Add

Add

0

दिव्यांगांसाठीच्या जागतिक दिनानिमित्त बाल मेळावा संपन्न

          पुणे(प्रतिनिधी):- शुन्य ते सहा वर्षे वयोगटात अपंगत्वाचे निदान झाल्यास त्यावर योग्य उपचार करणे शक्य होते. लहान वयातील अपंगत्वावर योग्य उपचार केल्यास साधारणपणे सहा वर्षानंतर अपंग मूल सर्वसामान्य मुलांप्रमाणेच शिक्षण घेणे शक्य आहे, असे प्रतिपादन अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी आज येथे केले.
   दिव्यांगांसाठीच्या जागतिक दिनानिमित्त समाज कल्याण विभाग व बाल कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कल्याण संस्थेच्या आवारात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उपस्थित दिव्यांग मुले-मुली व त्यांना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, प्रसिध्द तबला वादक अरविंद मुळगांवकर, अभिनेत्री डॉ.तेजा देवकर, राधिका देशपांडे व प्रकाश रत्नपारखी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले की, शासनातर्फे दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्या त येतात. राज्यामध्ये दिव्यांगांसाठी 729 विशेष शाळा चालविण्यात येत असून सुमारे 530 कोटी रुपयांचे अनुदान खर्च होते. सहा वर्षानंतर दिव्यांग मुले शिक्षण घेण्यासाठी विशेष शाळांमध्ये येतात. परंतु, यापुढे लहान वयातच दिव्यांगांना विशेष शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग मुलाचे पालक, शिक्षक, परिचारीका व संस्थांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याबद्दल शासन स्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मोल मजूरी करणाऱ्या पालकांना त्यांचे दिव्यांग मुल विशेष शाळेमध्ये दाखल करता यावे यासाठी त्यांच्या मजूरीची भरपाई करण्याची योजना शासन तयार करणार असल्याचे ते म्हणाले.
  दिव्यांगांना विशेष शिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगून, ग्रामिण भागात हे कार्य मोठया प्रमाणावर व्हावे अशी सूचना श्री.पाटील यांनी यावेळी केली. यासाठी खाजगी, स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यात सुरु असलेल्या विशेष शाळांची लवकरच तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगून विशेष शाळांच्या विकासासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सेरेब्रल पाल्सी व ऑटीझमग्रस्त बालकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून बाल कल्याण संस्थेने दिव्यांगांसाठीच्या केलेल्या कार्याचे यावेळी अपंग आयुक्तांनी कौतुक केले.
     संस्थेचे मानद सचिव प्रतापराव पवार यांनी आपल्या भाषणात संस्थेने केलेल्या कार्याची व भविष्यात संस्थेतर्फे हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कलागुण व मनोरजंनाबरोबरच दिव्यांगांना सामान्य आयुष्य  जगता यावे यासाठी संस्था कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                संस्थेमधील विद्यार्थी संदीप भालेराव यांनी कायर्क्रमाचे सूत्रसंचलन केले तर व्यवस्थापिका अपर्णा पानसे यांनी आभार मानले.
पुरस्कार वितरण व कलागुण दर्शन कार्यक्रम संपन्न... 
          जागतिक अपंग दिनानिमित्त यावेळी भरत चव्हाण, ओंकार चौधरी व निलेग बागुले यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध शाळांतील दिव्यांग मुला-मुलींनी कलागुण दर्शन कार्यक्रम सादर केला. नृत्य, गायन, वाद्य वाजवणे, योगासन करणे आदी कलागुण यावेळी दिव्यांगांनी सादर केले.
                या कार्यक्रमास दिव्यांग मुले-मुली, त्यांचे पालक, संस्थेचे शिक्षक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

000000

Post a Comment

 
Top