Add

Add

0
ग्लोबल चिपळूण टुरिझम तर्फे ‘जागतिक पर्यटन दिन’ उत्साहात

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे सचिव सी. एम. शर्मा यांची उपस्थिती

      चिपळूण (प्रतिनिधी ):- कोकण पर्यटन विकासाच्या मुद्द्यावर वर्तमानकाळात ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्यात असे लोकप्रतिनिधी असलेले केंद्रीय मंत्री ना. सुरेश प्रभू यांनी आपले सचिव सी. एम. शर्मा यांना कोकणातील पर्यटन विषयात जमिनीवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या मंडळीशी संवाद साधण्यासाठी पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी, ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या ‘जागतिक पर्यटन दिन’निमित्त आयोजित केलेल्या विशेष संवाद सभेत भाग घेऊन चिपळूणच्या पर्यटन विकासातील अडचणी समजावून घेतल्या. आगामी काळात ठोस प्रकल्पात्मक काम करण्यासाठी तयार राहा, त्या दृष्टीने संपर्कात राहा, अशा सूचना देतानाच आपल्या येण्याने उपस्थित चिपळूण परिसरातील पर्यटनप्रेमी, अभ्यासक, कृषी पर्यटन केंद्र, बोट, हॉटेल व्यावसायिक यांचा उत्साह वाढविला.           
      चिपळूण कराड राज्य मार्गालगत असलेल्या विद्या सरखोत यांच्या विद्या कोकण कृषी पर्यटन केंद्र येथे संपन्न झालेल्या या संवाद सभेस हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’चे अध्यक्ष श्रीराम रेडीज, ‘नेचर टुरिझम’चे निलेश बापट, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, व्यावसायिक रमण डांगे, निनाद पाथरे, मालघर कृषी पर्यटन केंद्राचे श्रीकांत बापट, श्रीपरशुराम निसर्ग सानिद्ध्य पर्यटन केंद्राचे विलास महाडिक, सर्पमित्र अनिकेत चोपडे, केटरिंग व्यवस्थापनातील प्रवीण कांबळी, विद्या कोकण कृषी पर्यटन केंद्रचे कॅ. प्रसाद सरखोत, गार्गी सरखोत, हॉटेल रिलाझचे प्रल्हाद लाड, प्रेरणा लाड, आर्किटेक्चर विद्यार्थिनी आश्विनी चिले, बोट व्यावसायिक शौकत गोलंदाज, संदीप चिंगळे, रामपूरच्या झुळूक पर्यटन केंद्राचे प्रकाश मालशे, दामोदर कोळथेकर, कृषी विकास संस्थेचे दिनेश दळवी आदि उपस्थित होते. किशोर धारिया यांनी केंद्र सरकारच्या पर्यटन विषयातील नव्या योजनांची माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यात ‘बीच मॉडेल’, ‘व्हिलेज टुरिझम’ अंतर्गत म्हणून आगामी काळात सुरु होणाऱ्या प्रत्यक्ष प्रकल्पांबाबत संजय यादवराव यांनी माहिती दिली.             
ना. सुरेश प्रभू यांचे सचिव शर्मा यांनी कोकणातील विकासाभिमुख क्षमतांचे जगभर ब्रँडींग होण्यासाठी केंद्रीय स्तरावर सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
      तत्पूर्वी संवाद सभेच्या प्रारंभी धीरज वाटेकर यांनी ‘चिपळूण पर्यटन विकास : इतिहास, सद्यस्थिती आणि संधी’ याबाबत आपल्या प्रास्ताविकातून विस्तृत विवेचन केले. चिपळूणच्या पर्यटन विकासासाठी झटणारी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ ही आपली ‘मातृसंस्था’ असून  या मातीतील पर्यटन व्यावसायिकांनी तिच्यासोबत कार्यरत राहायला हवे अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. संस्थेच्या संयोजनातून आगामी काळात पर्यटनात येऊ घातलेल्या ‘वाशिष्ठी : उगम ते संगम’ या पर्यटकाभिमुख प्रकल्पाची त्यांनी माहिती दिली. ‘ग्लोबल’चे मॅनेजर विश्वास पाटील यांनी आतापर्यंत झालेल्या पर्यटन विकास कामांची माहिती दिली. मराठी चित्रपटांकडून शुटींगसाठी मिळणारा प्रतिसाद पाहाता, एकाचवेळी 100-150 माणसांच्या संपूर्ण व्यवस्थेचे केंद्र चिपळूणात आवश्यक असल्याचे सांगितले. श्रीकांत बापट यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कृषी पर्यटनातील संधी याबाबत आपले अनुभव उपस्थितांना सांगितले. विलास महाडीक यांनी, पेढे गावात सन 1998साली एकही झाड नसलेल्या जमिनीवर पाण्याची टाकी रोज सायंकाळी ओसंडून वाहात असल्याचे पाहून ते वाहणारे पाणी आपल्या जागेत वळवून सुरुवातीला बाग, नर्सरी आणि नंतर श्रीपरशुराम कृषी पर्यटन केंद्र कसे साकारले याबाबत सांगितले.   प्रकाश मालशे यांनी पर्यटकांना जेवणातील आवडीनिवडी, वेगळेपणा जपण्याबाबत आपले अनुभव सांगितले.  
      सभेच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष श्रीराम रेडीज यांनी, चिपळूण पर्यटनाला चांगले दिवस येत असल्याचे नमूद केले. इथे येणाऱ्या पर्यटकाला २४ तास सल्ला केंद्र उपलब्ध करून देता येईल का ? पर्यटकाच्या बजेट नुसार आपण एकमेकांना सहकार्य करायला हवे या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. ‘चिपळूण’च्या पर्यटन प्रसिद्धीसाठी आगामी काळात ‘पॉकेट साईज झेड-कार्ड’ बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. संस्था-संघटना म्हणून पर्यटन विषयात कार्यरत सर्वांनी एकत्रित राहण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.

Post a Comment

 
Top