Add

Add

0

लवासा निघाला दिवाळखोरीत; फ्लॅटधारकांना पैसे मिळणार ?

बहुचर्चित लवासा प्रकल्प विविध कारणांनी ठप्प पडल्याने दिवाळखोरीत निघाला आहे. त्यामुळे दिवाळखोरी व नादारी संहितेच्या (आयबीसी) नवीन नियमांनुसार फ्लॅटधारकांना त्यांचे पैसे परत मिळू शकतील.मुंबई (चिन्मय काळे):- बहुचर्चित लवासा प्रकल्प विविध कारणांनी ठप्प पडल्याने दिवाळखोरीत निघाला आहे. त्यामुळे दिवाळखोरी व नादारी संहितेच्या (आयबीसी) नवीन नियमांनुसार फ्लॅटधारकांना त्यांचे पैसे परत मिळू शकतील. या नवीन नियमातील हे पहिलेच मोठे प्रकरण आहे.

हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीची (एचसीसी) सर्वाधिक (68.7टक्के) हिस्सेदारी असलेल्या लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडने पुण्याजवळ निसर्गाच्या सान्निधन्यात सुमारे दिड लाख कोटी रुपयांचा ‘लवासा सिटी’ हा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली होती. 2200 रहिवासी इमारती, हॉटेल्स, व्हिला आदींचा त्यात समावेश होता. पण पर्यावरण विभागाने परवानगी नाकारल्याने त्यामध्ये बराच अवधी वाया गेला. यादरम्यान प्रकल्पासाठी आर्थिक साहाय्य मिळणेही बंद झाले. रिझर्व्ह बँकेने 12फेब्रुवारी 2018ला कर्जे थकित असलेल्या कंपन्यांच्या पुनर्बांधणीसंबंधी नवीन नियम तयार केला. या नियमांतर्गतही कंपनीने पुनर्बांधणीचा आराखडा बांधला. तो कंपनीला वित्त साहाय्य करणाऱ्यांना देण्यात आला. पण त्यांच्याकडून आराखडा फेटाळण्यात आला. त्यामुळेच आता आयबीसीच्या नवीन नियमांनुसार हे प्रकरण तडीस नेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
आयबीसीअंतर्गत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडनेच राष्टÑीय कंपनी लवादाकडे याचिका दाखल केली होती. ती याचिका लवादाने स्वीकारली असून आता प्रवर्तकांच्या समितीने कंपनीचा ताबा घेतला आहे. पुढील २७० दिवसात दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण होईल. प्रक्रियेअंती कंपनीच्या मूळ गुंतवणूदारांची हिस्सेदारी कमी होईल. पण हा निर्णय प्रकल्पात निवासासाठी अथवा अन्य कारणाने गुंतवणूक केलेल्या किरकोळ ग्राहकांच्यादृष्टीने अत्यंत सकारात्मक असेल, असे एचसीसी लिमिटेडचे संचालक व समूह सीईओ अर्जून धवन यांनी मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या नोटीशीत नमूद केले आहे.
फ्लॅटधारकांचा असा होईल फायदा..
‘लवासा सिटी’ साठी लवासा कॉर्पोरेशनने विविध बँकांकडून कर्जे व अन्य संस्थांकडून वित्त साहाय्य घेतले होते. आता कंपनी कायदा लवादामार्फत या कंपनीची अन्य कंपनीकडून खरेदी होईल. त्यामध्ये नवीन कंपनी सर्व कर्जदारांचा पैसा परत करेलच. पण आयबीसीच्या नवीन नियमांतर्गत लवासा रिअल कंपनी असल्याने देणींमध्ये ग्राहकांचा हिस्सासुद्धा असेल.यामुळे या प्रक्रियेनंतर ग्राहकाने फ्लॅटपोटी लवासा कॉर्पोरेशनकडे भरलेली रक्कम त्याला परत मिळू शकेल.

Post a Comment

 
Top