Add

Add

0
देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार 2017चे शानदार वितरण


पुणे(प्रतिनिधी):-: सदृढ लोकशाहीसाठी संवाद अत्यंत आवश्यक आहे, पत्रकार हा समाजासाठी संवादकाचे काम करत असतो. माध्यमांचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत असून या बदलत्या माध्यमातील तंत्रज्ञान आत्मसात करुन पत्रकारांनी कायमच सामान्य नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जागरुक राहण्याचे आवाहन खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी  केले.

                विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य पत्रकार देवर्षी नारद यांच्या जयंती निमित्त प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार 2017चे वितरण खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फ‍ि थिएटरमध्ये करण्यात आले. त्यावेळी ते  बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, उपाध्यक्ष विकास काकतकर, प्रा. आनंद भिडे उपस्थित होते.
    
यावेळी ज्येष्ठ संपादक भाऊ तोरसेकर, पराग पोतदार, पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी तथा व्यंगचित्रकार राजेंद्र सरग, ब्लॉग लेखक देवीदास देशपांडे यांनादेवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी समाज आणि राज्यकर्ते यांच्यात संवाद आवश्यक असतो. पत्रकार हा समाजाच्यावतीने संवादकाचे काम करत असतो. त्यामुळे संवादासाठी पत्रकार हा आवश्यक घटक आहे. पत्रकारिता हे करिअरसाठी चांगले क्षेत्र आहे. ते अधिक व्यापक आणि प्रगल्भ करण्यासाठी या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी पत्रकारितेतील पदवीचे किमान शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे पत्रकारितेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
    
सक्षम लोकशाहीसाठी पत्रकारांना संविधानाचा अभ्यास आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करताना पत्रकारांनी निर्भय होवून सत्य जगासमोर आणावे. आता माध्यमांचे स्वरुप झपाट्याने बदलत आहे. माध्यमातील हे तांत्रिक बदल पत्रकारांनी आत्मसात करुन अधिक प्रभावीपणे आपले काम पार पाडवे, अशी अपेक्षा डॉ. स्वामी यांनी व्यक्त केली.

    सत्काराला उत्तर देताना भाऊ तोरसेकर म्हणाले, सामान्य लोकांना अनेक गोष्टींची माहिती असते मात्र नेमकी गोष्ट लोकांना समजण्यास मदत करण्याचे काम पत्रकाराचे असते. तो आपल्या माध्यमाव्दारे लोकांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचवत असतो. कोणत्याही घटनेची केवळ माहिती न देता त्या घटनेशी संबंधित जुने संदर्भ पत्रकारांनी लोकांसमोर मांडावेत. पत्रकारांनी कायम लोकांच्या हिताला प्राधान्य देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
                कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा. आनंद भिडे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया अत्रे यांनी केले. प्राची काळे यांनी गायलेल्‍या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित होते.

Post a Comment

 
Top