Add

Add

0


शिर्डीच्या साईबाबा संस्थानासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थानाचे अध्यक्षपद स्वीकारून आता 100दिवस होत आले आहेत. या काळात आपल्याला शिर्डीत कोणत्या गोष्टी जाणवल्या?
सर्वात आधी मला ही जबाबदारी सोपविल्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
एक अनुभव मला यासंदर्भात सांगावासा वाटतो. तीन वर्षांपूर्वी मी शिर्डीला गेलो होतो, त्यावेळी मी सामान्य नागरिकांच्या रांगेत परिवारासह उभा होतो. गर्दी खूप होती. लोटालोटी, ढकलाढकली, आरडाओरडा सुरू होता. जेव्हा समाधीस्थानाजवळ आम्ही पोहोचलो तेव्हा इतकी गर्दी झाली की, आम्ही त्या गर्दीच्या रेटारेटीने बाहेर फेकले गेलो आणि बाबांचे दर्शन काही झाले नाही.
मी बाहेर आलो, दुःख वाटत होतं, वैतागही आला होता. तेव्हा पत्नीला सांगितलं की, ‘‘ही माझी शेवटची शिर्डी भेट, यापुढे मी काही शिर्डीला येणार नाही.’’पण जेव्हा चार-साडेचार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि रावसाहेब दानवे यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की, ’’तुम्हाला आम्ही शिर्डीची जबाबदारी देण्याचा विचार करीत आहोत.’’ तेव्हा मी त्यांना माझ्यासोबत घडलेली ही घटना सांगितली. म्हणालो की, ‘‘तुम्ही माझा विचार का करता आहात यासाठी? मला ही जबाबदारी का देत आहात?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘बघा कदाचित बाबांचं बोलावणं असेल आणि त्याचा तुम्ही विचार करा.’’ तेव्हा मीही विचार केला आणि जबाबदारी स्वीकारली.
मात्र मी आहे विज्ञानाचा विद्यार्थी, चमत्कारावर माझा काही विश्‍वास नाही. पण तीन वर्षांपूर्वी मी शिर्डीला परत कधीही येणार नाही, असे ठरवून तिथून बाहेर पडलो आणि बरोबर तीन वर्षांनी मला बोलावणं आलं. मी अशी एक जबाबदारी घेऊन शिर्डीला जात आहे की, मी तिथून बाहेर पडू शकत नाही, अशी अवस्था आहे माझी. तर आता याला चमत्कार नाही तर काय म्हणायचे?
जेव्हा मी शिर्डीला पहिल्यावेळेस गेलो तेव्हा साई मंदिराचा आवाका माझ्याही ध्यानात आला नव्हता. नंतर  अनेक लोकांशी बोललो. त्यांनाही मंदिराच्या आवाक्याचं आकलन नसल्याचं लक्षात आलं. आता तिथे रोज जवळपास 50 ते 60 हजार साईभक्त दर्शनाला येतात, रोज तेवढेच भक्त प्रसादालयाचा लाभ घेतात. जनरल आणि सुपर स्पेशालिटी अशी 550बेडची दोन मोठी रुग्णालये तिथे आहेत. दरवर्षी सुमारे साडेपाच लाख लोकांना यातून रुग्णसेवेचा लाभ होता. तिथे   संस्थानची एक कन्याशाळा, इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनिअर कॉलेज आणि आयटीआय आहे. साडेपाच हजार विद्यार्थी या सर्व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेतात. संस्थानचा एकूण कर्मचारीवर्ग जवळपास सहा हजार आहे. सुमारे 500 ते 550 कोटींची संस्थानची वार्षिक उलाढाल आहे.
एवढा मोठा आवाका लक्षात आल्यानंतर आपल्या मनात सर्वप्रथम कोणता विचार आला?
पहिल्यांदा मला असं वाटलं की, हे एक आव्हानात्मक काम आपल्याला देण्यात आलं आहे आणि मी ते आव्हान स्वीकारलं. शिर्डीतील माझा अनुभव आणि एकूणच शहरातून फिरताना जाणवलं की, सर्वप्रथम आपल्याला भक्तांच्या सोयी-सुविधांचा विषय सोडविला पाहिजे. जो काही विचार आपण शिर्डी संस्थानबद्दल करू किंवा ज्या काही योजना आखू त्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी साईभक्त असायला हवा. मी जो काही जिव्हारी लागणारा अनुभव घेतला तो अनुभव इतर कुठल्याही साईभक्ताला येऊ नये, असं माझ्या मनाने ठरवलं. यावर काय उपाय करता येतील याचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की, या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी ‘इलेक्ट्रॉनिक क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीम’ हा उपाय आहे. तसेच टाईम दर्शन हे उत्तरही यातून सापडलं.

हे नेमके तंत्रज्ञान काय आहे?
