Add

Add

0
 सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोकप्रतिनिधीच 
या देशाचा विकास घडवू शकतात : ज्येष्ठ पत्रकार  प्रताप आसबे 
पुणे :-पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  ‘सक्षम’ - उमेदवार प्रशिक्षण   शिबीराच्या  दुसर्‍या दिवशीच्या सत्रामध्ये महापौर प्रशांत जगताप , पत्रकार  अभय कुलकर्णी, माजी मंत्री सुरेश धस ,डॉ.साहेब खंदारे यांनी ‘श्री पवार साहेब-द्रष्टा नेतृत्व’, प्रताप आसबे यांनी ‘देशाची वर्तमानस्थिती’, संजय आवटे यांनी ‘मीडिया’,माजी मंत्री सुरेश धस यांनी मार्गदर्शन केले. 
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘सक्षम’ - उमेदवार प्रशिक्षण’ कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमातंर्गत इच्छुक  उमेदवारांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबीराच्या दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व शिबिराचा उद्देश सांगितला. महापौर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला.
 ‘सक्षम’ - उमेदवार प्रशिक्षण’ शिबिराचे  रविवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन  झाले. या शिबिरामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. हे शिबिर सावित्रीबाई फुले सभागृह, महात्मा फुले पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.  
माजी मंत्री सुरेश धस यांनी सक्षम’ - उमेदवार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्यांच्या खास ग्रामीण शैलीत त्यांनी प्रशिक्षण शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले , तुम्ही पुणे शहरात गेली दहा वर्षे जी कामे केली ती नागरिकांपर्यंत पोहचवा ,आपला पक्ष फक्त काम काम आणि फक्त काम करत राहतो, पण ते काम समाजापर्यंत पोहचवायला  कमी पडतो. ठिकठिकाणी होणाऱ्या चर्चांमध्ये कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन पक्षाची भूमिका मांडली  पाहिजे. सोशल मीडियाचा वापर जास्तीतजास्त करण्यावर भर द्या. आपण केलेल्या कामाची जाहिरात करायला कमी पडू नका. आपल्या कामाचा प्रचार करणारे कार्यकर्ते तयार करा. 
सक्षम’ - उमेदवार प्रशिक्षण शिबीराच्या  आजच्या  पहिल्या सत्राची सुरूवात पुण्याचे महापौर प्रशांत जगताप  यांनी केली.राष्ट्रवादी पक्ष नव्या विचारांना आणि नव्या चेहर्‍यांना संधी देणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षाने मला पुणेकरांची सेवा करण्याची संधी देत महापौरपदही दिले.पुण्याचा सांस्कृतिक वारसा आपल्या पक्षाने जपला. नाट्यप्रेमी पुणेकरांसाठी जुन्या नाट्यगृहांचे नूतनीकरण तर केलेच शिवाय पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन नवनवीन नाट्यगृहे देखील आपण उभारलेली आहेत. नाट्यरसिक पुणेकर याचा आनंद घेत आहेत.पावसाळ्यात पुण्याची अवस्था मुंबईसारखी होऊ नये यासाठी राष्ट्रवादीने नियोजनबध्द व अभ्यासपूर्ण काम करून दाखवले. 2007 नंतर आजतागायत पुण्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली नाही व पुणेकरांना पाण्यात कुठेही अडकून पडावे लागले नाही.2004 ते 2014 या काळात केंद्रात युुपीए सरकार होते तेव्हा जेएनयूआरएमद्वारे आपल्या पक्षाने पुण्याच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी आणला व योग्य कामासाठीच त्याचा विनियोग केला. यातही सांगण्यासारखी बाब अशी की या संपूर्ण 10 वर्षाच्या काळात राष्ट्रवादीच्या पुण्यातील कुठल्याही नगरसेवकावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही इतके पारदर्शी काम आपण पुण्यासाठी केले आहे. 
