Add

Add

0
संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानतीर्थ पाजून संपूर्ण मानवजातीचे कल्याण केले
- डॉ.कल्याण गंगवाल 
 
आळंदी(प्रतिनिधी):-ऑक्टोबर: संत श्री ज्ञानेश्‍वर यांनी ज्ञानाचे तीर्थ पाजून संपूर्ण मानवजातीचे कल्याण केले आहे. सत्य आणि अहिंसा या दोन तत्वांच्या आधारेच संपूर्ण विश्‍वात शांती स्थापित होऊ शकते. या तीर्थ क्षेत्रातून डॉ. कराड यांनी जो संदेश दिला आहे त्या माध्यमातून लवकरच संपूर्ण विश्‍वात शांती निर्माण होण्यास वेळ येणार नाही. असे विचार सामाजिक कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित ‘जागतिक परिषदेच्या’ अनुषंगाने ज्ञानतीर्थक्षेत्र आळंदी येथील पवित्र इंद्रायणी तीरावरील विश्‍वरूप दर्शन मंचावर तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे व पसायदानाला विश्‍वगीत म्हणून मान्यता मिळावी या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. कल्याण गंगवाल हे बोलत होते. या प्रसंगी पवित्र इंद्रायणीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीतील ओव्यांएवढे, म्हणजेच 9033 ज्ञानदीप मान्यवरांच्या हस्ते व 700 मृदंगवादकांच्या गजरात अर्पण केले गेले. 
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, बी.व्ही.जी गु्रपचे संचालक हणमंत गायकवाड, पद्मभूषण डॉ.विजय भटकर, इटालीचे माजी राजदूत डॉ. बसंत गुप्ता, महान शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र थत्ते, प्रसिध्द कायदे पंडित अ‍ॅड. शिराज कुरेशी, थाइलँड येथील बुध्दचरणदास, धर्मालंकार स्वामी राधिकानंद सरस्वती, ह.भ. प. तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, डॉ. मंगेश तु. कराड, डॉ, सुनील का. कराड, ज्योती कराड-ढाकणे, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, पं.उध्दवबापू आपेगावकर व  ह.भ.प.श्री सुदाम महाराज पानेगांवकर हे उपस्थित होते. तसेच यावेळी हजारों वारकरी, मृदंगवादक, टाळकरी उपस्थित होते.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, ज्ञानेश्‍वर यांनी आत्म्यापासून परमात्म्यापर्यंतचा प्रवास दाखविला आहे. जगात शांती स्थापन करावयाची असेल तर सर्वात प्रथम सर्वांना शाकाहारी बनावे लागेल. एका हातात मांसाहार व एका हातात शांतीचा नारा घेऊन कोणीही मानवकल्याण करू शकणार नाही. वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ आहे कारण यात शाकाहाराला अनन्य साधारण महत्व दिले गेले आहे. दुःख भोगण्यास प्रत्येक व्यक्ती हा स्वःच जवाबदार असतो. कारण त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळते.
डॉ. विजय भटकर म्हणाले, 21 व्या शतकातील सर्वात मोठा प्रश्‍न मी कोण आहे हा आहे. याचा शोध घेण्या साठी संत श्री ज्ञानेश्‍वरांच्या चरणी यावे लागते. या जगातील शेकडो समस्यांचे समाधान या तीर्थ क्षेत्रावर आल्यावर केले जाते. त्याचाच एक भाग म्हणजे डॉ. विश्‍वनाथ यांनी जे स्वप्न पाहिले,ते संत श्री ज्ञानेश्‍वरांच्या नावाने जगप्रसिध्द आधुनिक मंदिराचे निर्माण होय. तसेच, विज्ञान,धर्म व तत्वज्ञान या विषयांवरील परिषदेचे आयोजन केले आहे. अध्यात्माशिवाय विज्ञान कळणे अवघड आहे. जेव्हा आपले अंतःकरण शुध्द होईल, तेव्हाच सत्याचे दर्शन घडेल.
