Add

Add

0

मुंबई (प्रतिनिधी):- मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आज दिव्यज फाऊंडेशनतर्फे महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. महापालिका आयुक्त अजोय मेहता, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, फाऊंडेशनचे विश्‍वस्त संपथ अय्यर, अभिनेत्री जुही चावला, हेल्थगुरू मिकी मेहता यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्री. अय्यर म्हणाले, दिव्यज फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील सर्व वंचित उपेक्षितांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे अमृता फडणवीस यांच स्वप्न असून, या फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील व्यक्तींच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. या प्रयत्नांचा पहिला भाग म्हणून दिव्यज फाऊंडेशनच्यावतीने महापालिकेतील सफाई कामगारांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात जे.जे. रूग्णालयाच्यावतीने आरोग्य तपासणी, मिकी मेहता यांच्या वतीने आरोग्य मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, मधूमेह नियंत्रण, आर्थिक साक्षरता आणि ध्यानधारणा आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
डॉ. लहाने यांनी यावेळी उपस्थित कामगारांना चांगल्या आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले. डोळ्यांची निगा राखण्याबाबत त्यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन करतानाच सफाई कामगारांसाठी आपण स्वत: सेवा देण्यास तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाची अभिनेत्री जुही चावला यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. हे सामान्य कार्यक्रम असले तरी त्याची आज नितांत गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
सौ. फडणवीस यांनी यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव केला. त्या म्हणाल्या, सर्व सफाई कामगार स्वच्छतेचे दूत आहेत. स्वच्छता अभियानात आज महाराष्ट्राने मोठी बाजी मारली आहे आणि त्यात मुंबई महापालिकेतील या स्वच्छता दूतांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. ते कचरावाला नसून, सफाईवाला आहेत. या कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
स्वच्छतेच्या सैनिकांसाठी दिव्यज फाऊंडेशनने पुढाकार घेतल्याबद्दल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यासाठी महापालिकेच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

योग, व्यायाम आणि ध्यानधारणा यामाध्यमातून शरीरातील अंतर्गत अवयवांची स्वच्छता होत असल्याचे मिकी मेहता यांनी सांगितले. यानंतर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा अनेक सफाई कामगारांनी लाभ घेतला.

Post a Comment

 
Top