पुण्याच्या विकासासाठी पक्षाचा जाहिरनामा तयार करण्यात सहभागी असणारे पत्रकार  अभय कुलकर्णी यांनी  शिबिरात उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या भाषणात कुलकर्णी म्हणाले की, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शहरातल्या विकासपूरक वातावरणाबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. पुणे हे देशातच नव्हे तर जगातल्या गुंतवणूकदारांसाठी आवडीचे शहर आहे. जागतिक तज्ञांच्या अहवालानुसार जगात पुण्याचा आठवा क्रमांक लागतो. हे महत्व लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने त्यादृष्टीकोनातूनच शहरात बदल घडवून आणलेला आहे. त्याचप्रमाणे पुण्याचे निसर्गरम्य वातावरण हा पैलू देखील तितकाच महत्वाचा आहे आणि तो जपण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने काम केले पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष पुण्यासाठी जी ध्येय-धोरणे बनवितो ती केवळ पक्षाची नसून पुण्याची असल्यामुळे प्रत्येक पुणेकरांपर्यंत ती पोहचविणे हे आपले महत्वाचे कर्तव्य आहे. उद्या निवडणुकीच्या काळात मतदारांसमोर जाताना जाहिरनाम्यासोबत पुण्यासाठी केलेली विकासकामेही नागरिकांना सांगणे गरजेचे आहे. काम न करता बोलणे हे जसे पाप आहे तसेच काम करून न बोलणे हे तर महापाप ठरेल. लोकहितासाठी राष्ट्रवादीने अनेक कामे केलेली आहेत, ती पुणेकरांपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
पुण्याच्या विकासकामात तंत्रज्ञानाचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच सक्षम’ - उमेदवार प्रशिक्षण शिबीरात  अभिषेक  दुबे यांनी तंत्रज्ञानाचा वापराबद्दल मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात दुबे यांनी पुणे महानगरपालिकेने तयार केलेल्या विविध मोबाईल अ‍ॅप्स्विषयी उपस्थितांना संपूर्ण माहिती दिली. महानगरपालिकेच्या विविध योजना पुणेकरांपर्यंत पोहचविण्यात आणि पुणेकरांच्या तक्रारी नोंदवून घेण्यामध्ये ही अ‍ॅप्स् अत्यंत महत्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेचे मोबाईल अ‍ॅप प्रत्येक वॉर्डचे निरिक्षण करत आहे. त्यावरील माहिती, तक्रारी आणि त्यामुळे पुणेकरांचे समाधान होत आहे की नाही याकडेही या अ‍ॅपद्वारे पुणे महानगरपालिका लक्ष देत आहे. अशा प्रकारे मोबाईल अ‍ॅप्स्चा प्रभावी वापर करण्यामध्ये पुणे महानगरपालिका पहिल्या क्रमांकावर आहे.
सक्षम’ - उमेदवार प्रशिक्षण शिबीरात  आजच्या दुसर्‍या सत्रात प्रसिध्द लेखक, समीक्षक व कवी  साहेब खंदारे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून त्यांनी शरद पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू उलगडले. राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष नसून सर्व जनतेच्या विकासासाठी सर्वसमावेशक राजकारण करणारा पक्ष आहे. सर्वांचा विकास करण्याला कार्यकर्त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. पवार साहेबांनी सामाजिक कामे करताना समाजाची संस्कृती जोपासण्याचेही काम केले आहे. हाच वारसा कार्यकर्त्यांनी पुढे न्यायला हवा. जातीय किंवा धार्मिक भेदभावापेक्षा विज्ञाननिष्ठ समाज घडविण्याची त्यांची नीती पक्षानेही अंगिकारलेली आहे. साहेबांची शाश्वत विकास ही संकल्पना पुण्यात रूजविण्यात राष्ट्रवादीने यश मिळविले आहे. पुढील काळातही यासाठी सर्वांना काम करायचे आहे.
सक्षम’ - उमेदवार प्रशिक्षण शिबीरात ज्येष्ठ पत्रकार  प्रताप आसबे यांनी राष्ट्रवाद या विषयी मार्गदर्शन केले. भारत हा विविध जातीधर्मांचा व भाषांचा देश आहे. या विविधतेतील एकता टिकवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. त्यासाठीच सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोकप्रतिनिधीच या देशाचा विकास घडवू शकतात. याच धारणेतून राष्ट्रवादी पक्षाचेही कार्य सुरू आहे. हाच विचार कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवा.
सक्षम’ - उमेदवार प्रशिक्षण शिबीरात समारोप पत्रकार संजय आवटे यांच्या भाषणाने झाला. या भाषणातून आवटे यांनी सध्या सुरू असलेल्या नोटाबंदीमागची कुटील नीती उपस्थितांपुढे मांडली. सर्वसामान्य माणसाला आज स्वतःचे कष्टाचे पैसे मिळत नाहीत आणि त्यावर त्याला देशभक्तीचे उपदेश करण्यात येत आहेत. खरंतर निवडणूक केलेल्या विकासकामांवर लढवायला हवी परंतु आभासी चित्र रंगवून लोकांना भूलथापा देण्यात येत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकासकामे ठळकपणे पुणेकरांच्या समोर आणली पाहिजेत. त्याचबरोबर सरकारच्या वागण्यातला फोलपणाही लोकांना दाखवायला हवा. यासाठी कार्यकर्त्यांनी परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.


Post a Comment

 
Top