Add

Add

0
                 महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने परात्पर गुरु डॉ.आठवले लिखित
     सूक्ष्म-चित्रकलेमागील शास्त्र या विषयावर शोधनिबंध सादर...
 पुणे(प्रतिनिधी):-सारायेवो (बॉस्निया आणि हर्जेगोविना, युरोप) येथे 12 आणि 13 ऑक्टोबर 2017 या दिवशी शिक्षण, संस्कृती आणि ओळख (Education, Culture and Identity) या विषयावर सारायेवो आंतरराष्ट्रीय विश्‍वविद्यालयाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत 13 ऑक्टोबर या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सूक्ष्म-चित्रकलेमागील शास्त्र या विषयावर या विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि संत पू. (सौ.) योया वाले यांनी लिहिलेला शोधनिबंध सर्बिया येथील साधक श्री. देयान ग्लेश्‍चिच यांनी सादर केला. या परिषदेत संस्कृती, कला, शिक्षण, अर्थव्यवस्था, ओळख, मानसशास्त्र, साहित्य इत्यादी विषयांतील 21 देशांतील संशोधक आणि शिक्षणतज्ञ यांनी एकूण 30 शोधनिबंध सादर केले. 
साधनेचा पाया भक्कम असेल, तर सूक्ष्म-चित्रकार आपल्या कलेद्वारे मानवजातीसाठी भरीव योगदान देऊ शकतात ! - श्री. देयान ग्लेश्‍चिच, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय 
     परिषदेत सूक्ष्म-चित्रांमागील शास्त्र समजावून सांगतांना श्री. ग्लेश्‍चिच म्हणाले, सूक्ष्म-चित्र म्हणजे एखाद्या चित्रकाराला त्याच्या सूक्ष्मज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे जाणवते, त्याचे त्याने रेखाटलेले चित्र. वेगवेगळ्या सूक्ष्म-चित्रकारांनी एखादी वस्तू किंवा घटना यांच्या सदंर्भात काढलेल्या चित्रांमध्ये कमालीचे साम्य असते, तर भेद केवळ त्यातील तपशिलाच्या सखोलतेत असतो. सूक्ष्म चित्रांचे सत्य, काल्पनिक, भासमान, मायावी, भावनिक इत्यादी अनेक प्रकार असतात. केवळ उन्नत आध्यात्मिक गुरु या चित्रांची सत्यता पडताळू शकतात. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे या चित्रांची सत्यता पडताळण्याचे कार्य करतात. त्यांनी सूक्ष्म ज्ञानेंद्रिय जागृत असलेल्या साधकांकडून साधना करवून घेतली, तसेच त्यांची ही कलाही टप्प्याटप्प्याने विकसित करवून घेतली. आज हे सूक्ष्म-चित्रकार स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे जाऊनही सूक्ष्म परीक्षण करून त्याचे चित्र काढू शकतात. त्यामुळे या माध्यमातून सूक्ष्म जगताविषयी सखोल आणि सत्य माहिती मिळू शकते. आधुनिक विज्ञानाने आता कुठे सूक्ष्म जगताचा शोध घ्यायला आरंभ केला आहे. हे भले एक छोटे पाऊल असले, तरी ते महत्त्वाचे आहे. सूक्ष्म जगत जाणण्यासाठी आजही मानवाचे सूक्ष्म ज्ञानेंद्रिय हेच सर्वोत्कृष्ट साधन आहे. उन्नत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे सूक्ष्म ज्ञानेंद्रिय जागृत केल्यानंतर सूक्ष्म-चित्रकाराला प्रत्यक्ष वस्तूस्थितीची जाणीव होते, जी आपल्या स्थूल जगताच्या मर्यादित जाणिवेपेक्षा कैक पटींनी अधिक असते. सूक्ष्म-चित्रकार आपल्या कलेद्वारे सूक्ष्म-जगताविषयी सखोल ज्ञान देऊन मानवजातीसाठी भरीव योगदान देऊ शकतात; परंतु त्यासाठी आधी त्यांचा साधनेचा पाया भक्कम असणे अत्यावश्यक आहे. एकदा हा पाया भक्कम झाला की, उन्नत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या माध्यमातून मानवाला जीवनविषयक, तसेच प्रतिदिन तो करत असलेल्या कृती आणि त्यांचा होणारा परिणाम यांविषयी अधिक स्पष्ट अन् समग्र दृष्टी प्रदान केली जाऊ शकते. 
क्षणचित्रे..  
1. इतर शोधनिबंधांच्या तुलनेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने सादर केलेल्या शोधनिबंधाच्या वेळी दुप्पट उपस्थिती असणे : परिषदेत एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांवरील अनेक शोधनिबंध समांतर सत्रांत सादर केले जात असल्याने प्रत्येक सादरीकरणाला कमाल उपस्थिती 10 ते 15 एवढी होती. या शोधनिबंधाच्या सादरीकरणाची वेळ झाली, तेव्हा सभागृहात कोणीही उपस्थित नव्हते; परंतु विषयाला आरंभ केल्यावर एक-एक करून उपस्थितांची संख्या अनुमाने 30 झाली. प्रामुख्याने अमेरिका, बॉस्निया, तुर्कस्थान येथील शिक्षणतज्ञ, तसेच सारायेवो आंतरराष्ट्रीय विश्‍वविद्यालयातील विविध देशांतील विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. 
2. वेगळा विषय असूनही उपस्थितांनी जिज्ञासेने ग्रहण करणे आणि पुष्कळ शिकायला मिळाल्याचे सांगणे : शोधनिबंधाचा विषय नेहमीच्या पठडीतील नसूनही उपस्थितांनी जिज्ञासेने ग्रहण केला. सादरीकरणानंतर 5-6 शिक्षणतज्ञांनी आवर्जून येऊन सांगितले की, विषयाची मांडणी उत्कृष्ट होती आणि त्यांना पुष्कळ शिकायला मिळाले. 
3. पुढील सादरकर्ते अनुपस्थित राहिल्याने उपस्थितांना प्रश्‍न विचारायला पुष्कळ वेळ मिळणे आणि दिलेल्या उत्तरांनी त्यांनी समाधान झाल्याचे सांगणे : खरेतर सादरीकरणासाठी प्रत्येकाला कमाल 20 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता; परंतु या शोधनिबंधाच्या नंतर शोधनिबंध सादर करणारी व्यक्ती अनुपस्थित राहिल्याने सादरीकरणासाठी एकूण 35 मिनिटे मिळाली. त्यामुळे उपस्थितांना प्रश्‍न विचारायला पुष्कळ वेळ मिळाला. अन्यत्र विशेष प्रश्‍न विचारले गेले नव्हते; परंतु येथे विविध प्रश्‍न विचारले गेले. उपस्थितांनी जिज्ञासू वृत्तीने अनेक प्रश्‍न विचारले आणि दिलेल्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाल्याचे सांगितले. 
4. स्वतः चित्रकार असलेल्या कला विभागाच्या नियंत्रकाने (मॉडरेटरने) महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासह कार्य करण्याची इच्छा व्यक्त करणे : कला विभागाच्या नियंत्रक स्वतः चित्रकार आहेत आणि इस्लामिक अन् आंतरधर्मीय संकल्पनांवर चित्रे काढतात. त्यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासह कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. 

5. पाच शिक्षणतज्ञांशी संपर्क माहितीची देवाण-घेवाण झाली.

Post a Comment

 
Top