Add

Add

0
                                                व्‍यसन... 
  व्‍यसन हा मनाला लागलेला रोग म्‍हणतात. भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्‍य पदार्थांचे सेवन पूर्वीपासून करण्‍यात येत होते. हे व्‍यसन आहे, याची जाणीवच कुणाला नव्‍हती. सुगंधी सुपारी, पानमसाला, मावा, गुटखा ही त्‍याची आधुनिक रुपे या जोडीला अल्‍कोहोल चाही समावेश झालेला दिसून येतो. तंबाखू आणि दारु यांच्‍या सेवनामुळे आरोग्‍यावर विपरित परिणाम होतात.
    'युनिसेफ'च्‍या वतीने पुण्‍यात नुकतीच दोन दिवशीय कार्यशाळा घेण्‍यात आली. 'महाराष्‍ट्र राज्यातील बालमृत्‍यू रोखण्‍याचे उपाय आणि बालविकास' हा कार्यशाळेचा विषय होता. बालविकासाच्‍या दृष्टिने व्‍यापक माहिती या कार्यशाळेत देण्‍यात आली. बालके ही देशाचे भविष्‍य असतात. ही बालके शरीर आणि मनाने सुदृढ असतील तर देशविकासासाठी त्‍यांचे योगदान मोलाचे ठरु शकते. आपल्‍या देशात तंबाखू आणि तंबाखूजन्‍य पदार्थ म्‍हणजे तपकीर, मशेरी (मिश्री), विडी, सिगारेट, सुपारी यांचे सर्रास सेवन केले जाते. कायद्याने त्‍यावर बंधने आहेत, पण 'कायदेभंग' करण्‍याची सवय अंगात मुरलेली असल्‍यामुळेच की काय शक्‍य तेव्‍हा नियमभंग केलेला दिसून येतो. या पदार्थांची 'तल्‍लफ' इतकी असते की प्रसंगी दंड भरुनही आपले व्‍यसन पूर्ण करणारे महाभाग दिसून येतात.
    तंबाखू आणि दारु सेवनामुळे संबंधित व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍यावर परिणाम तर होतोच, पण त्याच्‍या कुटुंबावरही होतो. जर व्‍यक्‍ती कमावती असेल आणि व्‍यसनांच्‍या अतिरेकामुळे आजारी पडली तर औषध-पाण्‍यावर मोठा खर्च होतो. परिणामी आर्थिक स्थिती खराब होते. कुटुंबातील बालकांच्‍या आरोग्‍यावरही वाईट परिणाम होतो. लहान मुलांना वेळेवर लसीकरण करण्‍याचे लक्षात राहत नाही. बालकांच्‍या आरोग्‍याची हेळसांड झाल्‍याने कुपोषण, बालमृत्‍यू होण्‍याची भीती असते. घरात धूम्रपान केल्‍यामुळे सानिध्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍तींना श्‍वसनसंस्‍थेचे विकार, फुप्फुसाचे विकार जडतात. गर्भवती महिला असतील तर त्‍यांच्‍याही आरोग्यावर आणि होणा-या बालकाच्‍याही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. व्‍यसनाधीन कुटुंबात आनंदी वातावरण नसते. भांडणे, वादविवाद, मारामा-या यामुळे बालकांच्‍या मनावर परिणाम, त्‍यांच्‍या शिक्षणावर, संस्‍कारावर परिणाम होतो. या मुलांना वाईट संगत लागली तर वाममार्गाकडे वळण्‍याची शक्‍यता अधिक असते.
  तंबाखू व तंबाखूजन्‍य पदार्थ, दारु यांच्‍या सेवनाला दुर्दैवाने सामाजिक प्रतिष्‍ठा प्राप्‍त झाल्‍याचे चित्र दिसते. शहरी भागाचे अनुकरण ग्रामीण भागात, उच्‍च वर्गाचे कनिष्‍ठ वर्गात अनुकरण होत असते. या व्‍यसनांचा शहरी-ग्रामीण क्षेत्रानुसार आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्‍कृतिक, धार्मिक, मानसिक या वेगवेगळ्या पातळ्यांवर परिणाम होत असतो.  मात्र, तो वाईट आणि विघातक असतो, एवढं मात्र निश्चित.
एकेकाळी दीप अमावस्‍या साजरी केली जायची. गेल्या काही वर्षात 'गटारी अमावस्‍या' म्‍हणून तिला सामाजिक महत्‍त्‍व दिले जात असल्‍याचे दिसून येते. सोशल मिडियावर त्‍यावरील विनोद, त्‍याच्‍या समर्थनार्थ पोस्‍ट यांचा माराच होत होता. याचाही परिणाम नाही म्‍हटला तरी उत्‍सुकता म्‍हणून व्‍यसनांकडे वळण्‍यात होऊ शकतो. माझ्या एका मित्राला धूम्रपानाची सवय होती. या सवयीला ‘व्‍यसन’  म्‍हटलेले त्‍याला आवडत नव्‍हते. 'मी ठरवलं तर धूम्रपान कधीही सोडू शकतो', असा त्‍याचा दावा होता. अजून तो दावा खरा झालेला नाही, हा भाग वेगळा. नभोवाणी केंद्रावर उद्घोषणा करायला जाण्‍यापूर्वी तो एक सिगारेट ओढायचा. सिगारेटच्‍या धुरामुळे आवाज 'भारदस्‍त' होतो, असा त्‍याचा दावा होता.  मूळात त्‍याचा आवाजच चांगला होता, पण त्‍याच्‍या मनात ते ठसलेले असल्‍यामुळे कोणी त्‍याचे मनपरिवर्तन करु शकले नाही.
