Add

Add

0
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्ष पाहत आहे. त्यादृष्टीने भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे 'मास्टर माईंड' म्हणून ओळखले जाणारे 'लॅपटॉप मॅन' उर्फ सारंग कामतेकर यांनी व्यूहरचना देखील आखली आहे. त्यात आता स्वतः सारंग कामतेकर यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केल्याने अनेकांच्या 'भुवया' उंचावल्या असून सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे.
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले सारंग कामतेकर हे एकेकाळी माजी खास दार गजानन बाबर यांचे अत्यंत 'निकटवर्तीय' म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर ते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या 'खास' मर्जीतले झाले आहेत. सध्या जगताप कोणताही निर्णय कामतेकरांना विचारल्याशिवाय घेत नाहीत असे त्यांचेच निकटवर्तीय खासगीत सांगतात. 'लॅपटॉप' हे कामतेकरांचे मोठे शस्त्र आहे, सध्या ते भाजपमध्ये शहर सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
सारंग कामतेकर हे गेली २० वर्षे राजकारणात आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकार्‍यांना 'सळो की पळो' करून सोडले आहे. स्थायी समिती, पर्यावरण विभाग, तसेच वायसीएम रूग्णालयातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी चव्हाट्यावर आणली आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीत कामतेकर यांनी स्वतः निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर ते इच्छूक असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. भोसरीतील प्रभाग क्रमांक 8 मधून ते खुल्या गटातून इच्छूक आहेत. या प्रभागात इंद्रायणीनगर, मोशी प्राधिकरण, बालाजीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा या भागाचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथून टाकण्याच्या दिशेने भाजपने वाटचाल सुरू केली आहे. स्वतः शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप कंबर कसून मैदानात उतरले आहेत. जगतापांच्या साथीला आता भोसरीचे आमदार महेश लांडगे हे देखील आले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांचे 'हौसले बुलंद' झाले आहेत. म्हणूनच स्वतः सारंग कामतेकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरविले असल्याचे समजते.

Post a Comment

 
Top