शिर्डीत जे रेल्वेस्थानक, बसस्थानक, निवासालय, आश्रमशाळा आहेत या ठिकाणी आणि एण्ट्री पॉईंटलाच 100 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन बुथ असतील. येथे भक्तांची नोंदणी होईल. फोटो काढला जाईल, त्याची बायोमॅट्रिक माहिती घेतली जाईल. नाव, गाव,मोबाईल क्रमांक तिथे टाकला जाईल. त्यानंतर त्याचा बायोडाटा जनरेट होईल आणि तो दर्शन पासवर चिकटवला जाईल.या दर्शन पासवर त्याची दर्शनाची वेळ असेल. समजा, दुपारी साडेतीनची वेळ जर त्याला मिळाली, तर त्याने दिवसभर इतरत्र फिरावं, आपली कामं करावी, सकाळपासून रांगेत उभं राहण्याची त्याला आवश्यकता नाही. साडेतीन वाजता त्याने जावं, दर्शन घ्यावं. अशा रितीने साईभक्तांना लवकरात लवकर दर्शन मिळेल. यापुढे रांगेत दिवसभर लोक ताटकळत उभे राहिले आहेत, अशी परिस्थिती तिथे दिसणार नाही. यामुळे रांगेतली गर्दी कमी होणं आणि गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल, एका वेळी उभ्या राहणार्‍या भक्तांची संख्या खूप कमी असेल. हे फायदे होतील. याचबरोबर भक्तांनाही शिर्डीत उतरल्या उतरल्या रांगेत उभे राहण्याची जी घाई होते, धावाधाव होते, लवकर दर्शन होण्याची जी चिंता असते ती राहणार नाही. यासाठी सर्वप्रथम आम्ही हा निर्णय घेतला आणि ही जी प्रणाली आहे ती येत्या 1 डिसेंबरपासून तिथे कार्यान्वित होईल.
साईबाबांच्या दर्शनाला बाल-माता, वृद्ध, दिव्यांग आणि रुग्णही येतात, त्यांच्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे?
दुसरा विषय जो माझ्या लक्षात आला तो म्हणजे ज्यांच्याकडे छोटं मूल आहे, त्या महिलांचा. तिथे या महिला रांगेत राहूनच आपल्या मुलांना पाजत होत्या. ते पाहून असं वाटलं की, ही परिस्थिती या महिलांसाठी त्रासदायक आहे. त्यामुळे आम्ही लगेचच एक ‘बेबी फिडिंग’ रूम तिथे तयार केली. तसेच ज्या महिलांकडे छोटं मूल आहे, त्यांना रांगेत थांबू न देता त्यांच्या कुटुंबीयांसह थेट दर्शनाची व्यवस्था केली. आणखी एक विषय म्हणजे, तिथे काही वयोवृद्ध व्यक्ती दिसल्या, ज्या काठी टेकत-टेकत रांगेत उभ्या होत्या. तेव्हा या व्यक्तींना चार ते पाच तास रांगेत उभे राहणे त्रासाचे होत असेल. त्यामुळे बाबांच्या दर्शनासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या अटेंडंटसह थेट दर्शनाची व्यवस्था आम्ही केली. याबरोबरच काही रुग्ण, दिव्यांग व्यक्ती होत्या, अशा सर्वच रुग्ण आणि दिव्यांग व्यक्तींसाठी आम्ही थेट दर्शनाची व्यवस्था केली. दर्शनरांगेत लोकांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते, त्यांच्या आरोग्याचीदेखील सुविधा करायला हवी, म्हणून एक डॉक्टर आणि काही औषधांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला.
भक्तांना दर्शन रांगेचा त्रास होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत?
दर्शन सभागृहातले पंखे वाढवायचे आहेत. जे दर्शन हॉल आहेत, त्यात भरपूर प्रकाश येईल, हवा खेळती राहील, याचा विचार करून खिडक्या बदलणे, पंखे अधिक लावणे आणि भक्तांना आरामदायक वाटावे, यासाठी हॉल वातानुकूलित करणे, असा निर्णय आता आम्ही घेतलेला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तिथे नव्हती. लोक बाटलीबंद पाणी तिथे विकत होते. त्यामुळे आता ’आरओ वॉटर प्युरिफायर प्लान्ट’ तेथे उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लवकरच तिथून भक्तांना शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात येईल. रांगेचा त्रास होऊ नये म्हणून तिथे आधी चहा-कॉफी विक्रीची व्यवस्था होती. त्याऐवजी आम्ही चहा, कॉफी, दूध, बिस्किटे  सर्व भक्तांना मोफत दिले जातील, अशी व्यवस्था केली आहे.व्हीआयपी दर्शनव्यवस्था तिथे शिफारसीवर आहे, त्याविषयी काय नवीन निर्णय घेण्यात आले आहेत?
