Add

Add

0

 …. राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया


 पुणे(प्रतिनिधी ):- नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणूकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी; तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम हाती घ्यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज येथे दिले.
            पुणे जिल्हयात 10 नगरपरिषद व नगरपंचातींच्या निवडणुकींची प्रक्रिया सुरु आहे. या निवडणूक पक्रियेचा आढावा घेण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, महानगरपालिका आयुक्त कुणालकुमार, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, आयकर विभागाचे अतिरिकत संचालक के.के.ओझा, आयकर उपसंचालक डॉ.एस.आर.स्वामी, अतिरिक्त  पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे यावेळी उपस्थित होते.
            श्री.सहारिया म्हणाले की, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, निवडणूकीसंदर्भातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर करवाई केली जाईल. कायदा व सुव्यस्थेचाही आढावा बैठकीत त्यांनी घेतला. मतदार जागृती करताना मतदानाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच वस्तु अथवा पैशाच्या स्वरुपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारु वाटपावर नजर ठेवणे; तसेच बहुसदस्यीय पध्दतीनुसार आवश्यक तेवढी मते देणे याबाबतदेखील मतदारांमध्ये जागृती करावी. मतदारांमध्ये विश्वास निर्माण व्हावा व त्याच्यावर उमेदवारांकडून दबाव टाकला जाणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या सूचना श्री.सहारिया यांनी केल्या.
            दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या पुणे जिल्हयातील नगरपालिका निवडणुकीसाठी 10 नगराध्यक्ष पदांसाठी 68 उमेदवार निवडणूक रिंगणात असून  223 जागांसाठी 826 उमेदवार रिंगणात  असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील माहिती नागरिकांना व्हावी यासाठी शपथपत्रातील माहितीचा गोषवारा वृत्तपत्रांमधून तसेच मतदान केंद्र परिसरात नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी यावेळी दिली.
            आढावा बैठकीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त सतिश वाघमारे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपायुक्त कविता द्विवेदी, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय समन्वय अधिकारी उत्तम पाटील, निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदिश मोरे, नगर पालिका शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघी,  जिल्हयातील निवडणूक निर्णय अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. 
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक

            पुणे जिल्हयात होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणूकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या  प्रतिनिंधीची बैठक राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज घेतली. निवडणूका निर्भय वातावरणात होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी होण्यासाठी राजकीय पक्षांची भूमिका महत्वाची आहे, असे सांगून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची दखल निवडणूक आयोगातर्फे घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top