Add

Add

0
चिपळूण(प्रतिनिधी ):- सेवानिवृत्तीनंतरच्या आपल्या कार्यकाळात समाजासाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील  व्यक्तींना प्रतिवर्षी गेली सतत 30वर्षे देण्यात येणारा पुणे शहर निवृत्त सेवक महासंघाचा मानाचा राज्यस्तरीय एस.एम.जोशी पुरस्कारयावर्षी येथील प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी”, चिपळूण तालुका पेन्शनर्स संघटनेचे सल्लागार मो.म.परांजपे (गुरुजी) यांना जाहीर झाला आहे. 
परांजपे यांच्या निमित्ताने प्रथमच हा राज्यस्तरीय पुरस्कार कोकण ला मिळाला आहे. येत्या दिनांक १६ डिसेंबर रोजी पुणे येथे हा पुरस्कार समारंभपूर्वक त्यांना प्रदान करण्यात येणार असून शाल, श्रीफळ, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्प आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
85वर्षे वयाचे सेवानिवृत्त अपग्रेड़ मुख्याध्यापक, मोरेश्वर महादेव परांजपे गुरुजी यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनी, त्यांचा जीवनप्रवास शब्दबद्ध असलेल्या पर्यटन अभ्यासक,पत्रकार धीरज वाटेकर लिखित "प्राथमिक शिक्ष णातील कर्मयोगी" या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन झाले होते.भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्ता नातील कराची शहर अनुभवलेल्या दिवसांसहचा कोकणच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील 41वर्षांच्या त्यांच्या सेवाकाळाचा जीवनप्रवास आणि सेवानिवृत्तीनंतरच्या कार्याचा आढावा असलेल्या या ग्रंथाला ज्येष्ठ विचारवंत व दैनिक सागरचे संपादक निशिकांत जोशी यांची प्रस्तावना आहे. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विलास महाडिक यांची ग्रंथनिर्मिती असलेल्या या चरित्रग्रंथाचे समाजातील अनेक बुद्धीजीवींनी मुक्तकंठाने कौतुक केले होते. 

निवृत्तीनंतर सात कथा संग्रहांचे लेखन-प्रकाशन, चिपळूण तालुका पेन्शनर संघटनेच्या माध्यमातून सेवा निवृत्तांसाठी भरीव काम केलेल्या मोरेश्वर महादेव परांजपे यांचेसह सांगलीचे केशव रामचंद्र देशपांडे, दिंडोरी जिल्हा नाशिकचे उद्धव पांडुरंग मोरे यांनाही यावेळेस सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे येथे सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद सभागृहात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, पुणे शहर निवृत्त सेवक महासंघाचे अध्यक्ष भाई वैद्य आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार निवडीबाबत महासंघाचे सरचिटणीस विठ्ठलराव बाबुराव शेटे यांनी लेखी पत्र पाठवून परांजपे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Post a Comment

 
Top