Add

Add

0
मिरजोळीतील 66विद्यार्थ्यांनी केला वाशिष्ठी उगमाचा ट्रेक यशस्वी 
वाशिष्ठी सफर उगम ते संगम’ उपक्रम ; सायंकाळी अण्णा शिरगावकर यांच्या भाषणाने समारोप   
     चिपळूण (धीरज वाटेकर ):- येथील मिरजोळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या दलवाई हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने योजिलेल्या अत्यंत महत्त्वकांक्षी वाशिष्ठी सफर : उगम ते संगम’ या कार्यक्रमातील वाशिष्ठी नदीच्या उगमाचा अत्यंत खडतर ट्रेक 66विद्यार्थ्यांनी यशस्वी केला.शालेयस्तरावर शिक्षण घेणाऱ्या 66 विद्यार्थ्यांना, त्यांचे पोषण करणाऱ्या नदीची ‘उगम ते संगम’ अशी अभ्यासपूर्ण सफर घडविली जाणारा, संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक इतिहासातील हा आगळावेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण पहिला उपक्रम ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान आज दिवसभर बोटीतील प्रवासाद्वारे या उपक्रमाचा दुसरा संगम दर्शन टप्पा संपन्न होणार असून त्याची सांगता सायंकाळी 6 वाजता दाभोळ बंदर येथे नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या व्याख्यानाने होईल.
     दलवाई हायस्कूल, मानस संस्था, मुंबई आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम या संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम संपन्न होत आहे. या उपक्रमामागची संकल्पना मानसच्या कार्याध्यक्षा शमा दलवाई यांची असून पर्यटन अभ्यासक, नदीच्या उगमाचे शोधकर्ते धीरज वाटेकर हे या उपक्रमाचे समन्वयक आहेत. विद्यार्थ्यांना आज मनसोक्त संचार करणाऱ्या मगरी, केरळच्या बॅकवॉटरचा आनंद, रम्यखाडी,संथपाणी, टिपिकल किनारवर्ती गावंकिनाऱ्याला बिलगलेले डोंगरमध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटंत्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब,विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि वाशिष्ठीमधील तितकीच रम्य प्राचीनता अनुभवायला मिळणार आहे. या वाशिष्ठी खाडीला निसर्गानं मुक्तहस्तानं सौंदर्य दिलं आहे. वाशिष्ठी कोकणातली एक महत्त्वाची नदी असून तिची एकूण लांबी सुमारे 70किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरील झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीतील उगम वाटेकर यांनी प्रत्यक्ष स्थळी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. या उगमाचा शोध सन 2015साली, नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या संशोधित ग्रंथाच्या निर्मितीची गरज म्हणून धीरज वाटेकर यांनी आपले सहकारीमित्र वन्यजीव अभ्यासक सदफ कडवेकर आणि विलास महाडिक यांच्या साथीने घेतला होता. दरम्यान वन्यजीव अभ्यासक निलेश बापट आणि सदफ कडवेकर यांनी विद्यार्थ्यांना सह्याद्रीतील जैवविविधता याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांना मलबार राखी धनेशकोतवाल,खंड्याशिंपी,धोबी,काळा गरुड,खाटिक,काळी बुलबुल,पिवळी बुलबुलमलबारी पोपटदयाळगाय बगळा,पॉंड हेरॉन आदि विविध प्रकारचे पक्षी पाहाता आले. वाशिष्ठी नदी चिपळूण, खेड,गुहागर, दापोली तालुक्यांच्या सीमांतून वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते. खेडकडून येणारी जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. या वाशिष्ठीला नारिंगी, तांबी, धावती नदी, वैतरणा आणि शिवनदी येऊन मिळतात. याची विद्यार्थ्यांनी पाहाणी केली. कोयना अवजलमुळे वाशिष्ठी सदा भरलेली, वाहणारी असते. या वाशिष्ठीचे खोरे 2200चौरस किलोमीटरचे आहे. वाशिष्ठीच्या खोऱ्यात असलेली वैविध्याची रेलचेल 8 तासांच्या ट्रेकिंग दरम्यान अनुभवता आली.
