Add

Add

0

शेतमालाची ग्राहकांना थेट विक्री करता यावी यासाठी ‘शेतकरी आठवडी बाजार’ ही संकल्पना पुढे आली.

                               40 पैकी 10 बाजारच अधिकृत
पुणे (प्रतिनिधी):- ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असलेले मात्र मिळेल त्या जागेत सुरू करण्यात आलेले शहरातील निम्म्याहून अधिक ‘शेतकरी आठवडी बाजार’ अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे.आठवडी बाजार सुरू करण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता केवळ स्थानिक नगरसेवकाच्या ‘शिफारस पत्रा’वरून आठवडी बाजार सुरू होत आहेत. पणन मंडळाकडून यावर नियंत्रण अपेक्षित असतानाही त्यांच्याकडून समूह शेतकरी गटांना किंवा आयोजकांना परस्पर मान्यता दिली जात आहे.
सध्या शहरात सुरू असलेल्या 40 आठवडी बाजारांपैकी जेमतेम 10 आठवडी बाजार अधिकृत असून अनधिकृत आठवडी बाजारांवर योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भातील पत्रव्यवहार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पणन मंडळाकडे केला आहे. पणन मंडळाकडून होत नसलेली कारवाई, कारवाई न करण्यासंदर्भात नगरसेव कांचा दबाव तसेच हे आठवडी बाजार ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे त्यावर कारवाई कशी करावी, अशा ‘तिहेरी’ अडचणीत अतिक्रमण विभाग सापडला आहे.
शेतमालाची ग्राहकांना थेट विक्री करता यावी यासाठी ‘शेतकरी आठवडी बाजार’ ही संकल्पना पुढे आली. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागामार्फत आठवडी बाजारासाठी महापालिकेने मोकळ्या जागा उपलब्ध करून द्याव्यात, असा आदेश काढण्यात आला. तसेच त्याबाबतचे धोरणही निश्चित करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार महापालिकेने शेतकरी आठवडी बाजार धोरणही तयार केले. त्याला मुख्य सभेनेही मान्यता दिली. त्यानुसार शहरातील काही मोकळ्या जागा महापालिकेने निश्चित केल्या. तसेच आठवडी बाजार कुठे भरविता येणार नाही, त्याचे निकषही निश्चित करण्यात आले. त्यानुसार महापालिकेच्या शाळा, शाळांची मैदाने, प्रकल्पांसाठी आरक्षित असलेल्या मात्र सध्या मोकळ्या असलेल्या जागा शेतकरी आठवडी बाजारांना देता येणार नाहीत, अशा निकषांचा त्यामध्ये समावेश होता.
महापालिकेच्या धोरणानुसार कोथरूड,शिवाजीनगर गावठाण,वडगावशेरी,वारजे आणि बावधन या परिसरातील आठवडी बाजारांचा प्रस्ताव पणन मंडळामार्फत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे आला. जागांची पाहणी करून त्याला मान्यता देण्यात आली.तसेच पाच ते सात शेतकरी आठवडी बाजार खासगी जागेत सुरू करण्याची मागणी काही समूह गट किंवा आयोजकांकडून करण्यात आली. खासगी मालकांची मान्यता असल्यामुळे त्यांनाही मान्यता देण्यात आली. मात्र त्यानंतर आठवडी बाजारांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन मोकळी जागा दिसली की तेथे आठवडी बाजार सुरू करण्याची चढाओढच सुरू झाली.त्यामुळे हा बाजार सुरू करण्यासाठी स्थानिक नगरसेवकाचे शिफारसपत्र पणन मंडळाला आयोजकांकडून देण्यात येत आहे. पणन मंडळाकडून महापालिकेकडे तशी मागणी होत आहे. मात्र त्याचे करारनामे होण्यापूर्वी किंवा त्याला मान्यता मिळण्यापूर्वीच हे बाजारही सुरू झाल्याचे अतिक्रमण विभागाला आढळून आले आहे. मात्र या प्रकारे सुरू झालेले हे सर्व बाजार अनधिकृत असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाने जाहीर केले आहे. त्याबाबत पणन मंडळाला स्मरणपत्रेही पाठविण्यात आली असून शहरात जेमतेम दहा आठवडी बाजार अधिकृत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
महापालिकेने मान्य केलेल्या जागांवर पूर्वपरवानगी न घेता शेतकरी समूह गटांकडून बाजार सुरू करण्यात आले आहेत. त्याबाबत जागेचा भाडे करारनामाही झालेला नाही. प्रशासकीय दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत गंभीर आहे. आठवडी बाजारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही पणन मंडळाची आहे. मात्र मंडळाकडून योग्य ती कार्यवाही होत नाही. या अनधिकृत आठवडी बाजारांवर योग्य नियंत्रण न ठेवल्यास ही बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे पत्र अतिक्रमण विभागाकडून पणन मंडळाला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास 30 हून अधिक शेतकरी बाजार अनधिकृत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भुईभाडे शुल्क 50 रुपये
या बाजारासाठी शंभर चौरस फुटांच्या प्रत्येक गाळ्याला शेतकऱ्यांना प्रतिपाच तासांकरता 100 रुपये भुईभाडे आकारण्याचे धोरणात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र या धोरणाला मान्यता देताना भुईभाडे शुल्क50 रुपये करण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top