‘व्हीआयपी दर्शन पास’ अशी एक व्यवस्था तिथे आहे, आधीपासूनच ती व्यवस्था तिथे अस्तित्वात होती, परंतु हा दर्शनाचा पास ज्यांच्याकडे आमदार, खासदार, मंत्री यांची शिफारस असेल त्यांनाच मिळत असे. तसेच बरेच लोक याचा गैरफायदा घेत असल्याचेही माझ्या लक्षात आले. त्यामुळे भक्त आणि बाबा यात भगवंताचे दर्शन घेण्यासाठी तिसर्‍याची किंवा शिफारशीची काय गरज आहे, असा विचार करून आम्ही ती पद्धत बंद केली. आता तिथे मागेल त्याला अशाप्रकारे दर्शन पास द्यायला सुरू केले. ‘ऑनलाईन दर्शन पास’ देण्याचीही व्यवस्था सुरू केली. या सुविधेमुळे खूप भक्त सुखावले. आरती, अभिषेक, दर्शन सर्व व्यवस्था शिफारसीविना व ऑनलाईन केल्या.
शिर्डीला भक्त येतात पण तिथे भक्तीमय किंवा सांस्कृतिक वातावरण जाणवत नाही. याचा आपण कसा विचार केला?
भक्त जेव्हा शिर्डीत जातो, तेव्हा केवळ दर्शन घेतलं आणि त्यानंतर थोडावेळ बसला आणि असा कोरडाच घरी परत निघून गेला, असे न होता, तो भक्तिभावाच्या वातावरणात न्हाऊन निघावा, भक्तीचा ओलावा त्याला मिळायला हवा, असा विचार मनात आला. शेगावच्या धर्तीवर सेवेकरी योजना शिर्डीतही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. याच अनुषंगाने विचार करता असं लक्षात आलं की, इथे जागा आहे, पण सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्था नाही, व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. तेव्हा आम्ही तिथे एक जागा निवडली, स्टेज तयार केले, खुर्च्या लावल्या, अशी व्यवस्था केल्यानंतर साईभक्त, कलावंत यांना आवाहन केलं. रोज दुपारी 4 ते 6आणि रात्री 7.30 ते 9.30 असे दोन टाईम स्लॉट निश्‍चित केले आणि रोज दोन सांस्कृतिक, सामाजिक, साईभक्तीपर, नैतिक मूल्यशिक्षण, भजन-कीर्तनाचे कार्यक्रम, विविध विषयांवर व्याख्यान व्हावे, असं ठरवलं आणि हे कार्यक्रम सुरू केले. आतापर्यंत तिथे वर्षातून 35 कार्यक्रम होत असत. पण आता रोज दोन कार्यक्रम असे 365 दिवस मिळून 730 कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत. यामुळे आता एक चांगली आणि भक्तीमय वातावरणनिर्मिती तिथे होत आहे.
मंदिरात येणार्‍या, दर्शनरांगेत उभ्या राहणार्‍या भक्तांचे स्वागत करण्यावर कशाप्रकारे भर देण्यात आला आहे?
भक्तांसोबत सिक्युरिटी गार्ड अथवा इतरांचे जे गैरवर्तन होत असे, या विषयावर विचार केला आणि हे थांबविण्याचा आम्ही निर्णय घेतला. कोणीही भक्ताला धक्का मारायचा नाही, हात लावायचा नाही, असुविधा करायची नाही आणि भक्तांचं स्वागत केलं पाहिजे, असं ठरवलं. म्हणून काही कर्मचार्‍यांना रांगेत उभे करून प्रत्येक भक्ताला गंध-टिळा लावायचा, नमस्कार करायचा, स्वागत करायचं आणि त्याला पुढे जाण्यास प्रोत्साहित करायचं, असं सांगितलं. याचा एक भावनिक वातावरण निर्मितीसाठी खूप फायदा झाला.
साई मंदिरात निर्माल्यही खूप जमा होते, त्यावर काय उपाययोजना केली?
एक प्रश्‍न असा उपस्थित झाला की, रोज भक्त बाबांना हार-फुले अर्पण करतात, त्यांची संख्या जवळपास एक टन एवढी होती, तर यांचं करायचं काय? आपल्याला खतनिर्मितीचा कारखाना सुरू करता येईल आणि त्या खताचा वापर अथवा विक्री करता येईल, असाही विचार मनात आला. पण नंतर आम्ही असा विचार केला की, साईबाबांना अर्पण केलेली ही फुले जर भक्तांनाच प्रसाद रूपात परत दिली आणि जे हार आहेत, त्यांचा देणगीदारांचे स्वागत करण्यासाठी उपयोग केला, तर मग कसं राहील? तो प्रयोग सुरू केला, तर त्याला भक्तांची मागणी खूप वाढली. ते स्वतःहून फुलं मागायला येऊ लागले आणि ज्यांचा सन्मान, स्वागत पुष्पहार घालून केले, ते सुखावले आणि पहिल्यांदाच असं घडत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. ते हार त्यांनी मोठ्या आनंदाने आपल्या घरी नेले. म्हणजे जी समस्या वाटत होती, त्याचे समाधानात रूपांतर झाले.
मंदिराच्या माध्यमातून चालणारी वैद्यकीय सेवा मोठी आहे. याबाबत आपण काय नव्या योजना हाती घेतल्या आहेत?
