Add

Add

0


                पुणे-पौड -मुळशी-ताम्हिणी-माणगाव -म्हसळा -दिघीबंदर साठी 
                          295 कोटींची आर्थिक तरतूद 
 पुणे(प्रतिनिधी):-‘येणाऱ्या काळात पुण्याचे ‘व्हिजन’ तयार केले पाहिजे. पॅचवर्कमध्ये काम करून चालणार नाही. ‘सिंगापूर प्लॅनिंग ऑथॉरिटी’सारख्या एजन्सीकडून पुण्याचा विकास आराखडा तयार करून घेतला पाहिजे. आपल्याकडील ‘टाउन प्लॅनिंग’ विभाग (नगर रचना) काही कामाचा नाही. हे फुकटाला महाग आहेत. यासारखी भुक्कड संस्था मी पाहिलेली नाही,’ अशा तिखट शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
गडकरी म्हणाले,‘अमेरिका, जर्मनी यांसारख्या परदेशांत गेलो असताना अनेक मराठी मुले भेटली.त्यातील बहुतेक मुले ही पुण्यातील होती, याचा मला अभिमान आहे. पुण्याच्या मुलांनी खूप नाव कमावले आहे.याच वेळी पुण्याचाही विकास मोठ्या प्रमाणात होत असताना येथील विकास आराखडा तयार केला पाहिजे. पॅच वर्कमध्ये काम करून चालणार नाही. त्यासाठी ‘सिंगापूर प्लॅनिंग अॅथॉरिटी’सारख्या एजन्सीकडून आराखडा तयार केला पाहिजे. त्यास मुख्यमंत्री नक्कीच परवानगी देतील. ‘टाउन प्लॅनिंग’सारखी यंत्रणा 20-20 वर्षे आराखडा तयार करीत नाही. यासारखी भुक्कड संस्था मी पाहिलेली नाही.’
गडकरी म्हणाले, ‘पुण्याच्या विकासासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत.पुण्याच्या विमानतळासाठी अपूर्ण असलेली परवानगी लवकरच मिळवून देईल. मुख्यमंत्री फडणवीस आणि मी नागपूरचा असून सगळा निधी तिकडेच नेत असल्याची चर्चा आहे. पश्मिच महाराष्ट्रासाठी आम्ही तेवढेच प्रयत्न करीत असून या ठिकाणी एक लाख कोटी रुपये विकासावर खर्च करण्याचे नियोजन आहे.’
दरम्यान, रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि निर्यातीला चालना देण्यासाठी ‘ड्रायपोर्ट’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारला विनंती आहे, की त्यांनी नगर, सांगली, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली तर, त्या ठिकाणी आम्ही ‘ड्रायपोर्ट’ बांधण्यास तयार आहे. या ठिकाणी कंटेनरमध्ये माल भरून तो रेल्वे मार्गाने ‘जेएनपीटी’ला पाठवता येऊ शकेल, असे गडकरी यांनी सांगितले.
नागपूरपेक्षा पुण्याची मेट्रो सुंदर होणार... 
नागपूरच्या मेट्रोसाठी मी बारीक बारीक गोष्टींची काळजी घेतली आहे.या मेट्रोचे डिझाइन फ्रेंच, जर्मन आर्किटेक्ट यांनी तयार केले आहे. येथील एक स्टेशन वीस मजली आहे. पुण्याची मेट्रो हीच मंडळी करत आहेत. त्यामुळे नागपूर मेट्रोमध्ये राहिलेल्या त्रुटी पुण्यात दूर केल्या जातील. पर्यायाने पुण्याची मेट्रो नागपूरपेक्षाही सुंदर असेल, असे गडकरी म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांचाही घेतला समाचार... 
येत्या पाच वर्षांत 25 लाख कोटी रुपयांची कामे करायची आहेत.आतापर्यंत सहा लाख कोटी रुपये दिले आहेत. विकासकामांसाठी पैसे कमी नाहीत. अधिकारी वेळेवर काम करीत नाहीत, ही खरी समस्या आहे. त्यांच्यामागे ‘डंडा’ देऊन मागे लागावे लागते, ही खरी परिस्थिती आहे. पुण्यातील भूसंपादनाकरिता 1200 कोटी रुपये येथील जिल्हाधिकाऱ्यांजवळ जमा आहे. हे पैसे बँकेत ठेवण्यात आले असून त्याचे व्याज घेण्यात येते. आता त्यांनी सांगितले, की नऊशे कोटी रुपये खर्च केले आहेत. भूसंपादन झाले, की कळंब,खेड,मंचर,आळेफाटा,नारायणगाव येथील बायपासचे काम सुरू करू. पैशांची काही कमी नाही.
गडकरी उवाच
- मुंबई-गोवा चौपदरीकरणारे काम सुरू, 18 हजार कोटी रुपये खर्च होणार.
- कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम मार्गी लागणार. यासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद.
- पालखी मार्गांसाठी 2100 कोटी रुपयांची तरतूद, तीन महिन्यांत या कामांचे भूमिपूजन करणार.
- नगर, मुंबई, गोवा, रायगड यांना जोडणाऱ्या विविध 12 रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार.
- पुण्याच्या आजूबाजूचे 13 रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांना 600 कोटी रुपये मंजूर.
गडकरींच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह... 
