Add

Add

0

सातारा (जि.मा.का.):- शासनाच्या विविध योजना राबविणे, त्या अंगिकारणे ही एक प्रकारची देश सेवा आहे. कॅशलेस व्यवहार राबविणे हा त्यातलाच एक भाग आहे. बँक ऑफ महाराष्टच्या तारळे शाखेने कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पाऊल उचलले आहे, याची प्रेरणा इतरांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले. बँक ऑफ महाराष्ट्राच्या तारळे शाखेत वित्तीय समावेशन योजना अंतर्गत कॅशलेस व्यवहाराबाबत तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ, उद्योजक, बँक मित्र यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, झोनल सुपरवायजर श्रीराम नारायण, तारळे शाखेचे व्यवस्थापक पंकज सुपे, वरिष्ठ व्यवस्थापक तुषार क्षीरसागर, बार्टानिकचे जिल्हा समन्वयक जोतीराम देशमुख, संगणक प्रशिक्षक प्रशांत आमणे आदी उपस्थित होते. श्री. सातपुते पुढे म्हणाले, शासनाच्या विविध योजना या जनतेच्या कल्याणासाठी असतात. सध्या कॅशलेस व्यवहार करण्याबाबत आपण आपल्या सहकाऱ्यांना प्रशिक्षित करणे अत्यंत महत्वाचे आहे.. माझं गाव माझा जिल्हा, माझं राज्य आणि माझा देश कसा कॅशलेस व्यवहार करेल याविषयी आपण त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. बँक ऑफ महाराष्ट्राच्या युपीआय ॲप डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन करुन श्री. थोरात पुढे म्हणाले, महा मोबाईल हे ॲप्लिकेशन डाऊन लोड करुन घ्यावे. या ॲप्लिकेाशनच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे व्यवहार करु शकता. पीओएस, इंटरनेट बॅंकींग यासारख्या नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे. पुढील तीन दिवस बँक सुरु राहणार आहे. या कालावधीत याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. ग्रामसेवक, तलाठी, बँक मित्र यांनी जास्तीत जास्त ग्राहकांचे बँकेमध्ये खाते काढावेत तसेच एटीएम कार्ड घ्यावे. डेबीट कार्ड, रुपे कार्ड, एटीएम कार्डच्या माध्यमातून सुलभ सुटसुटीत रोखड विरहीत व्यवहार करु शकतो. ती आता काळाची गरज आहे, असे आवाहन श्री. नानल यांनी यावेळी केले. यावेळी श्री. देशमुख, श्री. क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन करुन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी बँक मित्रांनी प्रयत्न केले. या मेळाव्यास ग्रामस्थ, उद्योजक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

Post a Comment

 
Top