Add

Add

0
मी, कर्नल विलास तांदळे, संचालक, सुरक्षा व दक्षता विभाग, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती संस्थे च्या वतीने अत्यंत विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, आज, रविवार, दि. 27/11/2016 रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे तत्त्वज्ञ संतशिरोमणी ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या 720 व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कार्तिकी एकादशीच्या वारीच्या निमित्ताने संस्थेच्या प्रथेप्रमाणे जागतिक सहिष्णुता व हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेच्या वतीने आळंदी येथे गेले 30 वर्षांपासून लोकशिक्षणाचे व लोकोपयोगी कार्य केले जात आहे. ‘प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण विकास’ तसेच इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर भव्य असे ‘संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्‍वर, संत सोपानदेव, संत  मुक्ताबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई आणि संत एकनाथ महाराजां’च्या नावे अत्यंत सुंदर व मजबूत असे हजारो वर्षे टिकतील अशा घाटांचे बांधकाम करण्यात आले आहे. 
अ दर महिन्याच्या वद्य एकादशीला संस्थेच्या वतीने विश्‍वरुप दर्शन मंचावरून कीर्तन, प्रवचन व भजनाचा तसेच लोकशिक्षणाचा कार्यक्रम सादर केला जातो. एकादशीचा फराळ व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून दररोज संध्याकाळी इंद्रायणी मातेची आरतीही संस्थेच्या वतीने करण्यात येते.
गेल्या अनेक वर्षांपासून या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्‍वर माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून कार्तिक त्रयोदशीला हजारो वारकर्‍यांकरिता काल्याचे कीर्तन व ‘महाप्रसाद वाटपा’ची व्यवस्था संस्थेतर्फे केली जाते, हे सर्वश्रुत आहे. दरवर्षी समस्त सर्वसामान्य भाविकभक्तांना जो काल्याचा प्रसाद वाटप केला जातो, हा वारकर्‍यांचा व भाविकभक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे प्रातिनिधीक स्वरूपामध्ये हा महाप्रसादाचा नैवेद्य अत्यंत श्रध्देने व भक्तिभावाने संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजीवन समाधीला अगदी दोन मिनिटात दाखवून नंतर तो मुख्य प्रसादामध्ये मिसळून सर्व भाविकभक्तांमध्ये व वारकर्‍यांमध्ये वाटप करण्यात येतो. हा वारकर्‍यांच्या भावनेचा, श्रध्देचा व निष्ठेचा विषय असल्यामुळे हा एक द्रोण भरून महाप्रसाद हे सर्व भाविकभक्त आपल्या गावी आणि घरी घेऊन जाऊन इतरांना श्रध्देने वाटप करतात व लाखो वारकरी जणू प्रत्यक्ष माऊलींचाच प्रसाद मिळाल्याची अनुभूती घेतात. 
ही परंपरा गेली अनेक वर्ष चालू आहे आणि संत ज्ञानेश्‍वर माऊली संस्थान व तेथील अधिकारी वर्ग व पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्याने दरवर्षी हा प्रातिनिधिक स्वरूपातील प्रसाद, समाधी सोहळ्याच्या दिवशी कार्तिक त्रयोदशीला सकाळी 10.30  ते 11 च्या दरम्यान संजीवन समाधी मंदिरात दाखवून मुख्य प्रसादामध्ये मिसळला जातो आणि दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संजीवन समाधीच्या काल्याचे कीर्तन व आरती झाल्यानंतर हजारो भाविकभक्तांना प्रसाद वाटप केला जातो. या प्रथेची आणि परंपरेची देवस्थानला व संपूर्ण आळंदीकरांना पूर्णपणे जाणीव आहे. 