शिर्डीत तीन-चार प्रकारची मोठी सेवा कार्ये चालतात, आरोग्य, शिक्षण आणि अन्नदानाचे. तिथे जी आरोग्यसेवा आहे, त्याबद्दल मी जेव्हा अनेकांशी बोललो तेव्हा अनेकांना तिथे दोन मोठी रुग्णालये असल्याचे माहितीच नसल्याचं आढळलं. तिथे एक जनरल आणि एक सुपर स्पेशालिटी अशी दोन रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जातात. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कार्डिऍक शस्त्रक्रिया, न्युरॉलॉजी, नेफ्रॉलॉजी, स्पाईन, ऑर्थोपेडिक अशा सगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याचबरोबर ज्या रुग्णांकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड आहे, त्यांच्यासाठी या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध आहेत. जेवणाचाही त्या रुग्णांना आणि नातेवाईकांना खर्च येत नाही. जवळपास साडेपाच लाख रुग्णांना दरवर्षी या सेवेचा फायदा होतो. असे लक्षात आले की, दवाखान्यातल्या मशिनरी खूप जुन्या झाल्या आहेत. एमआरआय, सिटीस्कॅन इ. मशिनची मेन्टेनन्स कॉस्ट त्याच्या डेप्रिशिएटेड किमतीपेक्षा कितीतरी जास्त आहे. अशा सर्व मशिनरी बदलून नव्या घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लवकरच हॉस्पिटल्स अत्याधुनिक होतील. याशिवाय त्या ठिकाणी दहा ऍम्बुलन्स हॉस्पिटल्स आहेत. रुग्णांची ने-आण करण्यासाठी त्यांची मदत होते. तसेच तिथे फिरत्या दवाखान्यांची व्यवस्था आहे. आजूबाजूच्या गावात हे दवाखाने विनामूल्य सेवेसाठी फिरत असतात. डॉक्टर आणि औषधे विनामूल्य तिथे उपलब्ध असतात.
थॅलेसेमियाच्या रुग्णांना ब्लड डायलिसिस मोठ्या प्रमाणात तिथे केले जाते आणि त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की, तिथे मोफत डायलिसिस केले जावे. आता तिथे विनामूल्य ही सेवा पुरवली जाते. भक्तांचं रक्तदान शिबीर तिथे दर गुरुवारी आणि रविवारी आयोजित केलं जातं. भक्त मोठ्या प्रमाणात तिथे रक्तदान करतात. त्यावेळी असं लक्षात आलं की, थोड्या वेळातच रक्तपेढी रक्त साठवण क्षमता पूर्ण होते. भक्तांना सांगायला लागतं की, आता रक्तदान थांबवा. यावर आम्ही असा विचार केला की, जसे तिरुपतीला गेल्यानंतर केशदान केलं जातं तसंच शिर्डीला किंवा साईमंदिरात गेल्यानंतर रक्तदान ही एक परिपाठी आपण प्रचलनात आणावी आणि अनेकांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की, याला भक्तांचा चांगला प्रतिसाद लाभेल. आपल्या रक्तपेढीची क्षमता ही मर्यादित आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील अनेक रक्तपेढ्यांना याच्याशी जोडण्याचा विचार आम्ही केला. लवकरच अशा रक्तपेढ्यांचं संमेलनही शिर्डीत आयोजित करण्यात येणार आहे. यात प्रत्येकाला महिन्यातला एक वार वाटून दिला जाईल, या दिवशी त्या रक्तपेढ्यांनी यावं, रक्तदान शिबीर आयोजित करावं, असा उपक्रम राबविणार आहोत. यामुळे सगळ्या रक्तपेढ्यांना हवे तेवढे रक्त दानातून त्या ठिकाणी मिळू शकेल, असा एक प्राथमिक अंदाज आमचा आहे आणि पुढे जाऊन दर गुरुवारी रक्तदान आणि अन्नदान हे दोन्ही कार्यक्रम प्रत्येक साई मंदिरात जगभरात आयोजित करण्यात यावेत, जेणेकरून रक्ताची जी कमतरता आहे, ती साईभक्तांकडून पूर्ण होईल, अशी योजना आहे.
साईबाबा मंदिर हे शिर्डीचे मुख्य आकर्षण आहे. मंदिराने शहराच्या नेमक्या कोणत्या जबाबदार्‍या उचलल्या आहेत?