  आमच्‍या ओळखीचे एक नातेवाईक आहेत, त्‍यांना तपकीर ओढायची सवय आहे. ती ओढल्‍याशिवाय त्‍यांना 'फ्रेश' वाटत नाही. तंबाखुला चुना लावून ती चोळून खाल्याशिवाय सकाळी पोट साफ होत नाही, अशा मानसिकतेतील अनेक जण आपल्‍या पहाण्‍यात असतील.
 ग्रामीण भागात साधारण चाळीस वर्षांपूर्वी तंबाखूजन्‍य मशेरी लावून दात घासण्‍यात यायचे. त्‍याकाळी दंतमंजन, टुथपेस्‍ट परवडत नसे. कडूनिंबाची काडी, गोव-याची राख, लाकडी कोळश्‍याची भुकटी यांचा वापर दात घासण्‍यासाठी केला जायचा. घरा-घरांत दर आठवड्याला अथवा पंधरवड्याला तव्‍यावर मशेरी भाजण्‍याचा साग्रसंगीत कार्यक्रम व्‍हायचा. त्‍या धूराचा ठसका आजू-बाजूच्‍यांना याची जाणीव करुन द्यायचा. आर्थिक परिस्थिती सुधारली, थोडी जाणीवजागृती झाली त्‍यामुळे मशेरी, तपकीर, गोव-याची राख यांचा वापर कमी होतांना दिसतो. मात्र, ज्‍यांना मशेरी आणि तपकीरीची सवय आहे, त्‍यांच्‍यात मात्र अजूनही बदल झालेला नाही.
    काही ठिकाणी तंबाखूची जागा काही प्रमाणात गुटखा, मावा, सुगंधी सुपारी यांनी घेतलेली दिसते. शालेय विद्यार्थ्‍यांना सहजपणे हे पदार्थ उपलब्‍ध झाल्‍यामुळे  ते याच्‍या आहारी जाण्‍याची भीती असते. दूरचित्रवाणीवर एकेकाळी दारु तसेच धूम्रपान, गुटख्‍याच्‍या प्रदर्शनाला बंदी नव्‍हती. मात्र,  सध्‍या दारु सेवन अथवा धूम्रपानाचे दृश्‍य असेल तर त्‍याबाबत जागृतीचा 'वैधानिक इशारा' दाखविला जातो,
ही समाधानाची बाब आहे. इतके असूनही तंबाखू वा तंबाखूजन्‍य पदार्थांचे सेवन थांबलेले नाहीए, त्‍यांच्‍या किमती वाढल्‍या तरी सेवनात खंड पडत नाही. शासकीय इमारतींचे कोपरे, सार्वजनिक ठिकाणे या जागी पानमसाला, गुटखा खाऊन घाण करणारे महाभाग दिसतात.
महाराष्‍ट्र शासनाने सन 2012 मध्‍ये गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूवर बंदी घातली. त्‍यानंतर 2013 मध्‍ये सुगंधित आणि स्‍वादिष्‍ट सुपारीवर देखील बंदी घालण्‍यात आली.  या उत्‍पादनांवर कायम स्‍वरुपी बंदीची मागणी आरोग्‍य तज्ञ आणि स्‍वयंसेवी संस्‍थांकडून होते. या पदार्थांच्‍या सेवनाने मायटॉटीक गुणसूत्रात बदल होत असल्‍याचेही तज्ञांचे म्‍हणणे आहे.
 थोडक्‍यात, तंबाखू, तंबाखूजन्‍य पदार्थ, दारु यांच्‍या सेवनाबाबत शासन आपल्‍या परीने लोकजागृती करत असते, कायदे-नियम घालून उपभोगावर मर्यादा आणत असते. पण लोकांनीही आपल्‍या आणि आपल्‍या कुटुंबाच्‍या हितासाठी व्‍यसनांपासून दूर रहायला हवे.                                                                                                                                                                                                         राजेंद्र सरग,  
                                                                                                         जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे 
                                                                                                        (मोबाईल  9423245456)

Post a Comment

 
Top