Add

Add

0

    प्रेक्षकांना मिळणार अधिक सुस्पष्ट अनुभव

 पुणे (प्रतिनिधी):-आपल्या प्रेक्षकांना प्रत्येक कार्यक्रमातून मनोरंजनाचा खजाना देणारी झी मराठी वाहिनी आता एच डी रुपात आपल्या भेटीस येत आहे त्यामुळे मनोरंजनासोबतच अधिक सुस्पष्ट चित्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभवही प्रेक्षकांना घेता येणार आहे. एचडी तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाच्या दुनियेला एक नवी ओळख मिळाली आहे अशीच नवी ओळख आता झी मराठीच्या मालिकांमधूनही जपली जाईल या एचडी रुपातून. नवी ओळख, नवं स्टेटस असं ब्रीद असलेली झी मराठीची ही एचडी वाहिनी येत्या 20नोव्हेंबरला सायंकाळी 7पासून प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होणार आहे. स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या अभिनयाने सजलेला मुंबई-पुणे-मुंबई २ या चित्रपटाच्या झी मराठी प्रीमियरने या एचडी वाहिनी
ची सुरुवात होणार आहे.
या नव्या एच डी रुपाबद्दल क्लस्टर हेड शारदा सुंदर म्हणाल्या की, “आपल्या प्रेक्षकांसाठी एच डी वाहिनी देणे ही भविष्यातील बदलाची नांदी आहे  असे आम्ही मानतो. झी समूहाने यापूर्वीच प्रादेशिक वाहिन्यांमध्ये झी टॉकीजची एच डी वाहिनी सुरु केली आणि आता झी मराठी आणि झी बांगला या दोन एचडी वाहिन्या सुरु करतोय याचा आम्हाला विशेष आनंद आहे. झी मराठी वाहिनी कायमच प्रेक्षकांना दर्जेदार मालिका आणि कार्यक्रम देत आली आहे. आता या कार्यक्रमांसोबतच प्रेक्षकांना एचडीचं तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार रुप बघायला मिळेल ज्याद्वारे त्यांचा आनंद दुपटीने वाढेल असा आम्हाला विश्वास आहे.”
झी मराठीच्या या नव्या एचडी  रुपाबद्दल या वाहिनेचे बिझनेस हेड निलेश मयेकर म्हणाले की, “ही आमच्या साठी गौरवास्पद बाब आहे. आमच्या सर्वच कार्यक्रमांतून आम्ही कुटुंब आणि त्यातील नाती जपण्याची गोष्ट सांगतो. प्रेक्षकांनासुद्धा ही गोष्ट खूप आपलीशी वाटते त्यामुळेच  प्रेक्षक आमच्याशी भावनिकरित्या जोडले गेलो आहोत. मराठी प्रेक्षकांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीत आमची महत्त्वाची भूमिका आहे असे आम्ही मानतो शिवाय ही एक मोठी जबाबदारी आहे याचीही आम्हाला जाणीव आहे. झी मराठी एचडीद्वारे आता आम्ही या नव्या बदलाचं आणि तंत्रज्ञानाचं भविष्य समजल्या जाणा-या या रुपाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. आपल्या रसिक प्रेक्षकाला त्यांच्या रोजच्या आयुष्यात मनोरंजनासोबतच सुस्पष्ट चित्रांचा, आकर्षक रंगाचा आणि उच्च दर्जातील ध्वनीचा मोहक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.”

सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि एचडी तंत्रज्ञान हे या युगाचं भविष्य असणार आहे. या बदलाच्या नांदीची आता सुरुवात झाली आहे. केवळ टीव्हीच नाही तर आता मोबाईल फोन्समध्येही हे एचडी तंत्रज्ञान रुजायला सुरुवात झाली आहे. अधिक चांगलं चित्र, आवाजाचे वेगवेगळे इफेक्ट्स यांनी सजलेली मालिका, चित्रपट बघण्याची मागणी प्रेक्षकांमधूनही वाढत आहे. झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं असलेलं निरपेक्ष प्रेम आणि यावरील सर्वच मालिकांची लोकप्रियता बघता मनोरंजनाचा हा खजिना एचडीमध्ये उपलब्ध करुन आपल्या चाहत्यांना मनोरंजनाची पर्वणी देण्याचा उद्देश झी मराठी एचडी वाहिनीचा असणार आहे. झी मराठीचे लोकप्रिय कार्यक्रम आता नियमित वाहिनीसोबतच या एचडी वाहिनीवरुन बघायला मिळतील. ही एचडी वाहिनी सध्या डिश टीव्ही आणि टाटा स्काय वर उपलब्ध होणार असून अतिरिक्त शुल्क देऊन ही वाहिनी प्रेक्षकांना बघता येईल.

Post a Comment

 
Top