Add

Add

0
अर्थतज्ज्ञांशी सकारात्मक चर्चा-    एन.के. सिंह
पुणे(प्रतिनिधी):- पंधराव्या वित्त आयोगातील सदस्यांनी समाजातील मान्यवर अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी अर्थतज्ज्ञांनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या असून ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती पंधराव्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांनी आज दिली.
            यशदा येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या सदस्यांची मान्यवर अर्थतज्ज्ञांशी चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी  श्री. एन. के. सिंह यांनी संवाद साधला.
अर्थतज्ज्ञांसोबतच्या बैठकीला आयोगाचे सदस्य शक्तिकांता दास, डॉ. अनुप सिंह, डॉ. अशोक लहेरी, डॉ. रमेश चांद, आयोगाचे सचिव अरविंद मेहता, राज्याच्या वित्त विभागाचे प्रधान सचिव राज गोपाल देवरा, वित्त आयोगाचे माजी चेअरमन विजय केळकर, आयोगाचे सहसचिव मुखमित सिंह भाटिया, डॉ. रवी कोटा, अर्थशास्त्र सल्लागार ॲनटॉय सायरीक, भारतभूषण गर्ग, प्रवीण जैन, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ उपस्थित होते.
            श्री. एन. के. सिंह म्हणाले, पंधरावा वित्त आयोग हा अत्यंत महत्वाची भूमीका बजावणार आहे. या ठिकाणी झालेल्या बैठकीत उपस्थित असणाऱ्या अर्थतज्ज्ञांनी अनेक महत्वपूर्ण सूचना मांडल्या. यामध्ये आर्थिक विकासाचा असमतोल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीत वाढ करणे, स्मार्ट सिटीच्या संख्येत वाढ करणे तसेच वाढत्या शहरीकरणाच्या समस्यांवर लक्ष देण्यासारख्या महत्वाच्या सूचनांचा समावेश आहे. या सर्व सूचनांची नोंद आयोगाने घेतली आहे.
महाराष्ट्र सरकारशी आयोगाची अजूनही औपचारीक चर्चा झालेली नाही, सप्टेबर महिन्यात ही चर्चा होणे अपेक्षीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Post a Comment

 
Top