Add

Add

0

एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियनशीपमध्ये मिळविली दोन सुवर्णपदके : आठ देशातील दोनशे योगापट्टूंचा सहभाग

पौड (प्रतिनिधी):- सिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियनशीप क्रीडा स्पर्धेत मुळशी तालुक्या तील  कोंढवळे येथील श्रेया शंकर कंधारे हिने सोळा वर्षे वयो गटात दोन सुवर्णपदके पटकावित भारताचा तिरंगा जगात उंचावला आहे. आठ देशातील दोनशेपेक्षा जास्त योगापटूंना नमवित श्रेयाने ही जिगरबाज कामगिरी केली असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
श्रेया ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयात इयत्ता बारावी कला शाखेत शिकते. इयत्ता सातवीपासूनच तिला योगाची आवड होती. तिच्या तील ही आवड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्तीची मैदाने गाजविणारे वडील शंकर कंधारे यांनी हेरली. आंतर राष्ट्रीय पंच व खेळाडू चंद्रकांत पांगरे यांच्याकडे तिला तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. श्रेयानेही एकाग्रतेने योगाची विद्या संपादन करीत वेगवेगळे प्रकार शिकली. तालुकापातळीवर अव्वल यश मिळवित श्रेया योगाच्या स्पर्धेत थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहचली. पाच वर्षात तिने महाराष्ट्राला पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि आठ कास्य पदके मिळवून दिली. तर मलेशियाला झालेल्या आतंरराष्ट्रीय योगात स्पर्धेत तिने भारताला कास्य पदक मिळवून दिले.
रांचीला भारतीय योगा फेडरेशनद्वारा 41 वी राष्ट्रीय योग चॅम्पियनशीप स्पर्धा झाली. त्यात श्रेयाने प्रथम क्रमांकाची कामगिरी केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली. ही स्पर्धा सिंगापूरला झाली. या स्पर्धेसाठी भारतासह मलेशिया, श्रीलंका, दुबई, व्हिएतनाम, इराण, हॉंगकॉंग, सिंगापूर, आणि फिलिपाईन्स या आठ देशातील दोनशे नामांकित योगपटू सहभागी झाले होते. श्रेयाने व्हिएतनामच्या खेळाडूंना पराभूत करत पहिल्या सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले. त्यानंतर मलेशियन योगापट्टूंना नमवत दुसरेही सुवर्णपदक पटकाविले. योगामध्ये दोन सुवर्णपदके मिळविणाऱ्या श्रेयाने देशात इतिहास रचला.
तिच्या यशाची बातमी ऐकून आई-वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरारले. माझ्या मुलींने योगा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. मुळशीचे आणि भारताचे नाव जगात चमकविले याचाच आनंद मोठा आहे. आतापर्यंत तिच्यासाठी केलेल्या कष्टाचे तिने चीज केले. यापुढील जागतिक स्पर्धेत खेळून तिने देशाचा तिरंगा फडकवत ठेवावा हीच आमची आई-वडिलांची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रीया श्रेयाचे आई-वडील नंदा आणि शंकर कंधारे यांनी दिली.

Post a Comment

 
Top