शिर्डीमध्ये जिकडे-तिकडे कचरा साठलेला दिसला आणि ‘शिर्डी शहर स्वच्छ-सुंदर हरित शहर’ करावं, असा एक विचार चर्चेला आला; परंतु प्रश्‍न असा निर्माण झाला की, शहरातला कचरा टाकण्यासाठी जागाच नाही. आतापर्यंत लोकांनी शहरातून कचरा उचलला आणि कोरड्या विहिरींमध्ये टाकला, त्यामुळे ज्या सहा-सात कोरड्या विहिरी होत्या त्या सगळ्या बुजल्या गेल्या. खड्डे खोदून त्यामध्ये कचरा टाकला, तेदेखील बुजले गेले. याला पुन्हा एक तंत्रज्ञानातून उपाय काढला पाहिजे, असा विचार केला आणि म्हणून ‘सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्लान्ट’ त्या ठिकाणी टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला. अनेक ठिकाणी मी स्वतः जाऊन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला.प्लान्टस् बघितले. वेगवेगळी टेक्नॉलॉजी वापरली जाते,कुठे प्लॅस्टिकचे ऑईलमध्ये रूपांतरण करणे किंवा या सगळ्या कचर्‍याला कॉम्पॅक्ट करून त्यापासून विटांची निर्मिती करणे किंवा राखेची निर्मिती करून त्या राखेचा रस्ते बांधण्यासाठी उपयोग करणे, असे अनेक प्रयोग केले जातात. पण मी नुकताच सोलापूरला गेलो होतो. तिथे सोलापूर महापालिकेने एक आधुनिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्लान्ट आपल्या शहरात उभारलेला पाहिला, जो मला खूप आवडला.400 टन प्रतिदिन कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची क्षमता या प्लान्टची आहे. त्यामध्ये सगळा कचरा एकत्र आणला जातो. कचर्‍याचे बारीक तुकडे केले जातात, त्यानंतर त्यातले प्लॅस्टिक, कागद, पिशव्या वेगवेगळे केले जाते. माती वेगळी केली जाते. लोखंड आणि मेटल वेगळे केले जाते आणि राहिलेला बायोडिक्रेडेबल जो वेस्ट आहे तो बायोगॅस प्लान्टमध्ये टाकून त्यातून बायोगॅस निर्माण केला जातो आणि गॅस टर्बाईनच्या माध्यमातून त्याचं इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतरण केले जाते. ही वीज ग्रीडच्या माध्यमातून पॉवर ग्रीडमध्ये पसरवली जाते आणि राहिलेले खत विकले जाते. हा प्लान्ट मला आर्थिकदृष्ट्याही किफायतशीर वाटला.
या प्लान्टमध्ये महापालिकेने फक्त नऊ एकर जागा एका प्रायव्हेट कंपनीला दिली. प्लान्टमधील गुंतवणूक या कंपनीने केली. कंपनीने 85 कोटींचा हा प्लान्ट 29 वर्षांसाठी बीओटी तत्त्वावर सुरू केला. आता हा प्लान्ट तिथे गेली चार वर्षे चांगल्याप्रकारे सुरू आहे. यामध्ये कामगारांची गरज कमी असून फक्त 12 कामगार त्या प्लान्टमध्ये काम करीत आहेत आणि 400 टन प्रति दिवस क्षमतेचा हा प्लान्ट आहे. यात महापालिकेला एक रुपयाचाही खर्च येत नाही. फक्त कचरा आणून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मी जेव्हा कंपनीशी याबाबत बोललो तेव्हा असं लक्षात आलं की, 29 वर्षे हा प्लान्ट ते ऑपरेट करतील आणि 14ते 15वर्षांतच त्यांनी यासाठी जो खर्च केला आहे, तो रिकव्हर होईल. यात निर्माण झालेले खत फर्टिलायझर कंपन्यांना विकले जाते, तर प्लॅस्टिक, लोखंड, मेटल हेही विकले जाते.
या प्लान्टबद्दल अधिक काय सांगता येईल आणि शिर्डीत असा प्लान्ट कशाप्रकारे उभारण्यात येणार आहे?
माझा जो अंदाज होता की, Garbage should become an asset not liability आणि पुढच्या काही वर्षांमध्ये मोठे कॉर्पोरेट उद्योजक या व्यवसायात यावेत आणि तुमचा कचरा आम्हाला द्या, अशी स्पर्धा यातून सुरू व्हावी, अशी एक परिस्थिती निर्माण होईल. अशाच टेक्नॉलॉजीचा प्लान्ट शिर्डी येथे टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. शिर्डीत जो कचरा निघतो, तो शहरातला 12टन आणि मंदिराचा पाच टन असा17 टन दर दिवसाचा कचरा तयार होतो. भविष्यातली गरज लक्षात घेता एक 40टन प्रतिदिन क्षमतेचा प्लान्ट त्या ठिकाणी टाकावा, अशाप्रकारे योजना आता सुरू आहे. आणि मंदिर खर्च करेल, व्यवस्थापनही करेल.
विमानतळासाठी 50 कोटी मंदिराने तिथे दिलेले आहेत. विमानतळ तयार झालेले आहे.तिथे लवकरच याची चाचणीही घेतली जाईल आणि जानेवारीआधी विमानतळ सुरू होईल,असा एक अंदाज आहे.आता जो अंदाज आहे, त्यानुसार मुंबई ते शिर्डी प्रवासाचे पाच ते सहा हजारांच्या दरम्यान त्याचं तिकीट असेल. त्यामुळे सहा-सात तासांचा प्रवास वाचू शकेल.
