Add

Add

0

पुणे (प्रतिनिधी):-काश्मीर खोर्‍यात बुधवारी 12 वी च्या आणि  गुरूवारी 10 वी च्या परीक्षा सुरु झाल्या. जवळपास 95 टक्के विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले आहेत. या धैर्याचे ‘असीम फाऊंडेशन’ या पुण्यातीलस्वयंसेवी संस्थेने कौतुक केले आहे. ‘असीम फाऊंडेशन’ संस्थेने देखील या मागणीसाठी पाठपुरावा केला होता, असे ‘असीम फाऊंडेशन’चे अध्यक्ष सारंग गोसावी यांनी सांगितले. 
याविषयी अधिक माहिती देताना सारंग गोसावी म्हणाले,‘साधारपणे सव्वाशे दिवसांच्या अस्वस्थतेला प्रतिसाद देताना जेव्हा जेव्हा जेवढे काही करता येईल तेवढे आम्ही प्रयत्न केले. यामध्ये अगदी मुलांना शिकण्यासाठी पुण्यामध्ये आणण्यापासून ते केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि जम्मू अ‍ॅण्ड काश्मीरचे शिक्षणमंत्री नईम अख्तर यांच्या भेटी घेऊन जम्मू काश्मीरमध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची विनंती करेपर्यंत ‘असीम फाऊंडेशन’नी प्रयत्न केले. शेवटी अनेक अनिश्‍चिततांमध्ये परीक्षा घेण्याचे ठरले आणि अभ्यासक्रम कमी करण्यासोबतच मार्चमधील जोड परीक्षेचा पर्यायही उपलब्ध करून दिला गेला. प्रत्यक्ष परीक्षेवेळी काश्मीरी विद्यार्थ्यांनी दिलेला उत्साही प्रतिसाद खूप आनंद आणि समाधानाचा आहे.’
मंत्री भेटीदरम्यान असीम फाऊंडेशनचे सई बर्वे, निरूता किल्लेदार, संस्कृती बापट तसेच इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
काश्मीरमधील अस्थिर वातावरणामुळे आपला अभ्यासक्रम पुर्ण करू न शकणार्‍या सोपोर, आणि बांदीपूर येथील 32 विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील ‘मिलेनियम स्कुल’ (कोथरूड)मध्ये अध्ययनाचे धडे देण्यात आले. तसेच त्यांना मोकळे वातावरण मिळावे या उद्देशाने पुण्यातील ऐतिहासिक स्थळे, पर्यटन स्थळे यांना भेटी, बालेवाडी येथे झालेल्या ‘फुटबॉल क्लब’, पुणे आणि ‘मुंबई सिटी’ यांच्याधील फुटबॉल स्पर्धा पाहणे या उपक्रमांचे आयोजन केले गेले होते.
‘असीम फाऊंडेशन’ ही काश्मीरमध्ये शैक्षणिक, सामाजिक, रोजगार निर्मितीचे काम करणारी पुण्यातील तरुणांची संघटना असून, 10 वर्षांहून अधिक काळ हे काम सुरू आहे. पुण्यातील युवक नोकर्‍या करून पगाराचा काही भाग संस्थेला देऊन सामाजिक उपक्रम करतात.

Post a Comment

 
Top