Add

Add

0
दिनांक 10 डिसेंबर 2016 वेळ 10.30 ते 5.30

पुणे (प्रतिनिधी):-आपल्या भारत देशाची 14 ऑगस्ट 1947 साली दुर्दैवी फाळणी झाल्या नंतर देखील फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज या देशात काही घटनांचा अपवाद सोडला तर गेली 70 वर्षे अत्यंत गुण्या गोविंदाने नांदत आहेत. विशेष म्हणजे भारतामध्ये राहणार्‍या मुस्लिम  समाजाची संख्या पाकिस्तानमधील मुस्लिमांच्या पेक्षाही अधिक आहे. पाकिस्तान राष्ट्र हे शेजारील राष्ट्र असून त्यांनी शेजारधर्म न पाळल्याने भारतासाठी ते एक शत्रू राष्ट्र म्हणून उदयाला आले व त्याचा परिणाम म्हणजे भारताच्या पश्‍चिम सिमेवर सतत युद्ध सदृष्य, तणावाचे वातावरण असते व अनेक वेळा तर सीमेचे रक्षण करणार्‍या जवानांची जीवित हानीही होते. या शिवाय पाकिस्तान मध्ये मूलवादी (र्षीपवराशपींरश्रळीीं) व सुधारणवादी (झीेसीशीीर्ळींश) अशा प्रकारचा सांस्कृतिक कलह सतत चालू असतो. शिया आणि सुनी पंथीयांमधील कलह तर सर्वश्रुत आहेच. यातूनच तालीबान सारख्या अतिरेकी संघटनांचा जन्म झाला. अशा या अतिरेकी संघटनांना अनेक वेळा पुढारलेल्या राष्ट्रांनी त्यांच्या देशातील शस्त्रसाठा विकला जावा किंवा नशिल्या पदार्थांचा व्यापार चालू राहावा या साठी सतत प्रोत्साहन दिले आहे. आज तर या अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून अनेक इस्लाम देशामध्ये केवळ सत्तेसाठी युद्धाची स्थिती निर्माण झाली असून मुस्लिम धर्मीयच मुस्लिमांचे शिरकाण करतांना दिसतायेत व त्याला धर्माचे नाव दिल्यामुळे, इस्लाम धर्माबद्दल आज सर्व सामान्य माणसाची अवस्था अत्यंत गोंधळाची झाली आहे. वास्तविक पाहता इस्लाम धर्म म्हणजे शांतीचा धर्म आहे.  
आपल्या देशात काश्मिरचा प्रश्‍न अद्याप न सुटल्यामुळे अशा अतिरेकी संघटनांनी त्याचा गैरफायदा घेऊन आपल्या देशावर अनेक वेळा अतिरेकी हल्ला केला व त्यामुळे 26 नोव्हेंबर 2008 सारख्या घटना किंवा भारतीय पार्लमेंटवर झालेला हल्ला किंवा अहमदाबाद येथील अक्षरधाम मंदिरावरचा हल्ला, इ. घटना सतत घडत आहेत.   या घटना घडल्यामुळे भारतीय समाजात पाकिस्तान व अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांच्याबद्दल प्रचंड चिड व घृणा निर्माण झाली आहे या अतिरेकी हल्यात केवळ मुस्लिम धर्मीय असल्यामुळे भारतामधील मुस्लिम धर्मिंयांकडे देखील भारतामधल्या काही संघटना संशयाने पाहू लागल्या आहेत. या सर्व गोष्टींचा गैरफायदा घेऊन या देशातील काही मुस्लिम तरुणांची माथी भडकावून त्यांच्याद्वारे देशामध्ये अतिरेकी हल्ला घडवून आणण्याचे कारस्थान देखील होताना दिसताहेत व त्यामुळे भारतीय मुस्लिम समाजाची फार मोठी हानी होत असून त्यांच्या राष्ट्रीयत्त्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे. भारतीय मुस्लिम समाज आज राजकीय भोवर्‍यामध्ये सापडला आहे.  
पाकिस्तानात न जाता भारतात राहिलेले मुस्लिम हे भारतीय वंशाचे असून ते भारताच्या राष्ट्रीय प्रवाहात सामील झालेले आहेत. परंतु कधी कधी आपले सांस्कृतिक भिन्नत्व व वैशिष्ठ्ये राखण्यासाठी काही चालीरिती व रूढ पद्धती समाजात वापरत असतांना सतत इस्लाम धर्माचा आधार घेतला जातो. परंतु असे लक्षात आले कि ज्या गोष्टी केवळ इस्लाम धर्माचे नाव सांगून रूढ होत आहेत. उदा., तोंडी 3 वेळा तलाक या पद्धती तर पवित्र कुराणमध्ये अजिबात नाहीत किंवा केवळ स्वार्थासाठी काही राजकीय संघटना “भारत माता की जय म्हणायचे नाही” अशा पद्धतीच्या बेलगाम घोषणा करून संपूर्ण भारतीय मुस्लिम समाजाच्या राष्ट्रप्रेमावरच संशय घेत आहेत. अशा बेलगाम घोषणा करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला ? आणि म्हणून अखिल भारतीय मुस्लिम बुद्धिजिवी मंच, पुणे ने यापूर्वी “धर्मग्रंथ हे जीवनग्रंथ” ही परिषद घेतली होती व आता मात्र बुद्धिजिवी मंचाला वाटते कि अशा वेळी ज्या वेळी देशात जाती धर्माच्या नावावर ध्रुवीकरण होत आहे, तेंव्हा बुद्धिजीवी वर्गांनी गुपचिळी घेऊन गप्प बसणे योग्य नाही. गप्प बसणे याचा अर्थ ती मुक संमती मानली जाते आणि म्हणून सध्या देशात ज्या गोष्टींची चर्चा आहे. उदा., इस्लाम राष्ट्रामधील आंतरराष्ट्रीय दहशतवाद, तोंडी तलाख, समान नागरिक कायदा, इ. या बाबींवर पवित्र कुराणची काय शिकवण आहे ही बाब हिंदू आणि मुस्लिम बांधवांपुढे मांडणे आवश्यक आहे आणि म्हणून या परिषदेचे आयोजन केले गेले आहे. 
विश्‍वशांती केंद्र आळंदी, पुणे, भारत  आणि अखील भारतीय मुस्लिम बुद्धीजिवी मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वैश्‍विक मानवाधिकार दिनाफचे औचित्य साधून “पवित्र कुराणचा खरा अर्थ समाजाला समजाऊन सांगण्यामध्ये मुस्लिम बुद्धिजीवींची भूमिका” या विषयावरील एक दिवसीय गोलमेज परिषदेचे शनिवार, दि. 10 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता   माईर्स् एमआयटी, कोथरूड येथील संत ज्ञानेश्‍वर सभागृह येथे  होणार आहे. या परिषदेला संपूर्ण भारतातून अनेक मुस्लिम बुद्धिवंत उपस्थित राहणार आहेत. 

या परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. अरीफ मोहंमद खान हे करणार असून अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार पद्मश्री श्री मुझफ्फर हुसेन असतील. महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन संस्था पुणे चे अध्यक्ष  श्री. पी. ए. इनामदार (पुणे) तसेच मुंबई विद्यापीठाचे उर्दू विभागाचे प्रमुख डॉ. साहेब अली, औरंगाबादचे डॉ. ए. जी. खान, पुना कॉलेजचे प्रा.डॉ. रशिद आर. पानसरे  हे प्रमुख पाहुणे असतील. या परिषदेत एकूण 3 सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
पहिले सत्र “पवित्र कुराणची शिकवण” या विषयावर श्री. अनिस चिश्ती, मौलाना अशरफी नदवी, प्रा. मोइन खान, डॉ. रफीक सय्यद यांची भाषणे होणार आहेत. 
दुसरे सत्र “मुस्लिमांचा वैयक्तिक कायदा” या विषयावर होणार असून या सत्रात डॉ. आर. एम. खान (निवृत्त न्यायाधीश), प्रा. ए. यू. पठाण, अ‍ॅड. सिराज कुरेशी, दिल्ली, अ‍ॅड. बी. ए. खान, अलाहाबाद व अ‍ॅड. कादर सयानी, मुंबई हे आपले विचार मांडणार आहेत. 
तिसरे सत्र “मुस्लिम वैयक्तिक कायद्यात सुधारणा व समान नागरिक कायदा” या विषयावर होणार असून या सत्रात  अरीफ मोहंदम खान, डॉ. मजिद अहमद तालीकोटी (बंगलोर), सौ. नफिसा शेख, मुंबई, प्रा. शमशोद्दीन तांबोळी, श्री. गफूर पारेख (नागपूर), सौ. फरझाना शेख, मुंबई, सौ. ऐनूल आत्तार, सहसचिव, महाराष्ट्र शासन, डॉ. मुन्नवर अली, मुंबई आणि डॉ. झुल्फि शेख, नागपूर हे भाग घेणार आहेत. 
या परिषदेच्या समारोप समारंभ दुपारी 4.30 वाजता होणार आहे. या समारंभासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून श्री. इंद्रेश कुमार, मुस्लिम राष्ट्रीय मंचचे अध्यक्ष, मौलाना अबूल कलाम आझाद यांचे पुतणे श्री. फिरोज बखत अहमद हे अध्यक्षस्थानी असतील, तर थोर स्वातंत्र्य सेनानी बहाद्दूर शहजफर यांची चौथ्या पिढीतील नातू नबाब शोयब खान, श्री. फारूख खान (जोधपूर), अकील अहमद शेख (दिल्ली) आणि डॉ. के. जी. पठाण, पुणे चे उपस्थित राहणार आहेत. 
या परिषदेत काही ठराव करण्यात येणार असून सदर ठराव भारत सरकार व प्रमुख न्यायाधीश भारत सरकार यांचेकडे पाठविण्यात येणार आहे. या परिषदेला पुणे शहरातील मुस्लिम बुद्धिवंत इत्यादींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात येत आहे. 
अशी माहिती ऑल इंडिया मुस्लिम इंटेलेक्चुअल फोरमचे अध्यक्ष डॉ. एस.एन.पठाण, उपाध्यक्ष माजी न्या. डॉ. आर. एम. खान, श्री. रफिक तांबोळी, श्री. नदिम खोत, श्री. अमानत शेख व श्री. झाकीर कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.Post a Comment

 
Top