Add

Add

0
       बांधवांनो शिवप्रभु आणि शंभूराजे समजुन घ्या !
पक्षपातीपणा करायचा नाहीभेदभाव करायचा नाही, ही आबासाहेबांची शिकवण आम्हाला.. ! म्हणून हा रायप्पा महारज्योत्याजी मराठा,बहिर्जीकाका रामोशीजीवा महाले न्हावीरामजी महादेवकोळी,दत्ता रंगारी,सोनबा लोणारीमायनाक भंडारीराम माळीसंपत साळी,नाना शिंपी,दादा लोहार,मुरा लमाणसतमा मांग,हणमंत गोसावीनालबंदघडशीचांभार,गारुडीदेशमुख,पाटीलकिती अलुतेदारकिती बलुतेदार! अठरा पगड जातीजमातींच्या त्यागावरशौर्यावर,रक्तावर आणि घामावर पोसलेलंउभं राहिलेलंमोठं झालेलं हे स्वराज्य !!! आणि या स्वराज्याची चालक मालक रयत ! फक्त रयत !!
सध्या झी मराठी वाहिनीवरील रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या लोकप्रिय अशा स्वराज्यरक्षक संभाजी मालिके तील हे समतेचे जिवंत संवाद ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. काय आणि कसे घडवले असेल शिवबांना आणि शंभूराजांना राजमाता जिजाऊ यांनी. जिजाऊ यांना तत्कालीन परिस्थितीने खुप काही शिकवले होते. कठीण परिस्थितीतून त्या तावूनसुलाखून बाहेर पडल्या होत्या. शहाजी महाराज या कालखंडात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. स्वराज्याचे बीज खरे त्यांचेच आणि त्यास साकार रूप देणाऱ्या गुरुमाता या जिजाऊ माँसाहेबच आहेत. जिजाऊ यांनी स्वराज्यासाठी दोन छत्रपती घडवले. एक स्वतः शिवाजी महाराज आणि दुसरे संभाजी महाराज. शहाजी ते संभाजी एक समान सूत्र दिसते आणि ते म्हणजे आधी स्वराज्य आणि आधी रयत. बाकी सर्व नंतर. आता वरील संवादच पहा. समतेचा इतका सुरेख मासला खचितच दुसरा असेल.
आपण ‘अठरा पगड जातीची मोट बांधून शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभे केले असे म्हणतो’ पण त्याचा पाया एकच होता आणि तो म्हणजे एकता आणि समानता. महाराजांनी फक्त माणुस आणि त्याचे कसब आणि निष्ठा पाहिली. म्हणुनच स्वराज्यासाठी जीवाची कुरवंडी करणारी लाखमोलाची माणसं निर्माण झाली. त्या माणसांकडून शिवाजी महाराजांनी उत्कृष्ट कामगिरी करुन घेतली. माणसांवर विश्वास टाकणे आणि समान ध्येयाला प्रवृत्त करणे हे काम शिवाजी महाराजांनी सातत्याने केले. म्हणुनच शिवरायांनंतरही अनेक सरदार संभाजी महाराजांसोबत कायम राहिले. कृष्णाकोयनेच्या पाण्यावर आणि रायगडाच्या निरश्या दुधावर पोसलेल्या आणि शिवाजी नामक सहाणेवर घासून पुसून लख्ख झालेल्या तलवारीच्या पात्यासम असलेले सरनौबत हंबीरराव मोहिते ऊर्फ मामासाहेबसुध्दा स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. कर्तव्याआड त्यांनी नातीगोती येऊ दिली नाही. त्यांनी शंभूमहाराजांची पाठराखण केली. दुर्दैवाने आम्हाला कंस आणि शकुनी मामा शिकवले आणि “खंबीर ते हंबीर” मामा शिकवलेच नाही. आमचा खरा इतिहास आमच्यापर्यंत पोहचूच दिला नाही. जे शिकवायचे ते टाळले, जे सांगायचे ते लपवले आणि जे नको ते आमच्या आणि समाजाच्या माथी मारले. त्यातुन इतिहासाचे विकृतीकरण झाले. ते आता  नष्ट होऊ लागले आहे. खरा इतिहास आता लोकांना समजु लागला आहे.
