Add

Add

0

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; महर्षि शिंदे विचार प्रतिष्ठानचे उद्घाटन

पुणे(प्रतिनिधी):-“अस्पृशांना सन्मानाची वागणूक मिळावी, याकरिता महात्मा फुले यांच्यानंतर महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रबोधनात्मक कार्य केले. दलितवस्तींमध्ये राहून सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याचा समन्वयवादी विचार त्यांनी मांडला. त्याच विचारांतून दलित, वंचित घटकांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे,” असे मत 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
पुण्यातील एमआयटी, मानसेवा फाउंडेशन, भा. ल. ठाणगे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक व इतिहास संशोधक भा. ल. ठाणगे यांच्या वाढदिवसानिमित्त महर्षि वि. रा. शिंदे विचार प्रतिष्ठानचे उद्घाटन व ठाणगे यांचा अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते. याप्रसंगी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन. पठाण, उद्योजक सुरेश कोते, विचारवंत सुभानजी खैरे, श्री. खानविलकर, महेश छाबडा व नवनाथ काकडे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “ठाणगे यांच्यावर महर्षि शिंदे,अण्णाभाऊ साठे,यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांच्या विचारांचा पगडा आहे. जातीधर्माच्या पलिकडे जाऊन त्यांनी समाजसेवा करण्याचे व्रत घेतले आहे. अतिशय संघर्षातून आयुष्याची वाटचाल करीत ठाणगे आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. आपल्यासारख्याच संघर्षातून पुढे येत असलेल्या अनेकांना उभे करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्यांच्यातील प्रामाणिकपणामुळेच त्यांना हे कार्य उभे करता आले आहे.”
भाई वैद्य म्हणाले, “स्वारगेट परिसरात भीक मागून, हॉटेलमध्ये वेटरचे काम करुन ठाणगे यांनी आपल्या आयुष्याला दिशा दिली. स्वत:ची प्रगती करतानाच त्यांनी सामाजिक जाणीवेतून गरीबांना मदत केली. त्यातूनच त्यांच्यातील साहित्यिकही घडत गेला. सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात ठाणगे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक वाटते.”
सत्काराला उत्तर देताना ठाणगे म्हणाले, “हा सोहळा पाहण्यासाठी माझा बाप असायला हवा होता. परंतु, मी प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांनाच वडील मानतो. घरच्याच माणसांकडून झालेल्या या सत्काराचा विशेष आनंद आहे. माझ्यावर अनेक आघात झाले, त्यातून प्रेरणा घेऊन पुढे चालत राहिलो. समाजातील अनेक वडिलधार्‍यांना मार्गदर्शनचा, सहकार्याचा हात दिला. त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करता आले.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “समाजातील उपेक्षितांना मदत करण्याचे कार्य ठाणगे हे करत आहेत. वैद्यकीय सेवा अथवा आर्थिक मदत अशा सर्वच क्षेत्रात ठाणगे यांचे लढाऊ वृत्तीचे कार्य उल्लेखनीय आहे. महर्षि शिंदे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ठाणगे यांची वाटचाल सुरु आहे.”
श्री. खानविलकर, सुभानजी खैरे व सुरेश कोते यांनीही ठाणगे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. महादेव रेणूसे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भास्कर घाडगे यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top