Add

Add

0
तुकाराम महाराज दैठणेकर यांचे मत; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
पुणे(प्रतिनिधी):- :“या जगात जर भक्तीचा प्रसार झाला आणि लोक नामस्मरण करू लागले, तर सहिष्णुतेचे बीजारोपण आपोआप घडेल व विश्‍वशांतीचे स्वप्न साकार होईल,” असे उद्गार ठाकुरबुवा दैठणेकर मठाचे प्रमुख ह.भ.प.श्री. तुकाराम महाराज दैठणेकर यांनी काढले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या  संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्‍वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या 720 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी देहू येथील श्री तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री. शांताराम एकनाथ मोरे, देहू गावच्या सरपंच सौ. सुनिता टिळेकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे, श्री. गुणवंतराव दवंडे, श्री. बाळासाहेब रावडे व श्री. गणपतराव कुर्‍हाडे-पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आळंदी-देहू परिसर विकास समितीचे संस्थापक कार्यध्यक्ष व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते. या वेळी श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा.स्वाती कराड-चाटे, सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड, एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. योगेश भालेराव हे उपस्थित होते.
ह.भ.प. श्री. दैठणेकर महाराज म्हणाले, “योगमार्गाने साध्य होणारी समाधी हा एक प्रकार झाला. पण श्री. ज्ञानेश्‍वर माऊलींची  संजीवन समाधी हे एक अद्वितीय उदाहरण आहे. माऊलीने आपल्या जीवनातून आणि ज्ञानेश्‍वरीसारख्या ग्रंथातून जनसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखविला. त्या मार्गावरून चालताना वारकरी बंधूंमध्ये आपोआपच सहिष्णुता निर्माण झाली. भक्ती व नामस्मरणाची नुसती चर्चा करण्यापेक्षा तिचे आचरण करणे महत्त्वाचे आहे.”
श्री. शांताराम मोरे म्हणाले, “आज सर्व जगात संघर्ष, आतंकवाद आणि दहशतवादामुळे अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सर्व समाजात सहिष्णुतेचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी संपूर्ण वारकरी संप्रदायावर आहे. विश्‍वशांती केंद्राच्या माध्यमातून हे कार्य केले जात आहे. त्यामुळे जगात शांततेचे वातावरण निर्माण होईल.”
प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले, “सर्व जातीजमातींमध्ये साक्षात्कारी संत होऊन गेले. त्यांनी जन्मभर सर्व समाजाचे प्रबोधन केले. पण त्यांच्या जातीतच त्यांना बंदिस्त करण्याचे काम त्यांचे ज्ञातीबांधव करीत आहेत. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण त्यामुळे त्यांच्या कार्यालाच सीमित केले जाते.”
डॉ. एस. एन. पठाण म्हणाले, “सध्या राष्ट्रीय एकात्मता सप्ताह साजरा केला जात आहे. त्याचवेळी जागतिक सहिष्णुता सप्ताह साजरा होणे हा एक चांगला योगायोग आहे. या सप्ताहात एकेका दिवशी एकेका घटकाचा उल्लेख केला जातो. पण खरे म्हणजे पंढरीची व आळंदीची वारी ही जातीजातींच्या भिंती कमी करून सर्व मानवजातीच्या एकात्मतेचा उत्सव आहे.”
पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, “राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणार्‍या मोठमोठ्या नेत्यांना माऊली ज्ञानेश्‍वरांच्या दर्शनाला आणण्याचे  मोठे काम प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी केले आहे. यापुढेही हे कार्य ते करीत राहतील. भागवत धर्मामध्ये जातीधर्माचा  कोणताही भेद नाही. तो सर्व समावेशक आहे.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “वारकरी संप्रदाय हा खरा सहिष्णु संप्रदाय आहे. तो संप्रदाय म्हणजे त्याग व समर्पणाचे मूर्तीमंत प्रतीक आहे. भविष्यात जगाला सुख, समाधान व शांतीचा संदेश दिला जाईल. आपल्या भारत देशामध्ये ज्ञानाची पूजा आणि अंतिम सत्याचा शोध घेतला जातो. आळंदी हे जगातील ज्ञानाचे मुख्य केंद्र आहे.”
श्री. बाळासाहेब रावडे, डॉ. सुभाष आवळे व सौ. सुनिता टिळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  श्री. शालीग्राम खंदारे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे  यांनी आभार मानले. विश्‍वशांती प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होऊन इंद्रायणी मातेच्या आरतीने सांगता झाली. या कार्यक्रमानंतर शेवगाव, जि. अहमदनगर येथील सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. श्री. कल्याण काळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. 

Post a Comment

 
Top