Add

Add

0
पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 4 ते 8 जानेवारी यादरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ही जत्रा भरविली जाणार आहे.
पवनाथडी जत्रा भरविण्यासंदर्भात महापालिकेत बैठक झाली. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक सुरक्षा अधिकारी विलास वाबळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, किशोर केदारी आदी उपस्थित होते.
स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, “पवनाथडी जत्रेबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने योग्य प्रचार करण्यात यावा. जत्रेच्या कालावधीत दररोज विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जावे. विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर स्पर्धा घ्यावी. प्लास्टिकमुक्त शहर, ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करणे, स्त्री-भ्रूण हत्या यांसारख्या सामाजिक विषयांवर व्याख्यान आयोजित केले जावे. स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृतीपर कवी संमेलनाचे आयोजन करावे. स्टॉल धारकांसाठी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. जत्रेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी पुरेशी यंत्रणा तैनात करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.”
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, “महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात. याकरीता पवनाथडी जत्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. पवनाथडी जत्रेत निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन ठेवण्यात यावे, असेही ते म्हणाले.”
बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले.

Post a Comment

 
Top