटेचा अभिनय अतिशय संयत, सहज आणि खराखुरा दिसून येतो. रित्विक राज पाठक आणि सिद्धार्थ दुबे यांची ध्वनि संरचना, मन्नन मुंजालचे संगीत, समिरा किडमनचे संकलन आणि अमेय चव्हाणची सिनेमोटोग्राफी या कौलच्या महत्वाच्या बाजू म्हणाव्या लागतील. चित्रपटात सिनेमोटोग्राफी वेगवेगळ्या प्रकारची दाखविण्यात आली आहे. यात लाँग शूट न घेता जास्तीत जास्त फोकस्ड क्लोजप घेण्यात आले आहे. यात कपाळ, नाक आणि डोळे दाखवणे, सायकल चालवितानाचा झूम आणि माऊंट केलेला कॅमेर्‍यांचा प्रयोग कोकणात शूटींग असूनही कोणतेही वातावरण व्यवस्थित दिसून येत नाही. बरेच प्रसंग पाहताना डोक्याला प्रचंड ताण येतो त्रास ही होतो सगळंच अगदी नकोसं वाटणारं वातावरण यासाठी बॅकग्राऊंड स्कोअर आणि  साऊंड डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. 
कथा साधीच असतानाही त्याला दिलेली वेगवेगळी वळणे ह्युमन माईंड टाकलेला फोकस असा प्रयोग मराठीत तरी अजून झालेला नसला तरीही बॉलिवूड हॉलिवूडमध्ये असे प्रयोग झालेले आहेत. ओव्हरऑल हा चित्रपट सगळ्याच वाजूंनी वेगळेपण दर्शविणारा असला तरीही हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नक्कीच नाही असे म्हणेन. हा विषय सामान्यांच्या डोक्यावरून जाईल आणि नक्कीच डोकं बधीर करणारा हा अनुभव राहील, असे म्हणावे लागते. 
 डॉ. सुकेशिनी पाटील

Post a Comment

 
Top