Add

Add

0

पुणे(प्रतिनिधी ):- जगभरातील भक्तांपर्यंत घरबसल्या गुरुदेव दत्तांची महती पोचविण्यासाठी साम मराठी वाहिनीने यंदाही डी.एन.विंड.सिस्टीम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेचे आयोजन केले आहे. गुरुवार दि 8 डिसेंबर पासून या मालिकेचे प्रसारण होणार आहे.पुढील मंगळवारपर्यंत दि. 13 सायंकाळी साडेसहा वाजता ही मालिका प्रसारित होईल. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपण होईल. 

श्री गुरुदेव दत्त यांचे माहात्म्य सांगणारे एकूण सहा भाग आहेत. तसेच, 13 डिसेंबर रोजी गाणगापूर आणि नृसिंहवाडी येथे होणाऱ्या दत्त जयंती सोहळ्याचे प्रक्षेपण घरबसल्या भाविकांना बघता येणार आहे. दत्त जयंती दिवशी पहाटेपासून दत्त जन्मकाळापर्यंत होणाऱ्या सर्व धार्मिक विधी व कार्यक्रमांचे प्रक्षेपणही होणार आहे. दरम्यान, कबीर बाग मठ संस्था (पुणे) मालिकेचे प्रायोजक आहेत.
शहरातील तीन टीनएजर्स मुलांना भविष्यात चांगल्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. गाणगापूरला दत्त जयंतीला येणारा एक तरुण त्यांना सोबत घेतो आणि यानिमित्ताने या मुलांवर संस्कार घडतात, अशी मालिकेची मध्यवर्ती संकल्पना आहे. गाणगापूर येथील वैशिष्ट्य असलेले धार्मिक विधी, नित्य धार्मिक विधींसह संगम क्षेत्र, तेथील विविध मंदिरे, भीमा-अमरजा संगम, स्वामींचे अनुष्ठान मंदिर, अमरेश्‍वर मंदिर, भस्माचा डोंगर, श्रीनृसिंह सरस्वती निर्गुण पादुका मंदिर याबाबतची सर्वांगीण माहिती मालिकेतून घरबसल्या मिळणार आहे. 
अभिनेता आशुतोष कुलकर्णी यांच्यासह बालकलाकार प्रणव शुक्‍ल, हर्षद शिंदे, सोहम कदम यांच्या मालिकेत भूमिका आहेत. युवराज पाटील यांचे लेखन आहे. ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका ‘साम मराठी’ सलग सातव्या वर्षी प्रसारित करत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण मालिकेमुळे देशभरातील दत्तभक्तांसह गुरुपरंपरेतील भाविकांना दत्त देवस्थानांची माहिती घरबसल्या मिळणार आहे. पूजाअर्चा, धार्मिक सोहळे, नित्यक्रम, स्थान माहात्म्य हे सर्व दर्शकांना घरबसल्या अनुभवायला मिळण्याची संधी ‘साम’ मराठीने उपलब्ध करून दिली आहे.

प्रश्‍नमंजूषा स्पर्धाही
मालिकेदरम्यान प्रेक्षकांसाठी रोजच्या भागावर आधारित प्रश्‍नमंजूषा आयोजित केली आहे. पोस्ट कार्डासह ‘एसएमएस’च्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. मालिकेतील प्रत्येक भागात एक प्रश्‍न विचारला जाईल. त्यामध्ये पाच महाविजेत्यांना चांदीचे नाणे व अभिषेकाची संधी आणि पंचवीस उपविजेत्यांना गुरुचरित्राची प्रत अशी बक्षिसे आहेत.

Post a Comment

 
Top