मंदिराच्या माध्यमातून चालणार्‍या शैक्षणिक सेवाकार्याबाबत काय माहिती द्याल?
या ठिकाणी शैक्षणिक सेवाकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सहा हजार विद्यार्थी साईसंस्थानच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार शिक्षण घेत आहेत. मुलांची स्वतंत्र शाळा आहे. इंग्लिश मीडियम स्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे आणि आयटीआय आहे. ही चार शैक्षणिक केंद्रे आहेत. याते ह अत्याधुनिक आयटीआय आहे. 11ट्रेडस् त्यात आहेत. साडेचारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि एकमेव आयटीआय आहे. जिथे सर्व प्रवेश हे ऑनलाईन होतात. कुणाचीही शिफारस तिथे चालत नाही आणि एकमेव असा आयटीआय आहे जिथून 90 टक्के प्लेसमेंटस् होतात. साईबाबांचे जे भक्त आहेत, ज्यांच्या इंडस्ट्रीज आहेत ते प्लेसमेंटसाठी येतात आणि या मुलांना आपापल्या कंपन्यांमध्ये जॉबसाठी ते घेऊन जातात. ही आणखी एक वाखाणण्यासारखी बाब या ठिकाणी आहे.
साई संस्थानच्या माध्यमातून रोज हजारो भक्तांना मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते, याबाबत काय नवीन योजना आहेत?
मंदिराचे एक भव्य असे प्रसादालय आहे. यात दररोज सुमारे 50 हजार ते एक लाख भक्त भोजन करतात. सर्व स्वयंपाक सोलर कुकिंगच्या साहय्याने केला जातो. येथील सोलर हिटींग सिस्टीम पाहण्यासारखी आहे. या सिस्टीमला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. स्वतःचे पीठ मळणी यंत्र, पिठाची गिरणी व पोळ्या बनविण्याची मशीन आहे. मशीनमधून दर तासाला 20 हजार पोळ्या तेल लावून बनविल्या जातात. अन्नदान हे साईबाबांच्या सेवाकार्यातील अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे, ते सर्वच साई मंदिरात सुरू असते.
मंदिराला मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता असते, तर याबाबत काही योजना आहेत का?
मंदिर आणि प्रसादालय व सर्वच वास्तूत वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचे प्रमाण जवळपास आठ मेगावॅटपर्यंत आहे आणि म्हणून ग्रीड एनर्जी आपण स्वत: निर्माण करावी, अशा मताचा मी आहे. मंदिराच्या माध्यमातून दोन मेगावॅटचा एक विंडमिल पॉवर प्लान्ट सध्या कार्यान्वित आहे आणि ही वीज महावितरणला दिली जाते. रुफ टॉप सोलर पॉवर आणि ग्राऊंड लेव्हल सोलर पॉवर प्लान्ट दोन्ही पर्याय तिथे खुले आहेत. एक दहा मेगावॅट क्षमतेचा सोलर पॉवर प्लान्ट टाकावा, अशा पद्धतीने विचार सुरू आहे. जेणेकरून मंदिराची जी एनर्जी येईल, त्यातून मंदिर एनर्जीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल.
संस्थानच्या वतीने रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत, याबाबत काय माहिती सांगाल?
500 रुग्णवाहिकांचा प्रोजेक्ट मंदिराच्या वतीने घेण्यात आलेला आहे. सर्व साईभक्तांना आवाहन करण्यात आलं की, आपल्या आईवडील, प्रियजनांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण एक रुग्णवाहिका साई मंदिराला दान करावी आणि ती साई रुग्णवाहिका असेल. दात्याचे नाव त्या रुग्णवाहिकेवर टाकलं जाईल आणि स्वयंसेवी संस्थांना चालविण्यासाठी या रुग्णवाहिका दिल्या जातील. महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागात या रुग्णवाहिका दिल्या जातील. यात संस्थांनी 25 टक्के रक्कम भरायची आहे आणि दात्याने 75टक्के रक्कम त्यात भरायची आहे. आणि या सर्व रुग्णवाहिका संस्थांच्या मालकीच्या असतील. त्या चालविण्याची, त्यांची मेंटेनन्सची जबाबदारी ही संस्थांचीच असेल. सगळ्या रुग्णवाहिकांसाठई कंट्रोलरूम शिर्डीमध्ये स्थापन केलं जाईल आणि ‘साई ऍप’च्या माध्यमातून या सगळ्या रुग्णवाहिका जोडल्या जातील. ‘जीपीएस चीप’ प्रत्येक रुग्णवाहिकेला असेल, त्यातून त्यांचे ठिकाण कंट्रोलरूमला कळेल. आणि ‘ऍप’च्या माध्यमातून प्रत्येक भक्ताला आपल्या जवळच्या रुग्णवाहिकेला बोलाविण्याची सुविधा त्या ‘ऍप’च्या माध्यमातून उपलब्ध असेल.
आपण केलेल्या आवाहनाला भक्तांकडून कशाप्रकारे प्रतिसाद मिळाला?
