Add

Add

0

 पिंपरी (प्रतिनिधी):- हिंजवडीमधील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) कंबर कसली आहे. आयटी पार्कमधील टप्पा तीनमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्याचे काम येत्या चार महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या प्रकल्पामध्ये 150 टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. 

एमआयडीसीमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे महामंडळाने आयटी पार्कमधील टप्पा तीनमध्ये तीन एकर जागा या प्रकल्पासाठी आरक्षित केली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीसाठीची लवकरच निविदा काढण्यात येणार असून, त्या ठिकाणी ऑरगॅनिक (सेंद्रिय) आणि इनऑरगॅनिक (असेंद्रिय) अशा दोन्ही प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडे निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर या ठिकाणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. आयटी कंपन्यांबरोबरच या भागात काही निवासी इमारती आणि हॉटेल उभी राहिली 
आहेत. आयटी कंपन्यांव्यतिरिक्‍त त्यांच्याकडे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणदेखील सर्वाधिक आहे.


या सर्व कचऱ्यावर या ठिकाणी प्रक्रिया करता येणे शक्‍य होणार आहे. 
कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने त्या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होत आहे. माण-हिंजवडी रस्ता तसेच नदीकडे जाणाऱ्या ‘एमआयडीसी’च्या भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. हिंजवडी ग्रामपंचायत कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी महिन्याला सहा लाख रुपये खर्च करते. औद्योगिक परिसरात निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी एमआयडीसीची स्वतंत्र यंत्रणा आहे; मात्र ती कुचकामी आहे. बऱ्याचदा हा कचरा गावाच्या वेशीवर नेऊन टाकण्यात येतो. याबाबत इथल्या नागरिकांनी अनेकदा एमआयडीसीकडे लेखी तक्रारीही केल्या असल्या, तरी त्यावर कोणताही निर्णय होत नसल्याची प्रतिक्रिया हिंजवडीमधील ग्रामसेवकांनी दिली.


सीएनजी गॅसची निर्मिती होणार
हिंजवडीमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर तिथे प्रक्रिया करण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या माध्यमातून सीएनजी गॅसची निर्मिती करणे शक्‍य होणार आहे. शहरामध्ये सध्या सीएनजी गॅसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा फायदा होणार असल्याचे संतोषकुमार देशमुख यांनी स्पष्ट केले.


असा असेल प्रकल्प
150 टनांवर प्रक्रिया
टप्पा तीनमधील तीन एकर जागेवर प्रकल्प
सेंद्रिय आणि असेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया
सीएनजीही मिळणार


कचऱ्याची समस्या कशामुळे?
हिंजवडी आणि परिसरात दररोज पाच टन कचऱ्याची निर्मिती होत असून, महिन्याला हे प्रमाण 150 टनांपर्यंत जाते. 
औद्योगिकरण वाढत असताना दुसरीकडे या परिसरात हॉटेल आणि रहिवासी परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 
2011 च्या जनगणनेनुसार हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांची संख्या 11 हजार 349 पर्यंत नोंदवण्यात आली आहे. 
वाढत्या शहरीकरणामुळे या भागातील लोकसंख्या सध्या 49 हजारांपर्यंत जाऊन पोचली आहे. 
लोकसंख्यावाढीमुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. 

Post a Comment

 
Top