Add

Add

0
"हसण्यासाठी जन्म आपुला,' हे तत्त्वज्ञान स्वतः शेवटच्या क्षणा पर्यंत जगले आणि जगालाही तसं करण्यासाठी प्रेरित केले, ते म्हणजे बापू घावरे. आज बापूंची लौकिक अर्थाने ओळख व्यंग्य चित्रकार म्हणून आहे. आणि तीच कायम राहील,यात कोणतीही शंका नाही. बापू इहलोकीची यात्रा संपवून स्वर्गलोकात हास्याचे मळे फुलवायला गेले.मला नक्की माहीत आहे की,ते तेथेही "शिम ग्याची सोगं' घेऊन आपला "हास्यकट्टा' रंगात आणतील.
मिसरूड फुटायच्या वयात माझा या सेवानिवृत्त व्यक्तीशी स्नेह जुळला आणि बापू माझे मार्गदर्शक व मित्रही झाले.माझ्या आठवणीनुसार सन 2004 च्या अखेरीस बापूंची माझी पहिली भेट झाली. सध्या सन 2016 च्या अखेरीचा काळ सुरू आहे. म्हणजे एका तपाच्या कालावधीचा बापूंचा आणि माझा स्नेह.
पत्रकारितेत प्रवेश केल्यानंतर अनेक दिग्गजांशी ओळख झाली. त्यातील बापू एक. पण बापू सर्वांपेक्षा निश्‍चितच वेगळे होते. अगदी पापभीरू माणूस. बापूंची भेट काय नियमित होत नसे. पण आमच्यात एक मस्त "ट्युनिंग' जुळली होती. प्रत्येक भेटीवेळी बापूंची एक नवीन ओळख मला व्हायची. त्यामुळे "अष्टपैलू' हे विशेषणही त्यांच्यासाठी कमीच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
सुरवातीला माझ्यासाठी बापू म्हणजे एक व्यंग्यचित्रकार, एवढीच ओळख होती. पण; नंतर नंतर त्यांच्यातील शिक्षक, लेखक, कलाकार, व्याख्याता असे अनेक गुण कळायला लागले. बापू मूळचे मुळशीकर. बेलवडे गावचे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याचा शेजार असूनही मुळशीत शिक्षणाचा अंधार होता.परंतु; तरीही 60 वर्षा पूर्वीच्या काळात बापूंनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. अनंत अडचणींवर मात करून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे पुणे जिल्हा शिक्षण मंडळात त्यांनी शिक्षक म्हणून सुरवात केली. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात त्यांनी ज्ञानदानाचे मोठे कार्य केले. मुळात शिक्षणाविषयी त्यांना आस्था होती. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांची धडपड होती. त्यासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. ते विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. कारण, जो शिक्षक विद्यार्थिप्रिय असतो, तो स्वतः विद्यार्थ्यांपासून दूर राहू शकत नाही. त्यामुळेच बापूंनीही सेवानिवृत्तीनंतरच्या काळातही विद्यार्थ्यांमध्ये रमायचे ठरवले. त्यासाठी जिल्हा शिक्षण मंडळानेही त्यांना संधी दिली. त्यातून बापू विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनासाठी जिल्हाभर फिरत होते. एवढेच नव्हे तर बापू पौडमधील विक्रांत वाल्हेकर यांच्या झील शाळेतही लहान मुलांना चित्रकला शिकविण्यासाठी जात असतं.
एका भेटीवेळी बापूंनी सांगितलेले, मुलांमध्ये राहून फार आनंद मिळतो. एवढेच नव्हे तर त्यांनी सांगितलेले की, त्यांच्या कथेतील काही विनोदी प्रसंग हे शाळेतील मुलांमध्ये घडलेले किस्से आहेत. त्यावरून बापू सभोवतालचे बारकावे किती छान टिपायचे, हेच दिसते. एकंदर बापू म्हणजे हाडाचे शिक्षक होते. आणि शेवटपर्यंत राहिले.
बापूंनी शिक्षकी पेशातच आपल्यातील कलाकार ओळखला, जोपासला आणि फुलविलाही. त्यांनी सांगितलेले की, सुरवातीच्या काळात तेथील मुख्याध्यापकांनी व इतर सहकारी शिक्षकांनी प्रेरणा दिल्यामुळे ते लिहिते झाले.
बापू ग्रामीण भागातील लोकांशी एकरूप झाले होते.त्यातून त्यांच्या कथेतील पात्रेही तीच झाली.त्यांच्या कथांतून अस्सल ग्रामीण विनोद पाहायला मिळतो.
बापूंची खरी ओळख ही व्यंग्यचित्रकार म्हणून आहे. मुळशीसारख्या दुर्गम भागातील हा माणूस व्यंग्यचित्रांच्या जगातील एक मानाचे पान झाला. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत नक्कीच सलाम ठोकण्यासारखी आहे. त्यांच्या व्यंग्यचित्रांमध्ये गुदगुल्या करणारे फटकारे होते. त्यांच्या चित्रांतून समाजातील वाईट गोष्टींवर भाष्य होत असे, परंतु त्यात एक गोडवा होता. त्यांनी चित्रांतून कधी कोणाची टर उडवली नाही. पण गोड शब्दांत डागण्या दिल्या. एकंदर त्यांनी आपल्या कलेशी इमान राखले.
"सकाळ'मध्ये गुदगुल्या पुरवणीसाठी बापूंनी व्यंग्यचित्रे रेखाटली.त्यामुळे बापूंची आणि माझी नियमित चर्चा होत असे. बापूंचा गेली वर्षा- दोन वर्षाचा काळ तसा आजारातच गेला. त्यामुळे बापू ज्यावेळी "सकाळ'मध्ये चित्र घेऊन येत, त्यावेळी त्यांना सुचवले, "बापू तुम्ही मेल करत जावा,तुमची दगदग वाचेल.' त्यानुसार बापूंनी मेल पाठवण्यास सुरवात केली, परंतु तरीही माणसात रमणारा हा दिलदार माणूस खास भेटीसाठी वेळात वेळ काढून हमखास येणारच. ते म्हणायचे, "असं माणसात आलं की माणूस असल्यासारखं वाटतं...'
विशेष म्हणजे बापू एक कार्यकर्ता म्हणूही आदर्श होते. बापू नियमितपणे "बालगंधर्व'च्या कलादालनात त्यांच्या व्यंग्यचित्रांचे प्रदर्शन भरवायचे. त्यासाठी या वयातही ते निमंत्रणपत्रिका छापण्यापासून कलादालनात चित्रे लावण्यापर्यंतची सर्व कामे स्वतः करायचे. आमच्या मुळशी पत्रकार संघाचे ते सन्माननीय मार्गदर्शक होते. तरीही ते पत्रकार संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणूनच कार्यरत असायचे.बापू स्वतः काम कर तायेत म्हटल्यावर बाकीच्या कोणालाही "काम करा,' असे सांगायची गरज लागायची नाही. त्यांच्यातील कार्य कर्ता त्यांना कधी स्वस्थ बसू देत नव्हता. प्रत्येक सणाला आशीर्वादरूपी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा भल्या सकाळी फोन येत असे. असा फोन आता येणार नाही. पण त्यांची सदिच्छा नेहमीच सोबत असतील. त्यांनी लिहिलेल्या कथा आणि रेखाटलेली चित्रे नक्कीच ओठांवर हसू फुलवतील...
असे आमचे बापू म्हणजे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी...
बापूंना_विनम्र_अभिवादन...
                                                                                                                                      निलेश शेंडे 

Post a Comment

 
Top