 क्रोकोडाईल सफारीचा नैसर्गिक अनुभव देणारा वाशिष्ठी बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम विद्यार्थ्यांना अभ्यासाता आला. ओहोटी दरम्यान वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर पहुडलेल्या मगरी येथे सहज नजरेस पडतात. अगदी 8-10फुटाच्या अंतरावरून त्या पाहण्याचा आनंदही घेता येतो. अंजनवेल चा गोपाळगड किल्ला याच वाशिष्ठीच्या दाभोळ खाडीमुखावर वसलेला आहे. मराठी अमदानीत हे जिल्ह्याचे ठिकाण होतें. किल्ला तीन बाजूंनी समुद्रवेष्टित व चवथ्या बाजूस खंदक आहे. अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड हे दोन या वाशिष्ठीचे पहारेकरी आहेत.गोविंदगड किल्ला जंजिऱ्याच्या हब्शांनी बांधला. तो शिवाजी महाराजांनी 1670साली जिंकून घेतला. एका छोट्या बेटावर वसलेल्या किल्ल्याचा परिसर 2 एकर आहे. मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार श्री.ना.पेंडसे यांची'तुंबाडचे खोतही द्विखंडी कादंबरी याच खाडीच्या वातावरणात रमलेली आहे. वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर मालदोली गावात नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली अभियांत्रिकी नवल ठरलेली रामचंद्र वासुदेव मराठे न्यास” ही ‘हेरिटेज वास्तू’ आहे. उपलब्ध मौखिक माहितीनुसार या वास्तूचे प्लॅनिंग भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले होते.दापोली तालुक्यातील पन्हाळेकाझी हे गाव कोरलेल्या लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील कोटजाई ही नदी पुढे वाशिष्ठी खाडीला जाऊन मिळते. या नदीच्या काठावर महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा नितांत सुंदर लेणी समूह आहे.इथल्या गुंफा ऐतिहासक असून त्या जवळपास हजार वर्षांहून अधिक जुन्या आहेत. चिपळूण तालुक्यातील गोंधळे येथील तांबी नदीच्या किनारी असलेले पेशवेकालीन हरिहरेश्वर मंदिर, परिसरातील इंग्रजी‘एल’शेप आकाराची प्राचीन विहीर (घोडेबाव)शेकडो वर्षांपूर्वीचे वडाचे झाड पाहण्यासारखे आहे. दाभोळ एकेकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीनशक्तिशाली बंदर आहे. दिनांक 26जानेवारी 1937 ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता.108 फूट खोल, 25 मैल लांब या खाडीत एकावेळी 2/3 टनाच्या किमान 100कार्गोज उभ्या राहू शकतात. सन 1950पर्यंत गत 300 वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली आहेतत्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन 1808 साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअर’ प्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत.या दाभोळच्या बंदरावर बसून आज सायंकाळी समारोप प्रसंगी, सूर्यास्ता समयी शाळेचे विद्यार्थी अण्णा शिरगावकर यांच्याकडून ऐतिहासिक दाभोळ खाडीचा इतिहास समजून घेणार आहेत.
     शनिवारी शिक्षणातील नवे प्रवाह यावर श्रीमती विजया चौहान,जलअभ्यास यावर मिलिंद पंडित, तसेच सायंकाळी 5 वाजता खासदार हुसेन दलवाई यांचे अध्यक्षीय भाषण संपन्न झाले.या ट्रेकिंग उपक्रमासाठी सह्याद्री संवर्धन संशोधन संस्थेचे कुंभार्ली घाट परिसरात कार्यरत वन्यजीव अभ्यासक सदफ कडवेकर त्यांचे सहकारी चैतन्य दिवटेपराग धामणस्करबबन शेळकेरितेश देवरे,ऋषिकेश ताम्हणकरअमित भोंगप्रतिक खोपकरसहाद कडवेकर यांनी यावेळी गाईड म्हणून काम पहिलेतसेच या उपक्रमाचे संयोजक ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रेडीज यांच्या नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, नदीच्या उगमाचे शोधकर्ते धीरज वाटेकर, मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक विश्वास पाटील यांनीही विद्यार्थ्यांना ट्रेकिंग मार्गदर्शन केले.दरम्यान आज रविवारी (दि.25) दिवसभर बोटीतून गोवळकोट-करंबवणे-दाभोळ प्रवासाद्वारे वाशिष्ठी संगम दर्शन होईल. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मानस संस्थेच्या चिपळूणच्या कार्याध्यक्षा सुमती जांभेकर, शाळा समिती अध्यक्ष खालिद दलवाई, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पवार,उपाध्यक्ष प्रकाश खेडेकर, मुख्याध्यापक रामचंद्र महाडिक, सर्व संस्थाचालक, शिक्षक आणि कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

Post a Comment

 
Top