Add

Add

0

   मुळशी तालुक्‍यातील नवनाथ शिवाजी गायकवाड यांचा समावेश 

पुणे (प्रतिनिधी):- पैशांचा अपहार, अधिकाराचा गैरवापर, फसवणूक,सतत गैरहजर राहणे,सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी न करणे,जमा खर्चाचा ताळमेळ न ठेवणे, शासनाच्या निकषानुसार काम न करणे आदी प्रकारच्या तक्रारीमुळे जिल्ह्यातील नऊ गामसेवकांवर प्रामुख्याने फौजदारी तसेच चौकशी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली. मागील वर्षभराच्या काळातील विविध तक्रारी या नऊ ग्रामसेवकांबद्दल जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक वेल्हा तालुक्‍यातील पी. एस. गायकवाड, एम. बी. दुराफे आणि सचिन रमेश पेटारे या तीन ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानंतर जुन्नर तालुक्‍यातील आर.जी.शेंडगे आणि सुनील चिमाजी पारधी,तर मुळशी तालुक्‍यातील नवनाथ शिवाजी गायकवाड, शिरूर तालुक्‍यातील व्ही.ए. सोनवणे, हवेली तालुक्‍यातील एस. व्ही. लांडगे आणि इंदापूर तालुक्‍यातील गुलाब विष्णू जगताप यांचा समावेश
आहे.
पी. एस. गायकवाड यांच्यावर ओसाडे, मालवली ग्रामपंचायतीचे दप्तर अपूर्ण ठेवणे, मासिक अहवाल सादर न करणे, वा वित्त आयोग प्लॅन प्लस मध्ये न भरणे, वरिष्ठांच्या आदेशाची अयमान्यता करणे, अनधिकृत गैरहजर राहणे, तर एम. बी. दुराफे यांच्यावर घिसर कानंद आणि निवी घेवडे या ग्रामपंचायतीचा पदभार न घेता प्रशासनास वेठीस धरणे, अनधिकृत गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता करणे तसेच सचिन रमेश पेटारे यांच्यावर सोंडे सरपाला आणि सोंडे कार्ला ग्रामपंचायतीचा पदभार न देणे, अनधिकृतपणे सतत गैरहजर राहणे, लेखापरीक्षणास दप्तरी उपलब्ध करून न देणे आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता करणे या प्रमुख तक्रारी वेल्हा तालुक्‍यातील या तीन ग्रामसेवकांवर करण्यात आल्या आहेत.
जुन्नरचे आर. जी. शेंडगे यांच्यावर ग्रामपंचायत कर वसुलीची रक्कम हातशिल्लक ठेवणे, प्रमाणकाशिवाय खर्च करणे, मासिक अथवा ग्रामसभा वृत्त न लिहिणे, सचिव पदाच्या कर्तव्यात कसून करणे आदी कारणास्तव कारवाई करण्यात येत आहे. तर सुनील चिमाजी पारधी यांच्यावर ग्रामंपंचायत सजात सतत गैरहजर राहणे, दि.15 ऑगस्ट 2016 आणि दि. 26 जानेवारी 2017 रोजी ग्रामसभा न घेणे, मासिक दैंनदिनी सादर न करणे, ग्रामपंचायती आर्थिक नोंदवह्या अपूर्ण ठेवणे, वर्तणूक नियमांचे भंग करणे आदी विविध तक्रार करण्यात आल्या आहेत.
हवेली तालुक्‍यातील एस. व्ही. लांडगे यांच्यावर लोहगाव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना गाळे वाटप करताना विहित पद्धतीचा अवलंब न करता गाळे वाटप करणे, अनधिकृत बांधकामांना बेकादेशीर परवानगी देणे. वृक्ष लागवड आणि संरक्षक जाळ्या खरेदी करताना रकमेचा तात्पुरता अपहार करणे, ई-टेंडरिंगशिवाय कामे करणे आदी कामांबाबत लांडगे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून फौजदारी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुळशी तालुक्‍यातील नवनाथ शिवाजी गायकवाड यांच्यावर ग्रामसभांना सतत गैरहजर राहणे, अहवाल सादर न करणे, सजामध्ये विनापरवाना गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता करणे आदी तक्रारी गायकवाड यांच्यावर करण्यात आल्या आहेत.

शिरूरमधील व्ही. ए. सोनवणे यांच्यावर कारेगाव ग्रामपंचायतीचे खाते शिरूर येथे वरिष्ठांची परवानगी न घेता कॅनरा बॅंकेमध्ये उघडणे, या कार्यक्षेत्रातील कंपन्यांचे कराचे मिळणारे एक कोटी 61 लाख 22 हजार 817 रूपये बेकायदेशीरपणे या खात्यामध्ये जमा करून अपहार करणे आदी तक्रारी सोनवणे यांच्यावर करण्यात आल्या आहेत.
तसेच इंदापूर तालुक्‍यातील गुलाब विष्णू जगताप यांच्यावर रेडा, आजेती आणि पडस्थळ येथील ग्रामपंचायतीचे दप्तर तपासण्याकामी उपलब्ध करून न देणे, वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता करणे आणि वर्तणूक नियमांचा भंग करणे आदींबाबत ठपका ठेवण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top