Add

Add

0
- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निशिकांत मिरजकर,17 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन

पुणे(प्रतिनिधी):- अनेक प्रांतिक भाषांचे योगदान भारतभूमीला लाभले असून वेगेवेगळ्या भारतीय भाषां मधल्या साहित्यात निकोप आदान-प्रदान होत राहिले पाहिजे. मराठी समीक्षकांनी देखील संकुचितपणे विचार करणे सोडून देऊन देशातल्या विविध भाषांमधील प्रतिभावान साहित्यिकांचे योगदान लक्षात घेऊन मूल्यमापन केले पाहिजे. अनुवादाच्या क्षेत्रातही मराठी साहित्याने पाहिजे तशी मजल मारली नसून या क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपर्यंत मराठी अनुवादक पोहोचू शकलेले नाहीत,अशी खंत 17व्या साहित्यिक कलावंत संमेलना चे अध्यक्ष ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक आणि साहित्यिक डॉ. निशिकांत मिरजकर यांनी व्यक्त केली. 
येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित 17 व्या  साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन सिंबायोसिस शिक्षण समुहाचे संस्थापक-अध्यक्ष पद्मभूषण डॉ. शां.ब.मुजुमदार यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी डॉ. निशिकांत मिरजकर बोलत होते. यावेळी व्यासपीठवर प्रमुख पाहुण्या पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि सरहद, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार तसेच साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे आदी मान्यवर उपस्थित होते. या संमेलनाच्या निमित्ताने विविध पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
तत्पूर्वी सकाळी या दोन दिवसीय संमेलनानिमित्त आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य रावसाहेब गुरव यांच्या हस्ते, तर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी बोलताना डॉ. निशिकांत मिरजकर म्हणाले की, मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र शासन आणि मराठी साहित्य महामंडळासारख्या संस्था अजून खूप काही करू शकतात आणि त्यांनी तसे प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. दरवर्षी होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी केवळ निधी देऊन आपले कर्तव्य संपले, असे महाराष्ट्र शासन म्हणू शकत नाही. मराठी साहित्याच्या समृद्धीची जबाबदारी केवळ कोण्या एका घटकाची नसून महाराष्ट्र शासन, विविध साहित्यिक संस्था, लेखक, अनुवादक, समीक्षक, वाचक अशा सगळ्याच घटकांनी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजे. सर्वांगांनी बहरलेल्या मराठी साहित्याच्या विविध वाङमय प्रकारांनी नवनवीन मानदंड निर्माण केले आहेत. साहित्याचे आकृतिबंध आणि अविष्कार पद्धती यांमध्ये होणारे नवनवीन प्रयोग खरोखरच प्रशंसनीय आहेत. शिवाय अशा प्रकारच्या संमेलनातून सामान्यातील सामान्य घटकांपर्यंत साहित्याचे हे नवीव प्रवाह पोहोचण्यास निश्चितच चांगला हातभार लागत आहे. 
यावेळी बोलताना पद्मभूषण डॉ. शां.ब.मुजुमदार  म्हणाले की, दरवर्षी पुण्याच्या उपनगरात होणारे हे संमेलन कौतुकास्पद आहे. शैक्षणिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविलेल्या पुण्यात येणा-या विद्यार्थ्यां मध्ये साहित्यरुची निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत. 
यावेळी बोलताना संजय नहार  म्हणाले की,घुमान येथे झालेल्या संमेलनाच्या वेळी पंजाब सरकारने ज्याप्रकारे उदारमतवादी धोरण ठेवून सहकार्य केले, त्याप्रमाणे 2018 मध्ये बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी गुजरात सरकारने देखील उदारमतवादी धोरण ठेवले पाहिजे. महाराष्ट्राने पंजाबला नामदेव दिले, त्याचप्रमाणे मराठीभूमीने गुजरातला सयाजीराव गायकवाड दिले आहेत. कला आणि साहित्याविषयी महाराजा सयाजीराव गायकवाडांना खूप आस्था होती. आता तर देशाचे पंतप्रधान देखील गुजरातचेच असल्यामुळे आगामी संमेलनाविषयी मराठी बांधवांच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. 
महापौर मुक्ता टिळक यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि. दा. पिंगळे यांनी केले. 
संमेलनाच्या उद्घाटनानंतर दुपारी, कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त विंदा दर्शन हा विशेष कार्यक्रम प्रा.जयश्री करंदीकर-काळे यांनी सादर केला. सांस्कृतिक राष्ट्रवाद या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भूषविले. या परिसंवादात तुषार गांधी, प्रा.डॉ. शशिकला राय आणि संजय आवटे सहभागी झाले होते. तर संध्याकाळी गायिका चैत्राली अभ्यंकर यांच्या जीवनगाणे या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घेतला. त्यानंतर रात्री कवी एेश्वर्य पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात डॉ. अविनाश सांगोलेकर, दीपक करंदीकर, रामदास केदार, अनिल दीक्षित, गजानन सोनोने, भालचंद्र कोळपकर, बापूसाहेब पिंगळे, मनीषा घेवडे, विमल वाणी, धनंजय सोलंकर आणि सुनील जवंजाळ आदी सहभागी झाले होते. 

Post a Comment

 
Top