चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी आनंद तांबे, सतीश गडाळे, कारभारी चंद्रशेखर बोरकर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, भाजयुमोचे माजी अध्यक्ष मोरेश्वर भोंडवे आदी उपस्थित होते. मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगण (देऊळ मळा) चिंचवडगाव येथे ९ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत होणा-या या समाधी महोत्सवादरम्यान अनेक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्‌घाटन शुक्रवारी दि. 9 सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी हभप शांती ब्रह्म मारुतीबुवा कु-हेकर, राज्यमंत्री विजय शिवतरे, राज्यलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटर्वधन, आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. अभय टिळक, देहू देवस्थानचे विश्वस्त सुनील मोरे यांच्या बरोबर महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, मनपा आयुक्त दिनेश वाघमारे, खा.श्रीरंग बारणे, खा.अमर साबळे, आ.लक्ष्मण जगताप, आ.गौतम चाबुकस्वार आणि आ.महेश लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे प्रवचन, भजन व सुगम संगीत कार्यक्रम अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रसिद्ध गायिका विभावरी प्रभुदेसाई, प्रसिद्ध गायक व पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य जयतीर्थ मेवुंडी व अशा अन्य नामवंत गायकांचे कार्यक्रम होणार आहेत.