Add

Add

0

पुणे(प्रतिनिधी ):-“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य केले आहे. समाजातील दलित व अस्पृश्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न करून त्यांनी राष्ट्रनिर्मिती केली.” असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक व बौध्द धर्माचे गाढे अभ्यासक प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी काढले. विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
यावेळी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, विश्‍वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, डॉ. सुभाष आवळे, डॉ. एल.के.क्षीरसागर, डॉ. खांडेकर, डॉ. आर. व्ही. पुजेरी, डॉ. एम.एस.नागमोडे, डॉ. सायली गणकर, डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. माधुरी कुलकर्णी व प्रा.आर.एस.काळे हे उपस्थित होते.  .
 प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी लिहिलेल्या क्रांतीबा फुले आणि महामानव डॉ. आंबेडकर या पुस्तकाच्या गुजराती आवृत्तीचे प्रकाशन प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्याहस्ते करण्यात आले. 
प्रा.रतनलाल सोनग्रा म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीवर्षानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या इंग्रजी, मराठी व हिंदी  भाषेतील पुस्तके 1,25,000 विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा संकल्प केला आहे. आंबेडकरांचे विचार समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या पुस्तकांचे  वाटप करण्यात येणार आहे.”
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड  म्हणाले, “ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विश्‍वशांतीचा संदेश जगभरात पोहोचवून मानवतेसाठी महान कार्य केले आहे. आंबेडकरांचा आदर्श सर्व समाजाने घेऊन आपली वाटचाल केली पाहिजे. त्यातूनच सर्व मानवजातीचे कल्याण होईल.”
डॉ. एस.एन.पठाण, म्हणाले, “गरीब, सामान्य व वंचित लोकांसाठी आंबेडकरांनी आपले जीवन खर्ची घातले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन तळागाळातील लोकांसाठी आपण कार्य करू या.”
डॉ. संजय उपाध्ये, म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले, परंतू राष्ट्रीयत्वाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू दिला नाही.”
डॉ. सुभाष आवळे, म्हणाले, “डॉ. आंबेडकर यांनी शिक्षण, रोजगार, कृषी, जलसंधारण यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले आहे. ते दलितांचे कैवारी होतेच, परंतू ते स्त्रीमुक्तीसाठी झटणारे समाजसुधारकही होते.”
आपल्या देशाला असलेला जातीव्यवस्थेचा शाप दूर करण्याचे कार्य गौतम बुध्द आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे, असे डॉ. एल.के.क्षीरसागर म्हणाले. 
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ व राजकारणी होते. अशी भावना डॉ. सायली गणकर यांनी व्यक्त केली. 

Post a Comment

 
Top