आनंददायी चित्र असं आहे की, भक्तांना जेव्हा आवाहन करण्यात आलं तेव्हा पहिल्या आवाहनातच अडीचशे भक्तांनी रुग्णवाहिका देण्याची आपली इच्छा व्यक्त केली आणि लवकरच 500रुग्णवाहिका देणार्‍यांची यादी तयार होईल. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांची यादी तयार केली जाईल. यात रजिस्टर्ड एनजीओ असणे गरजेचं असेल आणि ते ऑपरेट करू शकतील, अशी आर्थिक स्थिती असल्याचे त्यांना सिद्ध करावे लागले.
साई मंदिरे जगभरात उभारण्यात आली आहेत, तर याबाबत पुढे काय योजना आखल्या आहेत?
आता एक विषय असा आहे की, साईंचा भक्तपरिवार हा जगातील सगळ्यात मोठा भक्त परिवार आहे. सद्यस्थितीचा विचार केला, तर असं लक्षात येतं. देशभरात तीन हजारांपेक्षा जास्त साई मंदिरांची संख्या आहे. देशाच्या बाहेर 400पेक्षा जास्त साई मंदिराची संख्या आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणावर मंदिरांची संख्या असणारा आधुनिक संत दुसरा कुठलाही नाही. या परिवाराचा कोणी ’मुव्हर’ असा दिसत नाही. यामुळे साईबाबांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी फिरला आणि साई मंदिर निर्माण करण्यात मोठा हातभार लावला, असं काही दिसत नाही. म्हणजे याची मूव्हमेंट करणारा मूव्हर कोण? तर साईबाबा हे स्वत:च मूव्हर आहेत, असा निष्कर्ष त्यातून आपल्याला काढायला लागतो. एकट्या अमेरिकेत 20 पेक्षा जास्त साई मंदिरे आहेत. मलेशियामध्ये 22 साई मंदिरे आहेत, तर दक्षिण आङ्ग्रिका, श्रीलंका, जर्मनी, जपान, इंग्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोपमध्ये दक्षिण अमेरिकेत अशी जगभर साई मंदिरे आहेत आणि म्हणून या सर्व साई मंदिराचे एकत्रितपणे नेटवर्क तयार करणे, हे एक मोठं आव्हान साई संस्थानने स्वीकारलेले आहे.
या सगळ्यात सुसूत्रीकरण करण्यासाठी काय केले जाणार आहे?
11 आणि 12 डिसेंबर,2016 रोजी ‘ग्लोबल साई टेम्पल समिट’ याचे आयोजन शिर्डीमध्ये करण्यात आलेले आहे. जगभरातून तीन हजारांपेक्षा जास्त विश्‍वस्त या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत आणि पहिल्यांदा असा हा प्रयोग होत आहे की, साई मंदिरांचे आपापसामध्ये नेटवर्किंग, साई मंदिरांची पुढील काळातील दिशा कशी असावी. एकंदरित मंदिरांचे काम समाजाभिमुख कसे करता येईल आणि सेवाभिमुख कसे करता येईल, यावर विचारविनिमय केला जाईल. काही न्यूनतम कार्यक्रम सर्व साई मंदिरांसाठी देण्याचा विचार आहे. जेणेकरून या मंदिराचं ‘सोशल ओरिएंटेशन-कम्युनिटी ओरिएंटेशन’  होईल. प्रत्येक साई मंदिराने रक्तदान शिबीर आयोजित करावे. आरोग्यसेवेचे कार्यक्रम घ्यावेत. शिक्षणक्षेत्राचे संस्काराचे कार्यक्रम घ्यावेत. अनुदानाचे कार्यक्रम घ्यावेत. यासोबत अर्बन डोनेशन अशा प्रकारचे चार-पाच आवश्यक आणि गरजेचे कार्यक्रम प्रत्येक साई मंदिराला दिले जातील. हे पाच कार्यक्रम प्रत्येक साई मंदिराला अनिवार्य असे दिले जातील. तर अन्य पाच कार्यक्रम स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन आयोजित करण्यास सुचवले जातील. एक सामाजिक आणि सेवाभावी असा चेहरा सर्व साई मंदिरांचा व्हावा, अशा प्रकारे ही योजना आखण्याचा विचार सुरू आहे.
देशभरातील सर्वच धार्मिक संस्थांमध्ये मंदिरांव्यतिरिक्त कुठल्या न कुठल्या प्रकारचे प्रकल्प आहेत ज्यातून भावनिर्मिती होते. शिर्डीत असे काय करता येईल?