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, आळंदी हे ज्ञानतीर्थ आहे. येथे होणारा हा कार्यक्रम ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. वारकरी हे संपूर्ण श्रध्देने अध्यात्मावर विश्‍वास ठेवतात. परंतू आमच्या सारख्या अर्धवट शिकलेल्या लोकांची मोठी समस्या असते. अशा वेळेस संत श्री ज्ञानेश्‍वर यांनी विश्‍वासाठी केलेली प्रार्थना ही संपूर्ण मानवजातीला किती महत्वपूर्ण आहे, हे लक्षात येते. त्यामुळेच त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटामुळे त्यांचे नाव संपूर्ण जगभर उच्च स्थानावर पोहोचले आहे. आता येथून संपूर्ण जगभर मानवतेचा व विश्‍व  शांतीचा संदेश पोहचविला जाईल.
हणमंत गायकवाड म्हणाले, तीर्थ क्षेत्र हे ज्ञान क्षेत्रात कसे परिवर्तित करता येईल, यावर विशेष जोर द्यावा लागेल. संत श्री ज्ञानेश्‍वरांनी ज्या प्रकारे मानवकल्याणचे कार्य केले त्याच प्रकारे  या तत्वाचे पालन बीव्हीजी कंपनी करीत आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य सुरू केले आहे. तसेच, १७०० अ‍ॅम्बुलन्सच्या माध्यमातून रोज जवळपास 9 हजार लोकांचे जीव वाचविण्याचा दिशेने कार्य केले जात आहे. भारतातील बर्‍याच तीर्थ क्षेत्रांच्या साफ सफाईची निशुल्क सेवा आमच्याद्वारे केली जातेे. 
डॉ.रवींद्र थत्ते म्हणाले, श्री संत ज्ञानेश्‍वरांनी जे प्रपंचाचे ज्ञान दिले आहे तेच खर्‍या अर्थाने विज्ञान आहे. ज्याला प्रपंच विज्ञान समजले नाही, तोच अज्ञानी असतो. ज्ञानेश्‍वरांच्या पहिल्या ओवीत संपूर्ण उपनिषदांचा समावेश आहे.  आद्य, वेद प्रतिपाद्य आत्मरूपा, या ओवीचा नीट अर्थ समजून घेतला, तर संपूर्ण विश्‍वाचे ज्ञान कळते.
डॉ. बसंत गुप्ता म्हणाले, सतसंगाशिवाय आपणाला कधीही शांतीचा अनुभव येवू शकणार नाही. अध्यात्मात भक्तीचे ९ प्रकार सांगितले आहेत. त्यात संतांची संगत हा एक भक्तीचा प्रकार आहे. त्यानंतर इष्ट देवतेची आठवण करणे हा सुध्दा भक्तीचाच प्रकार आहे. योग व कर्म हा सुध्दा योगाचाच एक प्रकार आहे. प्रत्येक योग व भक्ती ही संपूर्ण दुखाला पूर्ण विराम देतेे. जो पर्यंत आपल्या मनात शांती स्थापित होत नाही, तो पर्यंत बाह्य जगात शांतीचा अनुभव येऊ शकणार नाही.
अ‍ॅड. शिराज कुरेशी म्हणाले, हजची यात्रा केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा आपल्या तीर्थक्षेत्रावर जातो. परंतू मी हजची यात्रा केल्यानंतर लगेच येथे पोहचलो. म्हणजेच संत श्री ज्ञानेश्‍वरांच्या आशिर्वादाने येथे पोहचलो. हे  माझे भाग्य आहे. ज्ञानेश्‍वरांनी संपूर्ण मानवजातीचा व विश्‍वाच्या कल्याणाचा विचार केला आहे. त्याच विचारधारेचे पालन करून डॉ. कराड यांनी विश्‍वशांतीचा नारा दिला आहे. त्यासाठी संत ज्ञानेश्‍वरांच्या तीर्थ क्षेत्रातून याची ज्योत पेटविण्यात आली आहे. तसेच, सर्व धमार्ंची शिकवण ही मानव कल्याणाची व शांतीची आहे. त्यामुळे कोणत्याही इष्ट देवतेला आठवण करून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे.
स्वामी राधिकानंद सरस्वती यांनी सुध्दा आपले विचार मांडले.
प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड चाटे यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top