Add

Add

0


कुपोषणवर काम करण्यासाठी मनापासून जिद्द आणि तळमळ असायला पाहिजे. कारण हे काम काही एक किंवा दोन वर्षांचे नाहीतर त्यासाठी बरेच वर्ष मेहनत घ्यावी लागते. हे लक्षात घेऊनच ठाण्याच्या डॉ. सुजाता आणि त्यांच्या स्वास्थ्यसेविका भोपोली या गावासह २५ गावांमध्ये आणि जवळपास १५० पाड्यांमध्ये काम करत आहेत. पुढील पाच वर्षांत ही गावे कुपोषणमुक्त करण्याचा त्यांचा निर्धार असून त्यांनी त्यादृष्टीने देखील प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या परिसरातील महिलेची प्रसूती कुठेही होवो पण त्यांची नऊ महिने काळजी डॉ.सुजाता आणि त्यांच्या स्वास्थ्यसेविका घेत असतात. त्यांची औषधे, आहाराविषयीच्या सूचना यांच्याकडे डॉ.सुजाता यांची करडी नजर असते.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुपोषण निर्मुलनाचा ध्यास घेतलेल्या डॉ. सुजाता यांनी दहिसर, माहूल आदी भागातील झोपडपट्टीमध्ये देखील आरोग्य सुधारणेवर काम केले आहे. त्यांच्या या कार्याबाबत अधिक जाणून घेऊया नेट भेट च्या माध्यमातून...

1. आपण गेली अनेक वर्षे कुपोषण निर्मुलनासाठी कार्य करत आहात. कुपोषणाकडे आपलं लक्ष कसं वेधलं ?
तसं पाहिलं तर माझं वैद्यकीय शिक्षण सुरू असतांना मी या क्षेत्रात काम करावं असं काही ठरवलं नव्हतं. पण जेव्हा माझ्या गुरूंच्या नावाने असेलेल्या डॉ.एम.एल.ढवळे ट्रस्ट मध्ये काम करायला लागले तेव्हा नेहमी असं वाटायचं की आपणही ग्रामीण भागात जाऊन काम करायला पाहिजे. कारण डॉ. ढवळे हे नेहमी सांगायचे की कुपोषणाच्या क्षेत्रात काम करणं खूप आवश्यक आहे. अचानक डॉ. ढवळे यांचे निधन झाल्याने आम्ही या ट्रस्टची स्थापना केली आणि आम्ही सर्वजण या क्षेत्रात काम करायला लागलो. माझे गुरू नेहमी आम्हाला सांगायचे की, विद्यार्थी आणि रुग्णांकडे पैसे नाहीत म्हणून त्यांच्यावर उपचार करायचा नाही असे जीवनात कधीच करायचे नाही. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो आणि ते ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. तेव्हापासून मी या प्रश्नाकडे पाहायला लागले आणि मला पालघर जिल्ह्यात काम करायची संधी मिळाल्याने मला आदिवासी बांधवांच्या जवळ जायची संधी मिळाली. काम करत असतांना मला जाणवलं की त्यांना खूप समस्या आहेत. पण त्यात कुपोषण ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने मी या क्षेत्रातच काम करायचे ठरवले.

2. या क्षेत्रात काम करण्याच्या अनुभवाविषयी सांगा ?
समाजासाठी काम करण्याची इच्छा होती आणि ती संधी मला ढवळे ट्रस्टने दिली. काही वर्षांपूर्वी पालघर डहाणू या भागांमध्ये मोठी रुग्णालये नसल्याने ग्रामीण भगातील लोकांना खूप समस्या निर्माण होत होत्या. पण तरी देखील अनेक जण उपचारासाठी एवढ्या लांबूनही पायपीट करत, हालअपेष्टा सहन करत येत असत. मी त्यांच्यावर उपचार करत असतांना ते मला नेहमी म्हणत बाई आम्हाला एवढ्या लांब येणं शक्य नसतं तर तुम्हीच आमच्या तिकडे का येत नाहीत. तेव्हा मी ठरवलं की आपण त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याशी एकरुप होऊन त्यांना सेवा द्यायला पाहिजे. मग आमचा विक्रमगडचा प्रवास सुरू झाला.

