Add

Add

0
ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचा समारोप... 

पुणे (प्रतिनिधी ):-“योग आणि आत्मज्ञानाने प्रेरित होऊनच आपण विश्‍वशांती स्थापित करू शकतो. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून निर्माण होणारे ज्ञान-विज्ञान हे विश्‍व शांतीसाठी सर्वात प्रेरक असेल. भारतीय परंपरांमध्ये योगाचा पहिला प्रयोग ऋग्वेदात झाला. त्यानंतर या माध्यमातूनच मानव परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे,”असे प्रतिपादन भारत सरकारच्या आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त डॉ.ए.सी.शुक्ला यांनी केले. 
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 22व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रख्यात संगणकतज्ज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपति पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे होते. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू व हिंदू विश्‍वकोशाच्या दुसर्‍या खंडाचे प्रमुख संपादक डॉ.कपील कपूर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष  प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, व्याख्यानमालेचे समन्वयक आणि मिटसॉटचे प्रकल्प संचालक   प्रा.डॉ. मिलिंद पांडे, एमआयटी डब्ल्यूपीयू चे कुलसचिव (ग्रुप कॅप्टन) डी.पी. आपटे  व एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर हे उपस्थित होतेे.
डॉ.ए.सी.शुक्ला म्हणाले,“विश्‍वशांती बद्दल विचार केल्यावर हे कळते की मनामध्ये अशांती असेल, तर  आमचा विश्‍व आणि पर्यावरणाचा काय संबंध  जुळू शकणार नाही. सृष्टीमधील उर्जेचा योग्य वापर न करणे व मानवामध्ये वाढत चाललेली स्वार्थी भावना यामुळेच अशांती वाढत आहे. योग आणि समाधी हे अध्यात्म आहे. त्या माध्यमातूनच आपण विश्‍वात परिवर्तन घडवून आणू शकतो. आपल्याला परंपरेने दोन गोष्टी दिल्या आहेत. त्या म्हणजे तपस्या आणि ध्यान. तसेच, जीवनामध्ये धर्म हा वैराग्य निर्माण करून विश्‍वाला जोडतो. त्यातून आत्मशांती निर्माण होते. यातूनच विश्‍व शांती निर्माण होईल.” 
डॉ.कपिल कपूर म्हणाले,“ सुरूवातीपासून हा देश ज्ञान देणारा देश आहे. भारताने जगाला अध्यात्म दिले. पंजाब ने नाथपंथ व भक्ती दिली व तमिळनाडूने ज्ञान दिले. ज्ञानेश्‍वरांनी दोघांचा संगम घडवून आणला. पण वर्तमानकाळत जी संस्कृती आली आहे, ती म्हणजे पोटाची संस्कृती, विज्ञानात जेवढ्या गोष्टी होतात त्या फक्त सुख, सुविधा यावरच असतात. त्यामुळेच व्यक्ती हा शांती पासून दूर होत आहे. महाभारतीय युद्धावरून लोकांचा तत्त्वज्ञानावरून विश्‍वास उडाला. त्यानंतर भगवान महात्मा बुद्ध यांनी कर्म सिद्धांत मांडला. भागवत धर्माने फक्त कर्मसिद्धांत मांडला नाही, तर संत ज्ञानेश्‍वरांनी भक्ती परंपरा सुरू करून आत्मशांतीचा संदेश दिला. विज्ञान इंद्रियजन्य तर ज्ञान आंतरिक आहे.”
डॉ.विजय भटकर म्हणाले,“या देशातील तक्षशीला, नालंदा व काशी विद्यापीठ ही विश्‍वज्ञानाची भांडारे होती. भारताला जर 21व्या शतकात विश्‍वगुरू व्हावयाचे असेल, तर आपण या विद्यापीठांसारखी केंद्रे निर्माण केली पाहिजेत. सर्व सामान्य माणसाला सुद्धा समझेल, अशा तर्‍हेने येथील अध्यापनाची पद्धत असली पाहिजे. भाषा हा त्यातील मुख्य घटक आहे. त्यातूनच विश्‍वशांती साध्य होईल.”
प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ 1897 मध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितल्यानुसार भारत हा 21 व्या शतकात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. आजची परिस्थिती पाहता आपण योग्य त्या दिशेने प्रयत्न केल्यास हे भाकीत निश्‍चितपणे साध्य होईल.”
डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.


Post a Comment

 
Top