Add

Add

0
पद्मभूषण डॉ. एन. राजम यांची भावना; 
‘संत श्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत


पुणे (प्रतिनिधी ):-“आजच्या भेदाभेदाच्या जमान्यात सर्व मानवजातीला एकत्र जोडणारा दुवा  म्हणजे संगीत हा एक आशेचा किरण आहे.,”असे प्रतिपादन सुप्रसिध्द व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ. श्रीमती एन. राजम  यांनी केले. त्याच बरोबर त्यांनी व्हायोलिन वादनाचे सप्रयोग प्रतिपादन केले. 
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ‘संगीतातून ईश्‍वराचा साक्षात्कार’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड होते. 
याप्रसंगी विश्‍वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ.मिलिंद पांडे,एमआयटीचे प्राचार्य डॉ.एल.के.क्षीरसागर,नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन .पठाण व मिटसॉगच्या सहयोगी संचालिका डॉ.एस. हरिदास हे उपस्थित होते. 
सुरूवातीला श्रीमती एम.राजम यांनी संत मीराबाई, संत तुलसीदास, संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या काही परिचित भक्तीगीतांच्या स्वररचनांचे वादन केले. त्यानंतर त्यांनी शास्त्रीय व सुगम संगीतातील फरक स्पष्ट केला.त्या म्हणाल्या,“एकाच प्रकारचे भक्तीगीत किंवा भजनाचे वादन किंवा गायन जेव्हा एखादा सुगम गायक किंवा वादक सादर करतो, तेव्हा त्या रचनेच्या संगीताहुकूम त्याचे वादन असते. पण एखादा शास्त्रीय गायक किंवा वादक जेव्हा ती रचना सादर करतो, तेव्हा दोन कडव्यांच्या मधील भाग तो स्वतःच्या प्रतिभेनुसार रंगवीत असतो. भारतीय शास्त्रीय संगीतातच हे स्वातंत्र्य असते. पाश्‍चात्य संगीतात मात्र त्या बाबत स्वातंत्र्य असत नाही.” 
“सुगम असो वा शास्त्रीय, मुख्य म्हणजे श्रोत्यांना एका उच्च पातळीवर नेऊन प्रत्यक्ष ईश्‍वराचे दर्शन घडविणे किंवा मोक्षाचे द्वार उघडून देणे ही क्षमता भारतीय संगीतात आहे. यासाठी श्रोत्यांना संगीताच्या शास्त्राचे ज्ञान असण्याची मुळीच आवश्यकता नाही. अर्थात जर ते ज्ञान असेल, तर दुधात साखरच पडल्यासारखे होईल. म्हणून आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी जे अनेक मार्ग आहेत, त्यामध्ये संगीत हा एक प्रमुख घटक आहे.”
प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ ज्ञान, भक्ती व कर्मयोग  याचा मिलाफ  असलेले संगीत आपल्याला प्रत्यक्ष देवाकडे घेऊन जाते. संगीताच्या साधनेतून ईश्‍वर दर्शन हा आमच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. २१व्या शतकात जगाला शांतीचा संदेश फक्त संगीतच देऊ शकते.”
सकाळच्या सत्रात डॉ धनंजय केळकर व डॉ.संजय उपाध्ये यांची व्याख्याने झाली. 
आरोग्यपूर्ण सूखाच्या शोधात, या विषयावर डॉ.धंनजय केळकर म्हणाले,“ निसर्ग हाच सर्वात मोठा देव आहे. तो कल्पनेपलिकडील आहे. यामध्ये जबरदस्त गुढता, आश्‍चर्य आणि साहस अशा गोष्टींचा समावेश आहे. सृष्टीवरील जंगल, समुद्र, बर्फ, वाळवंट या गोष्टींच्या सान्निध्यात गेल्याशिवाय आपल्याला सुख काय असते, हे कळणार नाही. याचा अनुभव घेण्यासाठी प्रचंड इच्छा शक्तीची गरज आहे. काश्मीर व लद्दाख यांच्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर सुखाचा एक प्रकार अनुभवास येतो. आपण आपले रोजचे जीवन अतिशय चाकोरीबद्ध जगत असतो. त्या पलिकडे जाऊन निसर्गाजवळ गेले पाहिजे. ”
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले, आनंदासाठी भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करण्याऐवजी वर्तमान काळातील प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यावा. मनस्थिति बदलल्या शिवाय परिस्थिती बदलणार नाही. हे सूत्र सदैव ध्यानात ठेवा. मानवाला दुख पोहचविण्याचे सर्वात मोठे कारण नकारात्मक विचार आहे. म्हणून सदैव जिंकलो ऐसे म्हणा. म्हणजे तुम्ही सतत आनंदात रहाल व इतरांनाही आनंदी कराल. मुख्य म्हणजे तुमची कार्यक्षमता वाढेल व तुमचा प्रत्येक क्षण सुखात जाईल.”
डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top