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे हा काल्याचा प्रसाद संस्थेचे अध्यक्ष  स्वतः प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड आणि जगप्रसिध्द पखवाजवादक  ह.भ.प. श्री. उध्दवबापू शिंदे, ह.भ.प. श्री. नारायण महाराज उत्तरेश्‍वर पिंपरीकर, ह.भ.प. श्री सुदाम महाराज पानेगावंकर यांच्या पत्नी सौ. लताबाई पानेगांवकर तसेच संस्थेचे विश्‍वस्त श्री. तुळशीराम दादाराव कराड, डॉ. सौ. सुचित्रा नागरे आणि इतर काही मान्यवर आणि संस्थेचा अधिकारी वर्ग प्रसाद दाखविण्याकरिता गेले असताना महाराष्ट्र शासनाचे काही पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो आणि पोलीसांच्या सहकार्याने व त्यांच्या सुचनेनुसार मुक्ताबाई मंदिराच्या शेजारील एका तात्पुरत्या उभ्या केलेल्या कुलुप लावून बंद केलेल्या द्वाराजवळ संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजीवन समाधीला दाखविण्यासाठी आणलेल्या प्रसादाची ताटे घेऊन  थांबलो.
त्याच ठिकाणी देवस्थानचे असलेल्या कर्मचार्‍यांना वारंवार विनंती करून व पुढे काही हालचाल होत नाही पाहून मी स्वतः गाभार्‍यात गेलो व त्या ठिकाणी असलेले श्री. राजाभाऊ चोपदार यांचे चिरंजीव श्री. योगेश यांना मुक्ताबाई मंदिराजवळील दरवाजाचे कुलुप उघडण्याची विनंती केली.  त्याच्याजवळ ही चावी नाही असे सांगून तो, ‘मी कुलुपाची चावी घेऊन येतो’ असे म्हणून तो बाहेर गेला आणि तो परत फिरकला नाही. त्याचवेळी आमच्या संस्थेचे विश्‍वस्त व इतर पदाधिकारी, प्रा. सौ. स्वाती कराड-चाटे व श्री. दिलीप पाटील, श्री. संजय घुगे हे देवस्थानच्या ऑफीसमध्ये जाऊन श्री. अजित कुलकर्णी व समितीच्या इतर पदाधिकार्‍यांना माऊलीला प्रसाद दाखविण्याकरिता पुन्हा पुन्हा नम्रपणे विनंती करीत होते. स्वतः सौ. स्वाती कराड-चाटे यांनी श्री. अजित कुलकर्णी यांना  नमस्कार करून, ‘प्रा. कराड सर स्वतः प्रसाद घेऊन अर्धा-पाऊण तास  मुक्ताई मंदिराच्या शेजारील द्वाराजवळ थांबले आहेत, कृपा करून आम्हाला दोन मिनिटासाठी माऊलींच्या संजीवन समाधीला हा प्रसाद दाखविण्याची परवानगी द्या’ अशी विनंती करीत होत्या.  यावर आळंदी देवस्थानचे समितीचे श्री. अजित कुलकर्णी व त्यांचे पदाधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व ‘त्या कुलुपाची चावी आमच्या कोणाकडेही नाही, ते कुलुप उघडता येणार नाही आणि आमच्या मंदिराचे काल्याचे कीर्तन झाल्याशिवाय तुमचा प्रसाद समाधीला दाखविता येणार नाही’, असे  सांगितले. तुम्हाला जे करायचे ते करा, असे बोलून त्यांनी आमच्या विश्‍वशांती केंद्रांच्या प्रतिनिधींना बाहेर घालवून दिले. 
मधल्या काळामध्ये आळंदी देवस्थानच्या काही सेवकवर्गातील लोकांनी स्वतः कराड सर बराच वेळ प्रसाद घेऊन मुक्ताबाई मंदिराशेराजील कुलप लावलेल्या दारापाशी थांबल्यामुळे, ‘सर तुम्ही थांबा, आम्ही किल्ली घेऊन येतो, म्हणून त्यांनी किल्ली मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फळ ठरला. त्यामुळे देवस्थानच्याच काही कर्मचार्‍यांनी आळंदीतील काही ग्रामस्थांच्या मदतीने हा बंद केलेला दरवाजा कुलुप न तोडता, बांधलेल्या एक दोन दोर्‍या सोडून हा तात्पुरत्या स्वरूपात हा दरवाजा थोडा बाजूला सरकवला व प्रा. विश्‍वनाथ कराड आणि प्रसादाची ताटे घेतलेले इतर संस्थेचे मान्यवर यांना संजीवन समाधी मंदिरात सोडण्यात आले. 