3. कुपोषण म्हणजे नेमके काय असे आपल्याला वाटते ?
माझ्या मते मूल जन्माला आल्यावर त्याची ठरावीक पद्धतीने जी वाढ होणे अपेक्षित असते ती न होणे म्हणजे कुपोषण आहे. कुपोषणाचे अनेक टप्पे आहेत ज्यामध्ये त्याच्या श्रेणींचा समावेश होतो. कुपोषणामध्ये प्रामुख्याने पोषण कमी पडल्यामुळे मुलांचे वजन कमी होते, त्यांची वाढ होत नाही. मुलाचे हाड, स्नायु कमकुवत म्हणजेच ठिसूळ बनतात, त्याची त्वचा खराब होते. जर मूल सहा वर्षांपर्यंत कुपोषित असेल तर दगावण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तसं पाहिलं तर कुपोषणाची सुरूवात मुळात गर्भातच होत असते म्हणून गर्भावस्थेपासूनच मातेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

4. कुपोषण होण्यामागची काय काय कारणे सांगता येतील ?
तसं पाहिलं तर कुपोषणाची अनेक कारणे आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे आदिवासी क्षेत्रातील महिलांना गर्भावस्थेत पुरक आहार मिळत नसल्याने देखील कुपोषण होते. तसेच भौगोलिक परिस्थिती देखील त्याला कारणीभूत आहे. कारण आदिवासी पाडे खूप दुर्गम भागात असल्याने रस्त्यांच्या सुविधा असतीलच असे नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत वैद्यकीय सेवा पुरविणे अवघड जाते परिणामी ते यापासून वंचित राहतात. तसेच आदिवासी बांधव शेतीवर अवलंबून असल्याने शेतात काम नसल्यास मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत असल्याने आरोग्य सुविधांपासून वंचित राहतात. आहाराविषयी जागरुक नसल्याने देखील ही समस्या निर्माण होते. लहान वयात लग्न झाल्यामुळे मुलींचीच शारीरिक वाढ नीट झालेली नसल्याने जन्माला येणार मुलही कुपोषितच असते. प्रामुख्याने ही कारणे सांगता येतील.

5. आपण आदिवासी क्षेत्रात या समस्येवर कशाप्रकारे काम करता ?
सर्वप्रथम त्यांच्या मध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे महत्वाचे असल्याने आम्ही त्यांना याबाबत मार्गदर्शन करतो. गरोदर मातांच्या सर्व तपासण्या करतो. तपासणीनंतर त्यांना आवश्यक असणाऱ्या आयर्न, कॅल्शीअमची औषधे देतो. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना कुपोषणाविषयी माहिती देतांना हेच सांगतो की बाळ जन्माला आल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा ते पोटात असतानाच त्याची काळजी घेतली तर पुढच्या समस्या निर्माण होणार नाहीत.

