Add

Add

0

पुणे : लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे, अशी जनतेची अपेक्षा असते. खडकवासला मतदारसंघातील भाजपचे आमदार भीमराव तापकीर हे तर शेतकऱ्याचा बैल मृत झाला तरी थेट घटनास्थळी पोचल्याची घटना घडली. 

पुणे जिल्ह्यातील खडकवासला हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र आहे. या मतदारसंघाच्या पश्‍चिम पट्ट्यातील सिंहगड परिसरात जोरदार पाऊस पडतो. या भागातील खामगाव मावळ येथे विद्युत प्रवाह पाण्यामध्ये उतरल्यामुळे ग्रामस्थ पांडुरंग लोहकरे यांच्या बैलजोडीचा या दुर्घटनेमध्ये दोन दिवसांपूर्वी अंत झाला. याची माहीती मिळताच तापकीर हे घटनास्थळी गेले. संबंधित कुटुंबाची भेट घेतली. गुडघाभर चिखलात स्वतः जाऊन मेलेल्या बैलांची पाहणी केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांना जाबही विचारला. संबंधित कुटुंबीयास बैलजोडीसाठी शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. याचे व्यवस्थित फोटो काढण्यात आले. 
त्यांनी घटनास्थळी दिलेल्या भेटीचे फोटो लगेच त्यांच्या "फेसबुक'वर शे
अर करण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी आमदारांनी केवळ "फोटोसेशन' करू नये तर संबंधित शेतकऱ्याला खरेच मदत मिळेल, अशी व्यवस्था करावी अशी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके म्हणाले, की या आधी आमदारांनी दिलेली अनेक आश्‍वासने अजून हवेत आहेत. कोंढवे धावडे ते शिवणे या रस्त्याचे काम पूर्ण करू, असे आश्‍वासन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व तापकरी या दोघांनी मिळून दिले होते. मात्र या रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे की नागरिक अक्षरक्षः वैतागले आहेत. तशी गत लोहोकरे कुटुंबाबाबत होऊ नये.
आमदार तापकीर यांनी आपली भेट निव्वळ फोटोसेशनपुरती नव्हती, असा दावा करत गेल्या वर्षी खेड-शिवापूर भागात एका शेतकऱ्याची बैलजोडी अशाच पद्धतीने विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडली होती. तेव्हा त्या शेतकऱ्याला मी चांगली भरपाई मिळवून दिली होती. तसेच लोहोकरे यांनाही मदतीसाठी योग्य तो पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
मात्र मेलेल्या बैलासोबतचा फोटो शेअर करण्याची गरज होती का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याबाबत सोशल मिडियाचे अभ्यासक विश्राम ढोले म्हणाले, ""लोकप्रतिनिधींनी काम केले, हे दाखवायची गरज असतेच. जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्यांनी त्यांच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी सोशल मिडियाचा आधार घेणे योग्यच आहे. ते काम करतात म्हणजे त्यांची ती जबाबदारीच आहे, त्याचे कशाला मार्केटिंग, असे काही मंडळी विचारतील. पण तसे म्हणून चालणार नाही. शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला महत्त्वाचे स्थान आहे. शेतकऱ्यापोटी आमदारांनी संवेदनशीलता दाखविली असेल तर ते योग्यच आहे. त्यामुळे ते केवळ फोटोसाठी तिथे गेले, असे कोणी म्हटले तरी त्यांनी मतदारांशी या निमित्ताने साधलेला "कनेक्‍ट' दुर्लक्षित करून चालणार नाही.'' 
 

Post a Comment

 
Top