इंद्रायणी नदीच्या तीरावरील ‘विश्‍वरूप दर्शन मंचा’वरील काल्याच्या कीर्तनाची समारोपाची वेळ जवळ आल्याने व बराच वेळ उशीर झाला असल्याकारणाने प्रसाद घेतलेली मंडळी, संजीवन समाधीला प्रसाद दाखवून त्वरीत बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. अर्धी अधिक मंडळी बाहेर पडल्यावर स्वतः प्रा. विश्‍वनाथ कराड आणि त्यांच्या पत्नी सौ. कराड व मुलगी डॉ. सौ. सुचित्रा नागरे आणि कराड सरांचे बंधू ह.भ.प. श्री. तुळशीराम कराड मंदिरातून बाहेर पडत असताना देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. अजित कुलकर्णी यांनी स्वतः व त्यांचे इतर सहकारी व 8-10 सेवक घेऊन कराड सरांना चोहोबाजूनी घेराव घातला आणि श्री. अजित कुलकर्णी यांने मोठ्याने ओरडून ‘कराड तुम्ही मंदिरात कुणाच्या परवानगीने आणि कुठून व कसे आलात?अ आणि आता तुम्ही बाहेर कसे जाता ते मी बघतो’. असे म्हणून कराड सरांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, अर्वाच्च भाषेत दमदाटी केली आणि ‘तुम्हाला परत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या मंदिरात पाऊल देखील टाकू देणार नाही. तुम्ही नेहमीच असे अरेरावीने वागता आणि घुसखोरी करता. आता आम्ही बघतो तुम्ही पुन्हा मंदिरात कसे येता. तुम्ही कोणाच्या परवानगीने तुम्ही इथे आत आलात’, अशा प्रकारची अरेरावीची अत्यंत उद्धटपणाची भाषा श्री. अजित कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली. 
यावर कराड सरांनी अत्यंत विनम्रपणे आमची काही चूक झाली असल्यास आम्हाला क्षमा करा. मी पुन्हा एकदा सांगतो की, असे रागवू नका, आमची आडवाआडवी करू नका, आम्हाला बाहेर पडू द्या, आमच्या घरची सर्व महिला व लहान मुलं  व वयस्कर बंधू आहेत व काही प्रतिष्ठित महाराज मंडळी आहेत. माऊलीच्या संजीवन समाधीला प्रसाद दाखवून झाला आहे. आता आम्हाला फक्त बाहेर जाऊ द्या, असे वारंवार विनवून देखील उलट श्री. अजित कुलकर्णी यांनी स्वतः व त्यांच्या सहकार्यांनी व सेवक वर्गानी कराड कुटुंबियांना चोहोबाजूनी घेराव करून कोंडी केली व बाहेर जाऊ देण्यासही मज्जाव केला. एवढेच नव्हेतर कराड सरांना स्वतः व कराड यांचे कुटुंबियातील महिला व सोबतच्या पदाधिकार्‍यांना धक्काबुक्की करून, मारहाण केली. एका कीर्तनकार महिलेच्या दंडावर काठीने मारहाण केली आणि पोलीस खात्यातील काही जाणकार पदाधिकार्‍यांनी प्रा. कराड सरांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला असता, देवस्थानच्या पदाधिकार्‍यांनी त्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास मागेपुढे पहिले नाही आणि हे सर्व होत असताना स्वतः श्री. अजित कुलकर्णी व त्यांचे सहकारी हे पुन्हा पुन्हा विश्‍वशांती केंद्राच्या पदाधिकार्‍यांवर धावून जात होते व धक्काबुक्की करत होते. तरीही स्वतः प्रा. कराड सर,  हे माऊलींचे मंदिर आहे, या ठिकाणी असे प्रकार घडणे योग्य नाही, असे वारंवार विनवणी करून देखील श्री. अजित कुलकर्णी यांनी व त्यांच्या काही सहकार्‍यांनी स्वतःचा हेका काही सोडला नाही. 