आज अशी परिस्थिती आहे की, शिर्डीच्या ठिकाणी मंदिर दर्शन झाल्यानंतर थांबण्यासाठी प्रबोधनात्मक, थोडाशा रंजक अशा कार्यक्रमांची काही व्यवस्था तिथे नाही. साईसृष्टीचा प्रकल्प त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये वेगवेगळी दालने असतील आणि चलचित्रांद्वारे,‘लाईट ऍण्ड साऊंड शो’च्या माध्यमातून साईचरित्र भक्तांसमोर प्रस्तुत करण्यात येईल. या भव्य-दिव्य अशा सृष्टी प्रकल्पाचंही नितीन देसाई डिझाईन करत आहेत. आणि 100 ङ्गुटी उंच अशी साईबाबांची मूर्ती त्या दालनामध्ये असेल. आणि भक्त दोन-अडीच तास भव्य साईदृष्टी प्रकल्पामध्ये रमून जाईल.  साईचरित्राचं पूर्ण अवलोकन त्याला होईल. यासोबतच एक ‘साई लेझर शो’चं आयोजन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
फवार्‍यांच्याद्वारे डान्सिंग फाऊंटन आणि फाऊंटन्सच्या माध्यमातून एक हजार वॉटर गार्डन तयार करून त्यावर साईबाबांच्या चरित्रातले काही भाग ‘लेझर शो’च्या माध्यमातून दाखविण्यात येतील आणि एका वेळी पाच हजार भक्त हा शो बघू शकतील, अशा स्टेडियमची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येईल. यालाच लागून विद्यार्थ्यांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टी निर्माण करण्यात येईल, त्यामध्ये ऍस्ट्रॉनॉमीचे वेगवेगळे शोज, मुव्हीज त्या ठिकाणी दाखविण्यात येतील आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सर्व शाळा कॉलेजेसना त्याचा फायदा होईल. स्टार गोईंग गॅलरी त्या ठिकाणी निर्माण करण्यात येईल. एका रांगेत 25 उच्च क्षमतेचे टेलिस्कोप लावून विद्यार्थी रात्रीच्या वेळी आकाशदर्शनाचा आनंद घेऊ शकतील.
तुसाद म्युझियमच्या धर्तीवर वॅक्स म्युझियम तिथे निर्माण करण्यात येईल आणि देशभरातील, विविध प्रांतातले जे संत होऊन गेलेले आहेत त्या संतांचे मेणाचे पुतळे त्या ठिकाणी उभारण्यात येतील.
याशिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निळवंडे धरणातून शिर्डीसाठी करून देण्याचा निर्णय झालेला आहे. बायपास रोड आणि एक रोड नेटवर्क शिर्डी आणि शिर्डीच्या आजूबाजूचा भाग असा डेव्हलप करण्याचा निर्णय झालेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मदतीने पुढील वर्षात येणारा ’साई समाधी शताब्दी महोत्सव’ साजरा करण्याची योजनाही मोठ्या प्रमाणावर होत आहे. या शताब्दीमध्ये देश-विदेशातून साईभक्त शिर्डीला कसे येतील त्यांची मार्ग आखणी, मोठ्या प्रमाणावर  साईभक्त दर्शनासाठी येतील, तेव्हा त्याची कुंभमेळ्याच्या धर्तीवर निवासाची व्यवस्था, दर्शनाची व्यवस्था लावण्याची तयारी सुरू आहे. मध्ये जेव्हा आपण शहर स्वच्छ केलं, तसंच हरित शहर करण्यासाठी रस्त्यांचे दुभाजक आणि सर्कल्सजवळ वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
साई समाधी शताब्दी वर्षदेखील जवळ येत आहे, त्यात आपण काय करणार आहात?
11-12 डिसेंबरच्या समिटमध्ये जगभर साईसमाधी शताब्दी कशी साजरी होईल, याबाबत चर्चात्मक स्वरूपात कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. 12डिसेंबरला ‘इंटरनॅशनल साई टेम्पल समिट’असा दिवस ठेवला आहे. देशा बाहेर साई मंदिरातील पूजापद्धती कशी आहे,  यावर विचारविनिमय करून या सर्व पद्धती स्टँडर्डाईज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून जगभर एका पद्धतीने साई मंदिरांची पूजा-अर्चना-दर्शन अशी व्यवस्था आणि सेवाकार्य व्हावीत. तसेच पालखीयात्रा हे साईभक्तीचे विशेष अंग आहे. देशभरातून पालख्या शिर्डीला वर्षभर येत असतात. तेव्हा साई समाधी शताब्दी वर्षात देशातील 16प्रमुख ठिकाणांहून ज्यात जम्म-काश्मीर, आसाम, बंगालही असेल आणि विदेशातील काही ठिकाणेही असतील. येथून साईरथ शिर्डीत आणले जातील. वाटेत येणार्‍या साईमंदिरांत ते थांबतील व एका दिवशी सर्व रथ शिर्डीत पोहोचतील.2018च्या दसर्‍याला साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा 2017-18 या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जगभर होईल आणि सर्वत्र साईमय वातावरणाची निर्मिती होईल. या वर्षभरात सुमारे साडेचार कोटी भक्त शिर्डीला येतील, असा प्राथमिक अंदाज आहे व त्यानुसार तयारी सुरू आहे.
                                                                                                  -किरण शेलार

Post a Comment

 
Top