Add

Add

0

           
पुणे (प्रतिनिधी ):-वाचनसंस्कृती वाढावी आणि नवनवीन साहित्य संपदेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी, ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथोत्सव साहित्य रसिकांसाठी पर्वणी असून त्याचा लाभ सर्व नागरिकांना घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले.
ग्रंथालय संचालनालयाच्या जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने येथील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या जिजामाता मुलींच्या शाळेत जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करताना उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे बोलत होते. सहायक ग्रंथालय संचालक द.आ.क्षीरसागर, ग्रंथपाल सु.हि.राठोड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती उज्वला लोंढे, विविध शासनमान्य सार्वजनिक वाचलनालयाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन युवक युवती यावेळी उपस्थित होते.
राज्याच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत वाचनसंस्कृती वाढावी आणि साहित्य क्षेत्रातील घडामोडींची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. 25 आणि 26 नोव्हेंबर या कालावधीत हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवात राज्यातील प्रसिध्द पुस्तक प्रकाशन संस्थांनी ग्रंथ व साहित्याचे प्रदर्शन करणारे स्टॉल लावले आहेत.
ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानंतर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी उपस्थित मान्यवरांसमवेत विविध पुस्तक प्रकाशनांच्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली.  
लोकराज्य स्टॉलला भेट
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल ग्रंथेात्सवात लावण्यात आला आहे. या स्टॉलला भाऊसाहेब गलांडे यांनी भेट देऊन लोकराज्य मासिकाची पाहणी केली.
            दोन दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये मान्यवरांचे व्याख्यान व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. साहित्य व समाज या विषयावर ज्येष्ठ साहित्यीक राजन खान, आनंदी जीवनासाठी ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्व या विषयावर अनिल गुजाळ, संत साहित्य काळाची गरज या विषयावर डॉ.अरविंद नेरकर बोलणार आहेत. प्रदिप निफाडकर गझलदिप सादर करणार असून उल्हासदादा पवार यांचे ग्रंथोत्सव व ग्रंथालय चळवळ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामुल्य असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती उज्वला लोंढे यांनी यावेळी केले.
ग्रंथदिंडी... 
       ग्रंथोत्सवामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सकाळी महात्मा फुले भाजी मंडई येथून कार्यक्रमस्थळापर्यत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थींनी,साहित्यीक, साहित्यप्रेमी नागरिक, वाचनालयाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
क्षणचित्रे
·        ग्रंथ दिंडीमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्यासंबधी माहिती देणारे फलक हाती घेऊन विद्यार्थी उत्साहात भजन-किर्तन करीत होते.
·        ग्रंथदिंडीमध्ये भारताचे संविधान, श्रीमद भगवद्गिता  ग्रंथ, पुस्तके ठेवण्यात आली होती.
·        ग्रंथ दिंडीमध्ये समाजातील सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते.

·        ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांनी पारंपारिक फुगडी खेळून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

Post a Comment

 
Top