श्री. अजित कुलकर्णी यांचे सांगणेवरून त्यांच्या सहकार्र्‍यांनी दर्शनबारीच्या बॅरिकेटवर चढून प्रा. कराड यांना धक्काबुक्की करण्याच्या उद्देशाने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. असे असून देखील प्रा. कराड यांनी विश्‍वशांती केंद्राच्या सिक्युरिटीच्या सहकार्‍यांना व इतर पदाधिकार्‍यांना शांत राहण्याचे पुन्हा पुन्हा आवाहन करत होते. आपण कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागेल, असे वागू नये, असे सांगत होते. 
प्रा. कराड सर यांनी सांगितल्यावर विश्‍वशांती केंद्राचे पदाकिधारी व सिक्युरिटीचे लोक अगदी शांतपणे उभे असताना देखील प्रा. अजित कुलकर्णी व त्यांच्या सहकार्‍यांनी विश्‍वशांती केंद्राच्या पदाधिकार्‍यांना त्यांना धक्काबुक्की व मारहाण केली. यामध्ये प्रा. कराड सरांचा पी.ए. श्री. सारंग गुट्टे, सुभेदार मेजर गोवर्धन साम्याल, सौ. लता पानेगांवकर, वॉचमन श्री. राहूल रंदवे, वॉचमन श्री. एकनाथ साहेबराव खेडकर, वॉचमन श्री. हरिनारायण राजेभाऊ बुधवंत यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली. त्यापैकी एकाचा कान फुटून तो रक्तबंबाळ झाला.
काही जाणकार पोलीसांच्या मदतीने अतिशय शर्थीचे प्रयत्न करून प्रा. कराड सर आणि सर्व महिला मंडळी व पदाधिकारी जीव वाचवून कसेबसे बाहेर पडले आणि पुढचा अनर्थ टळला. त्यावेळेला ही श्री. अजित कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी यांनी दमदाटी व अर्वाच्च भाषा सुरुच ठेवली. विश्‍वशांती केंद्र, आळंदी आणि ‘एमआयटी संस्था ही धार्मिकतेचा आव आणून गुंडगिरी करते आहे’, अशा प्रकारचे आरोप करणे चालूच होते आणि ‘तुम्ही माऊलींच्या मंदिरात पुन्हा कसे येता हे मी पाहतो’, ही श्री. अजित कुलकर्णी यांची दमदाटीची भाषा शेवटपर्यंत चालूच राहिली. 
विश्‍वशांती केंद्राचे अध्यक्ष, एक थोर शिक्षण तज्ञ, प्रा. विश्‍वनाथ कराड व त्यांच्या कुटुंबीय महिला, जगप्रसिद्ध पखावज वादक उद्धवबापू शिंदे आपेगावकर, ह.भ.प. श्री. नारायण महाराज उत्तरेश्‍वर माऊली पिंपरीकर या सर्वांंना चोहोबाजूनी घेराव घालून व मंदिराबाहेर जाणारे सर्व मार्ग बंद करून, धक्काबुक्की, अर्वाच्च भाषेमध्ये दमदाटी आणि लगेच संस्थेच्या पदाधिकार्‍यांना, सुरक्षारक्षकांना व काही महिलांना दमदाटी व मारहाण केल्याबद्दल, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त श्री. अजित कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी यांनी, आळंदी देवस्थानच्या पावित्र्याला आणि वारकरी सांप्रदायाच्या परंपरेला काळिमा फासल्याबद्दल व त्यांच्या या अत्यंत बदनामीकारक कृत्याबद्दल सदर विश्‍वस्त मंडळ बरखास्त करून, समितीचे अध्यक्ष श्री. अजित कुलकर्णी यांच्यावर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करून, अध्यक्षपदावरून त्यांना बडतर्फ करावे, अशी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने मी संस्थेचा सुरक्षा व दक्षता विभागाचे संचालक या नात्याने, महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि पुणे जिल्ह्याचे जिल्हासत्र न्यायाधीश यांच्याकडे आग्रही मागणी व विनंती या पत्राद्वारे करीत आहे.
ही नम्र विनंती. 

कर्नल विलास तांदळे,
संचालक, सुरक्षा व दक्षता विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे.


Post a Comment

 
Top