‘सातारा महामार्गाची रखडलेली सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्यांत पूर्ण केली जातील,’ या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिलेल्या आश्वासनावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कारण, ‘रिलायन्स इन्फ्रा’ने ही कामे पूर्ण करण्यासाठी यापूर्वीच 31 मार्च 2018पर्यंत मुदतवाढ मागितली आहे.
दरम्यान,खंबाटकी घाटात नवीन बोगदा तयार करण्याची घोषणा गडकरी यांनी केली असून त्यासाठी एक हजार कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ‘रिलायन्स इन्फ्रा’ने मागितलेली मुदतवाढ पाहता त्यांना येथून पुढे सात महिन्यांचा कालावधी काम करण्यासाठी लागणार आहे. वास्तविक, येथील कामाचा वेग पाहता रुंदीकरणासह दोन उड्डाणपूल आणि 11 भुयारी मार्गांची अपूर्ण कामे सहा महिन्यांत पूर्ण होणार का, यात शंका आहे. त्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गाला लागलेला काळ डाग पुसण्यास गडकरींना यश मिळणार का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
सातारा महामार्गाचे रखडलेले काम हा काळा डाग असून, येत्या सहा महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत ते काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी चांदणी चौक येथील दुमजली उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात रविवारी दिले. मात्र, वास्तवात सातारा महामार्गाच्या प्रलंबित कामांची परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येते. देहू रस्ता ते सातारा या 140 किमी अंतरामध्ये दोन उड्डाणपूल, वाहनांसाठी पाच भूयारी मार्ग आणि पादचाऱ्यांसाठी सहा भुयारी मार्ग आदी कामे बाकी आहेत. या पैकी एक उड्डाणपूल व वाहनांच्या तीन भुयारी मार्गांचे काम फेब्रुवारी व मार्च  2018 पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय आहे. तर, उर्वरित कामे ३१ डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होतील, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागीय कार्यालयाने व्यक्त केली आहे. ही सर्व माहिती खुद्द महामार्ग प्राधिकरणानेच माहितीच्या अधिकारात दिली आहे.
गडकरींकडूनही तारीख पे तारीख...
देहूरोड ते सातारा या 140 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम ऑक्टोबर 2010मध्ये सुरू झाले. ते 31 मार्च 2013पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र, या मुदतीत सहा पदरीकरणाचे 40 टक्के कामही पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे ठेकेदार कंपनीला 31 डिसेंबर 2015पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या वाढीव मुदतीतही कंपनीने 60 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण केले नाही.त्यानंतर पुण्यातील लोकप्रतिनिधींसोबत गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नितीन गडकरींकडे सातारा महामार्गाचा प्रश्न मांडण्यात आला होता.त्या वेळी त्यांनी ‘रिलायन्स इन्फ्रा’ला सहा महिन्यांची डेडलाइन दिली होती. या मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर ‘रिलायन्स इन्फ्रा’ काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता. ती डेडलाइन उलटून काही महिने झाले. संबंधितांवर कारवाई झाली नाही, परंतु त्यांना पुन्हा नव्याने सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
भाजपमध्येच श्रेयवादाचा ‘अंक’
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या श्रेयवादाची सुंदोपसुंदी सुरू असतानाच त्यातील मानापमान नाट्याचा प्रत्यक्ष प्रयोग रविवारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्याच उपस्थितीत रंगला. या उड्डाणपुलाचे श्रेय कोणाचे, यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या ‘फ्लेक्सयुद्धा’पेक्षा भाजप अंर्तगत झालेली फ्लेक्सबाजी पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरली होती. त्याचा प्रत्यय रविवारी पुणेकरांना आला.
