Add

Add

0
 ‘इथेनॉल ॲज ट्रान्सपोर्ट फ्युएल’ परिषदेचे उद्घाटन
      पुणे (प्रतिनिधी ):- इथेनॉलचा इंधन म्हणून योग्य प्रमाणात वापर केल्याने ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल  तसेच  देशाची आर्थिक स्थिती सक्षम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
     सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सी.आय.आर.टी ) भोसरी येथे ‘इथेनॉल ॲज अ ट्रान्सपोर्ट फ्युएल’ या विषयावर घेण्यात येणाऱ्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे, खासदार सर्वश्री शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार सर्वश्री भिमराव तापकीर, महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, राजेश टोपे, मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील,  सी.आय.आर.टी चे संचालक डॉ. राजेंद्र सनेर पाटील, केंद्रिय परिवहन व राजमार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव अभय दामले, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या अध्यक्षा डॉ. विद्या मुरकुंबी, डॉ. सरिता रेड्डी, प्रमोद चौधरी आदी मान्यवर  उपस्थित होते.
     श्री.गडकरी म्हणाले, देशात कच्च्या तेलाची अधिक प्रमाणात आयात होत असल्यामुळे देशाचे अर्थिक नुकसान होत आहे. तसेच पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांमुळे प्रदूषण वाढत आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध  होत नाहीत व इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत आपण इथेनॉलचा पर्यायी इंधन म्हणून विचार करु शकतो. इथेनॉल हे अल्प दराचे प्रदूषण विरहीत इंधन आहे. सध्या मागणी प्रमाणे बाजारात इथेनॉल उपलब्ध नाही, त्याचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे. शेतीच्या कचऱ्यापासून आपण इथेनॉलची निर्मिती करु शकतो. यामुळे ग्रामीण भागात रोजगार वाढेल. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी वाहन निर्मिती कंपन्यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या देखील बनवल्या आहेत. त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. तसेच या परिषदेतून जे काही विचार मंथन होईल, त्याचा विचार करुन हा प्रयोग यशस्वी करण्यास जलद गतीने काम करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
     श्री.प्रधान म्हणाले, देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी इथेनॉलच्या वापराबरोबरच त्याची उत्पादकता वाढवण्याची गरज आहे. इथेनॉलवर गाड्या चालल्यास सर्वसाधारण नागरिकांसह देशालाही आर्थिक फायदा होईल. इथेनॉलचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी पुण्यात उच्च केंद्र निर्माण करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी  दिली.
      यावेळी डॉ. राजेंद्र सनेर पाटील, अभय दामले व  अण्णासाहेब पाटील यांची स्वागतपर भाषणे झाली तर सुत्रसंचालन मंजुषा तेहावकर यांनी केले.
   कार्यक्रम स्थळी इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याची पाहणी मान्यवरांनी केली.

000000

Post a Comment

 
Top