शूर शिवाचा छावा म्हणजे शंभूराजा होता. तो जिजाऊ माँसाहेबांच्या मुशीत वाढलेला आणि संस्कारित झालेला एक संवेदनशील युवराज होता. तो शिवप्रभूंच्या धोरणांचा, विचारांचा, स्वप्नांचा सच्चा पाठीराखा आणि कृतीशील अनुयायी होता. “आबासाहेबांना जे संकल्पित तेच आम्हा करणे” हे शंभूराजांनी आपले जिवित ध्येय मानले होते आणि त्याकरिताच ते अखंड जगले आणि मृत्युंजय झाले. शिवशंभू साक्षात रुद्र आणि छावा होते. धगधगता निखारा होते. त्यांचे खरेपण आणि स्पष्टवक्तेपणा अनेकांना झेपणारा नव्हता. त्यांना त्यावेळी घेरण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण हंबीरमामांच्या खंबीर साथीमुळे शिवशंभू स्वराज्य वाचवू आणि रक्षण करू शकले.
तथापि शिवछत्रपतींची बदनामी करता येत नाही म्हणुन सातत्याने शंभू महाराजांची बदनामी करण्याचा कट करण्यात आला. त्यांना नाही नाही ती दुषणे लावण्यात आली. त्यांचे चारित्र्यहनन करण्यात आले. कपोलकल्पित गोष्टीत त्यांना नाहक गुंतवून त्यांच्या कर्तुत्वाला मागे खेचण्यात आले. त्यांचा दैदिप्यमान पराक्रम झाकोळला जाईल असे विकृत चित्र रंगवण्यात आले. पण सत्य अखेर बाहेर आलेच. लोकांना शिवशंभू कळाले. त्यांची स्वराज्यनिष्ठा आणि पराक्रम समजला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज पितापुत्रातील स्नेहमय संबंध उलगडले. सोबतच स्वराज्याला धोक्यात आणू पाहणाऱ्यांच्या कारस्थानाचा उलगडा झाला. त्यांच्या जातीचा संदर्भ जोडून शंभूमहाराजांवर चुकीचे आरोप केले गेले होते पण ते त्यांनी सप्रमाण खोडून काढले. त्यास प्रखर उत्तर देत असतानाच त्यांनी “अठरा पगड” जातींनी हे स्वराज्य उभे केल्याचा आणि राखल्याचा उपरोक्त उल्लेख केला आहे. शंभू महाराज स्वराज्याचे सच्चे पाईक होते. ते अजिंक्य योद्धा होते. ते औरंगजेबाशी एकाकी लढले. त्यांनी पोर्तुगीजांशी दोन हात केले. त्यांनी समुद्रात सेतू बांधला. त्यांनी स्वराज्यातला एकही किल्ला गमावला नाही. ते लहानपणी आग्रा ते रायगड जाऊन आले होते. आपल्या बुद्धीची चुणूक त्यांनी अनेकांनी दाखवली होती. त्यांनी स्वराज्याला आणि प्रशासनाला मार्गदर्शक ठरतील असे ग्रंथलेखन केले होते.”बुधभूषण” हा त्यातीलच एक.         
शंभू राजांवर जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार होते. त्यामुळे त्यांचे पाऊल कायम सरळ आणि सभ्य आणि सत्य दिशेने जाणारे राहिले. शंभू महाराजांच्या अंगात जाज्वल्य स्वराज्य निष्ठा आणि प्रेम होते. त्यांनी आपल्या आबासाहेबांप्रमाने विजिगीषु जीवनवाद आपल्या देहात सामावुन घेतला होता. म्हणुनच ते जुलमी औरंगजेबाचे अन्याय अत्याचार ४० दिवस सहन करू शकले. त्याच्या अनन्वित क्रूर कृत्यांना तोंड देऊ शकले. त्याने त्यांच्या देहाचे हाल हाल केले. त्यांना उपाशीतापाशी ठेवून त्यांना धर्मपरिवर्तन आणि सत्ता संपत्तीचे लालूच दाखवले. पण शंभू महाराज कशालाही बधले नाहीत. न डगमगता त्यांनी त्यांचे अत्याचार सहन केले आणि फाल्गुन अमावास्येला वढू तुळापुर येथे प्राणार्पण केले. शंभू महाराज हे दुःख आणि यातना, कष्ट आणि वेदना तसेच हालअपेष्टा का सहन करू शकले याचे उत्तर त्यांनी स्वतःच देऊन ठेवले आहे. आणि ते म्हणजे,
शंभुराजाला हरवेल असं रणांगण भुतलावर नाही आणि 
आबासाहेबाच्या  नंतर आम्हाला रडवेल असं दु:ख जगाच्या पाठीवर नाही.
तेव्हा मायबापहो आणि बांधवांनो शिवप्रभू आणि शंभूराजे समजून घ्या. त्यांचे विचार आत्मसात करा. त्यांची शिकवण आचरणात आणा. त्यांना समजुन घेताना कोणत्याही समाजाबद्दल व्देषभाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आणि खऱ्या समतेचा अखंड जयघोष होत राहील हे पहा.
जय शिवराय ! जय शंभूराजे ! 

-सुरेश कोडीतकर, पुणे  

Post a Comment

 
Top