Add

Add

0
11 व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पारितोषिकांचे वितरण


पुणे(प्रतिनिधी):- राज्य शासन नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कटीबद्ध्‍ आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज असून पुढील दहा वर्षाच्या कालावधीत जवळपास चाळीस लाख शेती पंप सौर ऊर्जेवर चालविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जा तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.

      महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जातर्फे दरवर्षी ऊर्जा संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्थांना व व्यक्तींना पारितोषिक देऊन गौरविण्यात येते.2015-16 या  वर्षात ऊर्जा संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 74संस्था आणि व्यक्तींना आज ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र  देऊन गौरविण्यात आले त्यावेळी ऊर्जा मंत्री बोलत होते. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, आमदार जगदिश मुळीक, महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष धनंजय गंधे उपस्थित होते.

      यावेळी बोलताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाने नुकतेच स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धेारण जाहिर केले आहे. राज्य ऊर्जा संवर्धन धोरणाच्या अंमलबजावणीमुळे सन 2020-21 पर्यत कोळश्यापासून निर्माण करण्यात येणारी सुमारे 1000मे.वॅट ऊर्जेची बचत होणार आहे. ऊर्जा संवर्धन धोरणात सर्व प्रकाच्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या धोरणामध्ये व्यावसायीक क्षेत्रातील शॉपींग मॉल, मल्टिफलेक्स्, मोठे हॉस्पीटल, शासकीय इमारती, नगरपालिका, महानगरपालिका, घरगुती क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य ऊर्जा संवर्धन धोरण राबविल्यामुळे राज्याचा ऊर्जा प्रश्न सुटणार असल्याचेही ते म्हणाले. महाऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्र घडविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

      महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापनात सहभागी झालेल्या सर्व घटकांनी ऊर्जा बचतीसाठी सुमारे ५७७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली व त्यापासून सुमारे 421कोटी एवढी वार्षिक ऊर्जा बचत साध्य झाल्याचे सांगितले. त्यामुळे या योजनेतून 2640 दशलक्ष युनिट म्हणजेच 386मे.वॅट विद्युत ऊर्जेची बचत झाली आहे, अशी माहिती दिली.

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष धनंजय गंधे यांनी यावेळी पुरस्कार निवड पारदर्शक पध्दतीने केल्याचे सांगितले. ऊर्जेच्या बाबतीत देश स्वयंपूर्णतेकडे जात असून ऊर्जा संवर्धनात गुणात्मक  वाढ झाल्याचे सांगितले.
 कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. पुरस्कार निवड समिती सदस्यांचा यावेळी ऊर्जा मंत्रयांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप महाऊर्जेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक उमाकांत पांडे यांनी केला.
००००

Post a Comment

 
Top