Add

Add

0

पुणे (प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी अजूनही मुहूर्त सापडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या धरणाच्या दुरुस्तीसाठी किमान तीन ते चार निविदा दाखल झाल्या आहेत; मात्र त्यावर निर्णय झालेला नाही.त्यामुळे या धरणाच्या दुरुस्तीचे काम केव्हा सुरू होणार हा खरा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

टेमघर धरणाची गळती ऑगस्ट महिन्यात उघडकीस आली. त्यानंतर शासनस्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तत्परतेने धरणास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या धरणाच्या दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते. ही दुरुस्ती पावसाळा संपल्यानंतर सुरू करण्यात येणार होती. त्यासाठी प्रशासनास सूचना देखील देण्यात आल्या होत्या. या धरणाची पाणीसाठ्याची क्षमता तीन टीएमसी आहे; मात्र दुरुस्तीसाठी पाणीसाठा कमी करण्यात येणार होता. पावसाळा संपल्यानंतर हळूहळू पाणीसाठा कमी करण्यास सुरुवात झाली. सध्या धरणात केवळ पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक  ठेवण्यात आला आहे.जलसंपदा विभागाने दुरुस्तीसाठी दोन महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आली होती; मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी या विभागावर दुसर्‍यांदा नोव्हेंबर महिन्यात निविदा काढण्याची वेळ आली. या निविदेस काही प्रमाणात सकारात्मक   प्रतिसाद मिळाला असून, किमान तीन ते चार निविदा विभागास  प्राप्त झाल्या आहेत; मात्र त्या निविदा अजूनही फोडण्यात आलेल्या नाहीत. यामुळे दुरुस्तीच्या कामास विलंब होऊ लागला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या धरणाच्या दुरुस्तीसाठी 98 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुरुस्तीसाठी दोन वेळा निविदा काढण्यात आल्या. साधारणपणे 25 नोव्हेंबरनंतर निविदा उघडल्या जाणे अपेक्षित होते;  मात्र अजून त्या उघडल्या गेलेल्या नाहीत; मात्र लवकरच त्या उघडण्यात येतील.

Post a Comment

 
Top