6. आपण आदिवासी क्षेत्रातील मातांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यावर ज्याप्रमाणे लक्ष दिले त्याचप्रमाणे बालकांच्या कुपोषणाकडे देखील तेवढेच लक्ष दिले. याबाबत काय सांगाल ?
बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण स्वत:ची काळजी घेऊ शकतो पण बालकांचे तसे नसते. ते पूर्णपणे आईवर अवलंबून असते. यासाठी आम्ही तिच्या आईला याबाबत मार्गदर्शन करतो. बाळाच्या जन्मानंतर काय काय काळजी घ्यायला पाहिजे, त्यांना काय आहार देणे गरजेचे आहे याविषयी मातेचं समुपदेशन करतो. लहान मुले ही देशाचे भावी नागरिक असल्याने सुदृढ असायलाच पाहिजे. त्याच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, शेवगा, पपई, पेरु, चिक्कू यांचा समावेश करण्याचे महत्व आम्ही सांगतो. कारण हे सर्व फळे, पालेभाज्या त्यांच्या परिसरातच उपलब्ध होणारे आहेत. यासाठी आम्ही आदिवासी भागातील गांव-खेडे तसेच पाड्या-पाड्यात जाऊन मार्गदर्शन केले. सुरूवातीला आम्हाला थोडा त्रास झाला पण जेव्हा आमच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांना होऊ लागला तेव्हा अनेक माता आमच्याकडे येऊन मार्गदर्शन घ्यायला लागल्या. हा खूप मोठा बदल आहे. म्हणून आम्ही सर्वप्रथम त्यांना समुपदेशन करण्याचे काम केले.

7. आपण आजपर्यंत अनेक आदिवासी रुग्णांवर उपचार केले आहेत या अनुभवाविषयी काय सांगाल?
खूप चांगला अनुभव आहे हा. कारण सुरूवातीला आम्हाला थोडा त्रास होत होता पण कालांतराने आम्ही त्यांच्यामध्ये एकरुप झालो. ते देखील आम्हाला सहकार्य करत असत. पूर्वी आरोग्याच्या सुविधांविषयी ते जागरुक नव्हते. आम्ही दिलेल्या गोळ्या, औषधं ते खड्यात पुरून टाकत असत पण त्यांना आम्ही त्याचे महत्व समजावून दिले. विशेष म्हणजे त्यांना देखील उपचारानंतर फरक जाणवू लागल्याने ते आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत.

8. आदिवासी बांधवांच्या उपचारासाठी आरोग्यसारथी तुम्ही गावागावांत कार्यरत केल्या आहेत. त्या काय काय काम करतात ?

1990 मध्ये त्यांनी पालघर आणि आसपासच्या गावांमध्ये कामाला सुरुवात केली ते आजतागायत सुरूच आहे. तेथे काम करताना त्यांना गावा-गावांत अनेक समस्या जाणवल्या. त्यातील प्रमुख समस्या होती रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये दुवा नसण्याची, डॉक्टरवर विश्वास निर्माण व्हावा याचीच. यातूनच आदिवासींमधूनच स्वास्थ्यसेविका तयार करण्याचा मार्ग सुचला. त्या काळात पाडे न् पाडे पालथे घातले. तेथील काही आदिवासी महिलांना विश्वासात घेऊन तयार केले आणि त्यांना आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्याचे शिवधनुष्य उचलले. आज ट्रस्टच्या 50 स्वास्थ्यसेविका विक्रमगड तालुक्यात कार्यरत आहेत. या स्वास्थ्यसेविकांना किरकोळ आजारांत औषधोपचार करणे, आपत्कालीन प्रसंग ओळखून डॉक्टरांशी संपर्क साधणे, गर्भवती महिलांना गोळ्या देणे अशा गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येते.

9. कुपोषण निर्मुलनाव्यतिरिक्त तुम्ही कोण-कोणते उपक्रम राबवता ?
सेंद्रिय शेती करण्यास तेथील लोकांना उद्युक्त करणे, पर्यावरण जाणीव व संवर्धन या दृष्टीने रानभाज्या मेळावा सुरू करणे अशा अनेक उपक्रमांचे आम्ही आयोजन करतो. ग्रामसभा, शाळेत मुलांसाठी व खास महिलांसाठी सभा घेणे, समाज प्रबोधनाचे काम करणे, याबरोबरच व्यसनमुक्ती करणे अशा अनेक कामांमध्ये आम्ही मार्गदर्शन करतो. हे काम एकटीचं नाही तर इथवर येईपर्यंत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाच्या सहभागातूनच झालं आहे याचा आवर्जुन उल्लेख करेल.

-जयश्री श्रीवास्तव

Post a Comment

 
Top