Add

Add

0
                     जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश
अमरावती(प्रतिनिधी):- कुठलेही तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरू व बेरोजगारांना कर्जपुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना कार्यान्वित केली आहे.त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहो चविण्यासाठी बँकांसह सर्व यंत्रणांनी संघटितपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी  येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे , जिल्हा उद्योग अधिकारी एस. एस. मुद्दमवार, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या क्रांती काटोले,जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे गणेश यावले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचे अधिकारी राजेंद्र भोयर,नरेंद्र एटे आदी यावेळी उपस्थित होते. 
योजनेची जिल्ह्यात भरीव अंमलबजावणी होण्यासाठी बँकांनी कर्जवितरणाचा परफॉर्मन्स वाढविणे आवश्यक आहे, असे सांगून श्री. बांगर म्हणाले की, व्यवसाय शिक्षण घेणा-यांत सगळ्यांना नोकरी मिळेलच असे नाही. अशा तरुणांना योजनेतून स्वयंरोजगार उपलब्ध करुन देता येईल. ज्या बँकांनी अद्यापही या योजनेत कर्जवितरण केले नसेल, त्यांना तत्काळ आदेश द्यावेत. अग्रणी बँकेकडून सर्व बँकांना तशा सूचना तत्काळ द्याव्यात.
ते पुढे म्हणाले की, नागरिकांनाही या योजनेची माहिती सुस्पष्टपणे व सोप्या भाषेत सांगितली गेली पाहिजे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वदूर प्रसिद्धी करावी. ठिकठिकाणी मेळावे आयोजित करावेत. पारंपरिक व अपारंपरिक अशा दोन्ही माध्यमांचा वापर करावा. सोशल मीडियावरही विविध प्रकारे प्रसिद्धी द्यावी, असेही निर्देश श्री. बांगर यांनी दिले. जिल्ह्यात या योजनेत आतापर्यंत 23 कोटी रुपये कर्जवितरण झाल्याचे श्री. झा यांनी सांगितले.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आढावा
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा जिल्ह्यातील कामकाजाचा आढावाही यावेळी जिल्हाधिका-यांनी घेतला. नव्या उद्योगांमार्फत, सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून देशातील शहरी क्षेत्रांबरोबरच ग्रामीण क्षेत्रात देखील कायमस्वरुपी रोजगाराची हमी देणे हा योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रस्ताव येण्यासाठी प्रयत्न करावेत व बँकांकडे त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना दिले. 
00000

Post a Comment

 
Top