Add

Add

0

सांगीतिक मेजवानी ‘देठ की हो हिरवा’


सध्या गाजतंय ते नोटांचे नाट्य. त्यामुळे कुणालाही नाटकं पाहण्याचा इंटरेस्ट नाही. नोटांचा तुटवडा आणि रांगेत उभे राहून जीव मेटाकुटीस आल्यावर समस्या प्रधान नाटकाचा प्रयोग पाहून अजून चिंताग्रस्त का व्हायचं हाच विचार रसिक प्रेक्षक करताना दिसत आहेत. त्यामुळे एखादा संगीताचा कार्यक्रम असेल तर त्यावर प्रेक्षकांची करडी नजर आहे. दोन घटका  करमणूक तर होते आणि त्याहीपेक्षा गाणी ऐकताना मनात दुसरे विचार येत नाहीत. अशी परिस्थिती सध्या व्यावसायिक रंगभूमीवर दिसते आहे. 
नुकताच एक संगीतमय कार्यक्रम पाहण्यात आला. त्याचा  शुभारंभ बहुधा असावा. कार्यक्रमाचे नाव सुद्धा आकर्षित करणारे असेच. नाव होते  देठ की हो हिरवा  शोभा गुर्टू यांची  पिकल्या पानांचा देठ की हिरवा   ही  गझल आठवली. कार्यक्रमाची जाहिरात आकर्षित होती. सहजच नजर गेल्यावर समजलं की  ज्येष्ठ नागरिक जे गायक - गायिका आहेत ते तो कार्यक्रम सादर करणार आहेत. सादर करणारी संस्था सोहम प्रतिष्ठान असल्यामुळे आणि या कार्यक्रमाची संकल्पना - संयोजक विनीत गोरे असल्यामुळे तो दर्जेदार असणार ही   नक्कीच खात्री होती. त्यांना अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम सादर करण्याची आवड म्हणा छंद आहे असे म्हटलं तरी त्यात वावगे असे काहीच नाही. त्यांच्या कार्यक्रमात एक व्यावसायिक टच असतो. नेपथ्याचे अवडंबर भपकेबाज नसेल पण त्यात कल्पकता ही असते.त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात येणारे प्रमुख अतिथी हे त्या त्या क्षेत्रातील दिग्गज असतात. या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख या प्रमुख अतिथी  असल्यामुळे या कार्यक्रमास एक वेगळीच नजाकत आलेली होती. त्यांच्या छोटेखानी भाषणांनी प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडलं. त्यांना त्याबद्दल दाद देणे उचित ठरेल.  
ज्येष्ठ नागरिक  आणि ते गाणार म्हटलं की जरा धडकीच भरते कारण त्यांच्या वयांकडे पाहून ते विधान आपण करतो. पण ते विधान मला मागे घ्यावे लागले कारण तो कार्यक्रम पाहून. वय वर्ष 70 ते 84 वयातील ते अजूनही गाऊ शकतात आणि तेही सुरात, ग्रेट. मराठी सुगम संगीत, नाट्य संगीत, लावणी, चित्रपट गीते, आणि भावगीत, याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. ते आमचे श्रेष्ठ संगीत आहे. जी मंडळी गाणारी होती त्या पिढीने ऐकलीयत, त्या त्या मैफली अनुभवल्यात. त्या गाण्यांचे संस्कार त्यांच्यावर झालेत. ऐन उमेदीत त्यांना गाता नाही आले पण या वयात त्यांना ती संधी मिळाली त्याचे त्यांनी अक्षरशः सोने केले आहे. म्हणूनच विनीत गोरे म्हणाले की हा कार्यक्रम म्हणजे ती माझी गुरुदक्षिणा आहे. हे भान त्यांनी ठेवले हा त्यांचा मोठेपणा.  
देठ की हो हिरवा या कार्यक्रमात कोण वरचढ हा प्रकारच नव्हता. आपल्याला गाणे गायची संधी मिळाली आहे त्याचा  विनियोग चांगल्या प्रकारे गाऊन  करावयाचा आणि रसिक प्रेक्षकांना आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध करावयाचे हा विडा प्रत्येक गायक - गायिकेने उचलला होता. त्यांची गाणी श्रवण करताना त्या त्या गाण्यांच्या आठवणीत प्रेक्षक रमून गेले.   ज्येष्ठ गायक आणि गायिकांच्यात सुधीर फडके, भीमसेन जोशी, लता - आशा, सुमन कल्याणपूर, अशांचा कळत नकळत भास देखील झाला. विश्‍वास डोंगरे  सेम टू  सेम बाबूजी   होते. विजय पंतवैद्य, मुकुंद पेठे, मधुकर देसाई, माया कुळकर्णी, विद्या पेठे, राधा पेठे, संगीता  जोगदंडे, नंदा देसाई, कांचन गुप्ते, वैशाली जोशी यांचा सहभाग होता. प्रामुख्याने उल्लेख करावयाचा तर प्रिया राजे या ज्येष्ठ नागरिक गायिकेचा. गाणं म्हणताना गायक गायिकेने एन्जॉय  कसं  करावं हे त्यांनी दाखवून दिलं. प्रतिभा सराफ यांनी सुद्धा गाणी गायली तसेच त्यांच्या संयोजनाने सहभाग कार्यक्रमास एक दिशा बहाल करून दिली. अशा कार्यक्रमास निवेदन सुद्धा ज्येष्ठ निवेदकांचे असल्यामुळे त्यांच्या निवेदनातून नाटकीपणा जाणवला नाही तर मुकुंद सराफ आणि डॉ. रश्मी फडणवीस या निवेदकांच्यात  त्या त्या गाण्याचा त्यांचा अभ्यास होता हे विशेष जाणवले. एवढ्या ज्येष्ठ नागरिकांना जे गायक - गायिका होते त्याना घेऊन कार्यक्रमाची निर्मिती करावयाची ही कठीण गोष्ट. पण ती यशस्वी करून सगळ्यांनी दाखवली हे विशेष. म्हणून  देठ की हो हिरवा  या कार्यक्रमाचे प्रयोग त्या कलाकारांना सांभाळून महाराष्ट्रभर करावेत जेणेकरून त्या त्या वयोगटातील कलाकारांना त्यापासून स्फूर्ती घेता येईल. आणि हो वृद्धाश्रमात जे सध्या वास्तव्य करून आहेत त्यांच्या समोर जर असे कार्यक्रम झाले तर त्यांना जगण्याची नक्कीच नवी  उमेद येईल. विनीत गोरे आणि कौंतेय देशपांडे यांनी फक्त मनावर घेणे उचित ठरेल.

Post a Comment

 
Top