अत्यंत वर्दळीच्या चांदणी चौकात उड्डाणपुलाची मागणी वारंवार होत होती. या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सल्लागार नेमून अहवालही घेतला. मात्र, हे काम पुढे सरकू शकले नाही. सत्ताबदलानंतर गडकरी यांनी या कामाला गती देऊन त्याचे भूमिपूजन रविवारी सकाळी केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले असल्याने दोन पक्षांतील वादाची झलक ही केवळ ‘फ्लेक्स’बाजीवर दिसली. मात्र, श्रेयवादातून भाजपअंर्तगत असलेली ‘फ्लेक्स’बाजीची झलक खऱ्या अर्थाने रविवारी चर्चेचा विषय ठरली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच निवेदक ​सुधीर गाडगीळ यांनी गडकरी यांचा सत्कार एकदाच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. केंद्र सरकारचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि आभार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केले. त्यामुळे स्थानिकांना बोलण्यास संधी मिळण्याचा प्रश्न नव्हताच. भाषणा ची संधीही पाहुण्यांशिवाय स्थानिक आमदार, खासदारांनाच देण्याचे नियोजन करण्यात आले होते.
चांदणी चौक हा परिसर खडकवासला विधानसभा मतदारसंघात येत असल्याने आमदार भीमराव तापकीर यांना भाषणाची संधी मिळाली.ते व्यासपीठावर येत असतानाच झालेल्या ढोलवादनाने श्रेयवादाची चुणूक दिसली.तापकीर यांनी स्वतः व भाजपने या पुलासाठी कसे प्रयत्न केले, याचे दाखले देतानाच कोथरूडच्या आम दार मेधा कुलकर्णींचे नाव घेणे टाळले.
कुलकर्णी या स्थानिक आमदार नसल्याने त्यांना भाषणाची संधी मिळाली नाही. ‘प्रोटोकॉल’च्या नावाखाली चांदणी चौकासाठी सतत प्रयत्नशील राहून पाठपुरावा करणाऱ्या आमदार कुलकर्णी यांना जाणीवपूर्वक भाष णापासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रमानंतर केला.
दरम्यान, कुलकर्णी यांनी ‘प्रोटोकॉल’ बाजूला ठेवून गडकरींचा पुणेरी पगडी घालून सत्कार केला. पकीर यांनीही ही संधी सोडली नाही. कुलकर्णी यांच्यानंतर लगेचच त्यांनीही गडकरी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार केला. हा सर्व प्रकार नगरसेवकांनी पाहिल्यावर तेही गडकरींच्या सत्कारासाठी पुढे धावले. भाजपच्या नगरसेवकांनीही पक्षातील प्रतिस्पर्धी नगरसेवकाने सत्कार केल्याचे पाहून तेथील पुष्पगुच्छ गडकरींच्या हातात देऊन फोटो काढण्याची संधी गमावली नाही. पालकमंत्र्यांसह अन्य वक्त्यांनीही मेधा कुलकर्णींना हे श्रेय देण्याचे टाळले. असा हा श्रेयवादाचा ‘अंक’ बावधन-कोथरूडकरांच्या चिरकाल स्मरणात राहिला नाही तरच नवल.
‘दोन महिन्यांत काम सुरू करणार’
मुंबई ‘आयआयटी’मधील तज्ज्ञांकडून या पुलाचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. यासाठी 14 हेक्टर जागा महापालिका देणार असून त्यापैकी चार हेक्टर जागा त्यांच्या ताब्यात आहेत. येत्या तीन महिन्यांत उर्वरित सर्व जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात देण्याचे आश्वासन दिले असून पुढील दोन महिन्यांत चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येईल, असे नितीन गडकरी यांनी जाहीर केले.
पवार म्हणाले, ‘पुणे देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनले आहे. या शहराच्या आजूबाजूला ‘ऑटोक्लस्टर’ तयार झाले आहे. या ठिकाणी तयार होणाऱ्या वाह​नांची विक्री केवळ देशातच नव्हे, तर परदेशात होते आहे. या क्षेत्रात 15 हजारांहून अधिक इंजिनीअर्स, टेन्कोक्रॅट्स काम करतात. नव्याने विकसित होणारे रस्ते या शहराच्या विकासात भर घालणारा आहे.’
गडकरींबद्दल गौरवोद्गार काढताना पवार म्हणाले, ‘रस्ते हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे साधन असते. कमी खर्चात, मर्यादित वेळेत दळणवळणाची साधने उपलब्ध झाली, तर त्याचा फायदा विकासासाठी होतो. गडकरी यांनी या कामात मनापासून लक्ष घातले आहे आणि त्याचा मला आनंद आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा हा महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात उमटवला आहे, याचा आम्हा सगळ्यांना मनापासून आनंद आहे.’
चांदणी चौक उड्डाणपुलाच्या कार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.

Post a Comment

 
Top