Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची माहिती व अर्ज संकलित करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सौरभ राव व जिल्ह्याचे ग्रमीण उपनिबंधक आनंद कटके  यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज मंदीर, लोहगाव, ता. हवेली येथे करण्यात आला.
  
 “ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना योजनेच्या अनुषंगाने आज  दि. 24 जुलै 2017 पासून राज्यातील थकबाकीदार शेतकरी  सभासद  व  कर्जाची परतफेड नियमित करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज विहीत नमुन्यात संकलित करण्याची सुरुवात केलेली आहे. त्यानुषंगाने पुणे जिल्ह्यात या योजनेची माहिती  व अर्ज संकलित करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. राव व जिल्ह्याचे ग्रमीण उपनिबंधक श्री. कटके  यांच्या हस्ते करण्यात आला.  
या योजनेबाबत  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. राव म्हणाले, सदरची कर्जमाफी ही देशातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी असून राज्यातील जवळपास 44 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना  नियमित कर्ज परतफेड केल्याबद्दल प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी विशेष योजना राबविली जाणार आहे. या योजनेच्या अर्जाचा नमूना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार, जिल्हा उपनिबंधक,  सहाय्यक निबंधक, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा बँक, राष्ट्रियकृत बँका व  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेचआपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी उपलब्ध आहे. या योजनेचा राज्यातील 25 हजार सेवा केंद्रापैकी  नजीकच्या कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रावर लाभ घेता येईल, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार (https://aaplesarkar.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल,  अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. राव यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमास लोहगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शेतकरी सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

 
Top